आध्यात्मिकतेला तणावाचा शाप?

0
आध्यात्मिक गुरू भय्यू महाराजांनी गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक ठरली. आध्यात्मिक क्षेत्रात असून आणि स्वत:ला गुरू म्हणवून घेत असूनही भय्यू महाराजांनी अंधश्रद्धश्रेला खतपाणी घातले नाही. उलट सामाजिक कार्यावर विशेष भर दिला. त्याद्वारे जणू या क्षेत्रातील लोकांसमोर एक आदर्श ठेवला. खर्‍या अर्थाने नावलौकिक लाभलेल्या भय्यू महाराजांनी मानसिक तणावातून हे कृत्य करणे अनाकलनीय आहे.

प्रपंच आणि परमार्थ या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. प्रापंचिक व्याप-तापातून मुक्त होण्यासाठी परमार्थ, अध्यात्म कामी येते. आध्यात्मिक उन्नतीमुळे प्रापंचिक, व्यावहारिक ताणतणाव हाताळण्याची क्षमता वृद्धिंगत होते आणि इहलोकीचा प्रवास सुकरतेने पार पडतो. आजपर्यंत अनेक संत-महात्म्यांनी असा उपदेश करत समाजमनावरचे ओझे हलके करण्याचा, त्यांना धैर्य प्रदान करण्याचा प्रयत्न केला. त्यात आधुनिक संतांचा, गृहस्थाश्रमात राहूनही संतपद मिरवणार्‍यांचा समावेश होतो.

भय्यूजी महाराज हे या यादीतील एक अग्रणी नाव. अत्यंत देखणे व्यक्तिमत्त्व, रुबाबदार राहणी, जमीनदार घराण्यात जन्म घेतल्यामुळे वागण्या-बोलण्यातला श्रीमंती थाट, खानदानी अदब, लोकांवर छाप पाडण्यासाठी विचारपूर्वक अंगिकारलेले आणि जोपासलेले वस्त्र आणि अलंकारभान या सर्वांमुळे सामान्यांनाच नव्हे तर राजकारण्यांनाही भय्यूजी महाराजांची मोहिनी पडली. याच कारणामुळे अनेक राजकारणी त्यांच्या नित्य संपर्कात असायचे. अशा या गृहस्थ संताने संसारातील व्यापतापाला कंटाळून स्वत:ला संपवण्याचा निर्णय घ्यावा, ही घटना दाहक वस्तुस्थितीवर प्रखर भाष्य करणारी आहे. दुसर्‍याला ब्रह्मज्ञान शिकवणे सोपे असते. पण ते ग्रहण करणे महाकठीण हेच या घटनेतून पुन्हा एकदा प्रतीत झाले.

सध्याचा काळ प्रलोभनांचा आहे. आजच्या काळातील स्पर्धात्मक वातावरणामुळे प्रत्येकाला मानसिक आधाराची गरज आहे. ती अशा बुवा, साधू, महाराजांच्या सान्निध्याने आणि उपदेश-मार्गदर्शनाने पूर्ण होते. जनांना धीरोदात्तता राखण्याचा, अडचणींवर मात करण्याचा, अडथळे पार करत त्यातूनच नव्या संधी शोधण्याचा उपदेश करणारे असे लोक स्वत: मात्र भावनिक पातळीवर दुर्बल ठरतात. स्वत:च्या आयुष्याशी संघर्ष करण्यात कमी पडतात आणि एखादा टोकाचा निर्णय घेतात तेव्हा सगळ्यांचेच पाय मातीचे असतात, हे सत्य प्रकर्षाने पुढे येते.

इतकी वर्षे उक्तीद्वारे समोर आलेल्या व्यक्तिमत्त्वाची अशी विवेकहीन कृती माणूस म्हणून त्यांची ओळख बलिष्ट करून जाते. एकीकडे मायामोहाला बळी पडणारे किंबहुना, त्यांचा लोभ असल्याने वाममार्गाने जाऊ पाहणारे बुवा-बाबा सध्या चर्चेत असताना दुसरीकडे प्रापंचिक ओझ्याखाली, कौटुंबिक अस्वास्थ्याच्या भाराखाली दबलेल्या एखाद्याचा अंत किती करुण पद्धतीने होऊ शकतो हेच ही घटना दाखवून जाते. मॉडिलिंग क्षेत्रातील सहभागापासून आध्यात्मिक क्षेत्रापर्यंतचा भय्यूजी महाराजांचा प्रवास खरोखरच रंजक म्हणायला हवा.

आध्यात्मिक संत अशी ओळख मिळवणार्‍या भय्यूजी महाराज यांचे खरे नाव उदयसिंह देशमुख! 29 एप्रिल 1968 रोजी मध्य प्रदेशमधील शाजापूरमधील शुजापूर इथे त्यांचा जन्म झाला. त्यांना भगवान दत्तात्रेयांचा आशीर्वाद लाभल्याची भावना भक्तांमध्ये होती. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात एका खासगी कंपनीतील नोकरीपासून केली. मात्र अल्पावधीतच ही नोकरी सोडून दिली. दरम्यान, ‘सियाराम’ तसेच अन्य काही प्रसिद्ध ब्रँडस्साठी त्यांनी मॉडेलिंग केले.

नंतर याही क्षेत्रातून बाहेर पडत त्यांनी इंदोरमध्ये धार्मिक ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले. त्यात गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे, शेतकर्‍यांना बियाणांचे मोफत वाटप करणे तसेच सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करणे या उपक्रमांचा समावेश होता. त्यांनी शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि समाजसेवा आदी क्षेत्रात दिलेले योगदानही महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी विविध उपक्रमांद्वारे देशभर जवळपास 20 लाख झाडे लावली. याशिवाय शेकडो तलावांचे पुनरुज्जीवन केले. परिसरातील लोकांना त्या तलावांमधील पाणीसाठ्याचा लाभ होत आहे.

2011 मध्ये अण्णा हजारे यांच्या लोकपालसंदर्भातील आंदोलनात अण्णांनी दीर्घ उपोषण संपवावे यासाठी भय्यूजींनी निभावलेली जबाबदार भूमिका अनेकांच्या स्मरणात असेल. गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी ‘सद्भावना उपवास’चा संकल्प केला होता. त्यावेळी उपवासाच्या समाप्तीवेळी त्यांनी भय्यूजी महाराजांनाच आमंत्रित केले होते. त्यांच्या आश्रमात अनेक दिग्गजांचा राबता असायचा. त्यात माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, शरद पवार, लता मंगेशकर, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, मिलिंद गुणाजी अशा काही नावांचा प्राधान्याने उल्लेख करावा लागेल. ही लोकप्रियता, कार्यविस्तार आणि समाजातील स्थान लक्षात घेऊन अलीकडेच शिवराजसिंह चौहान सरकारने त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला होता. या निर्णयावर बरीच चर्चाही रंगली. मात्र आपण कोणत्याही पदाची अपेक्षा करत नाही, असे सांगत भय्यू महाराजांनी राज्यमंत्रिपदाचा दर्जा स्वीकारण्यास नकार दिला.

आधुनिक काळातील संत अशी भय्यू महाराजांची ओळख होती. त्यांची आधुनिक जीवनशैलीही चर्चेचा विषय ठरली. नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी चार हजार खास निमंत्रितांनी हजेरी लावली होती. त्यात भय्यू महाराजांचा समावेश होता. सर्वसाधारणपणे संत-महंत, महाराज, बाबा लोक एखाद्या मठात वा मंदिरात वास्तव्य करतात. परंतु मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी आलेल्या भय्यू महाराजांनी दक्षिण दिल्लीतील अ‍ॅम्बेसेडर हॉटेलमध्ये वास्तव्य केले होते. तिथे काही निवडक लोकांच्या भेटीगाठीनंतर ते इंदोरला परतले होते. तोही चर्चेचा विषय ठरला होता. भारतातील विविध धर्मातील संत-महंतांचे कार्य, त्यांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचायला हवा, असा भय्यू महाराजांचा आग्रह होता. त्यादृष्टीने त्यांनी एक योजनाही तयार केली होती. 28 जानेवारी 2011 रोजी गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी भय्यूजी महाराजांच्या ‘संतनगरी योजने’ची घोषणा केली होती.

कौटुंबिक पातळीवर विचार करायचा तर भय्यू महाराजांच्या पहिल्या पत्नीचे, माधवी यांचे 2015 मध्ये निधन झाले. त्यानंतर वर्षभरातच त्यांनी डॉ. आयुषी शर्मा हिच्याशी दुसरा विवाह केला. त्यांचे कुटुंब मूळचे शिवपुरीचे. भय्यू महाराज यांची आई आणि बहिणीच्या आग्रहाखातर या दोघांनी विवाहाचा निर्णय घेतला. भय्यू महाराजांच्या या दुसर्‍या विवाहाबद्दल अनेकांना आश्चर्य वाटले. कारण पहिल्या पत्नीच्या निधनानंतर आपण पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारणार नाही, असे भय्यू महाराजांनी स्पष्ट केले होते. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये भय्यूजी महाराजांचे हजारो समर्थक आहेत. नितांत श्रद्धा असणारे श्रद्धाळू आहेत. त्यांच्या अकस्मित निधनाची वार्ता या सर्वांनाच अंतर्बाह्य हादरवून गेली असेल यात शंका नाही.
– विश्वास मेहेंदळे, माध्यमतज्ज्ञ

LEAVE A REPLY

*