Thursday, April 25, 2024
Homeजळगाव…तर वेगळा निर्णय घ्यावा लागेल !

…तर वेगळा निर्णय घ्यावा लागेल !

जळगाव – 

भाजपाने माझ्यावर सातत्याने अन्याय केला असून पक्षाच्या कोअर कमिटीतूनदेखील डावलण्यात आले आहे. निर्णय प्रक्रियेतून वगळण्यात आले. हे असेच सुरू राहिले तर मला वेगळा विचार करावा लागेल, मी पण माणूस आहे.

- Advertisement -

मलादेखील भावना आहेत.पक्षपातीपणाचा हा कोंडमारा किती दिवस सहन करावा? अशा शब्दात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शनिवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे कैफियत मांडली. खडसे यांच्या या विधानामुळे त्यांचे बंड अजूनही शमले नसल्याचे बोलले जात आहे.

शनिवारी जळगाव शहरात भाजपाच्या उत्तर महाराष्ट्राच्या कोअर कमिटीची बैठक होती. या बैठकीला हजेरी लावल्यानंतर खडसे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी बंदव्दार चर्चा केली.

त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खडसे पुढे म्हणाले की, माझ्यावर झालेल्या आरोपातून मी निर्दोष सिध्द होऊनही मला मंत्रिपदापासून लांब ठेवण्यात आले. पक्षात मला वारंवार डावलण्यात आले असून उमेदवारीही नाकारून माझ्या मुलीला उमेदवारी देण्यात आली. वेळोवेळी होणार्‍या पक्षाच्या बैठकीसाठी मला सहभागी करून घेतले जात नाही.

रोहिणी खडसे यांना पराभूत करण्यामागे पक्षातीलच काही लोकांचा हात होता. पुरावे देण्याऐवजी नावे जाहीर करण्याची पक्षाने परवानगी मला दिली नाही, असे केल्यास पक्षाची बदनामी होईल, असे मला चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

दरम्यान, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, भूपेंद्र यादव यांच्यासमवेत माझ्या तक्रारीबाबत चर्चा केली जाईल. यात पक्ष विरोधी काम करणार्‍यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिल्याचे खडसे यांनी सांगितले.

दरम्यान, या कोअर कमिटीच्या बैठकीला प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, प्रमोद जाधव, माजी मंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री व खा. डॉ. सुभाष भामरे, आ. राधाकृष्ण विखे पाटील, खा. सुजय विखे पाटील, खा. डॉ. हीना गावित, आ. देवयानी फरांदे, माजी मंत्री राम शिंदे, डॉ. विजयकुमार गावित, माजी मंत्री व आ.गिरीश महाजन, आ. राजूमामा भोळे, आ.चंदूलाल पटेल, नाशिक जिल्हाध्यक्ष गिरीश पालवे, धुळे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील,  विजय साने आदी उपस्थित होते.

काय आहेत पुरावे

खडसे यांनी दिलेल्या पुराव्यात सोशल मीडिया, व्हॉट्सअ‍ॅप वा अन्य ठिकाणी प्रसिद्ध झालेले पुरावे आहेत. यात 802 कमेंट्स व्हॉट्सअ‍ॅपवरच्या आहेत, त्यापैकी निव्वळ 760 कमेंट्स याविरोधात आहेत.

खडसेंच्या विषयावर शहांशी चर्चा

खडसे यांनी केलेल्या तक्रारी आणि दिलेले पुरावे या बाबत मी स्वतः दिल्ली येथे खडसे यांना घेऊन पुढील महिन्यात जाणार असून राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासमवेत चर्चा करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आपण भावना समजून घेतल्या आहेत. त्यांनी दिलेल्या पुराव्यावरून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ओबीसींच्या भावना पोहोचविल्या

ओबीसींवर अन्याय झाला आहे, असे मी कधीही म्हटलेले नाही. ओबीसींवर अन्याय होतो आहे, अशी अनेक लोकप्रतिनिधींची भावना आहे. फक्त त्या भावना संबंधितांकडे पोहोचवण्याचे कार्य मी केले. ओबीसींमुळेच पक्ष मोठा झाला आहे. याची पक्ष नोंद घेईलच.

40 वर्ष हमाली केली, त्याचे हे फळ !

40 वर्ष हमाली केली, पण चार दिवसांत बदनाम केले. सर्व प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतरही 40 वर्षांच्या हमालीचा हे फळ मिळत आहे. खरतर खडसे स्पर्धेत येऊच नयेत, यासाठी पक्षात काहींनी प्रयत्न केले आहेत.

पक्ष सोडणार नाहीच

मी पक्ष सोडणार नाही. हे अनेकवेळा सांगितले आहे. मला जाणीवपूर्वक निर्णय प्रक्रियेपासून लांब ठेवले जाते वा वगळले जाते. शिवाय जाणीवपूर्वक अपमान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पक्ष जो निर्णय घ्यायचा आहे, तो पक्ष घेईलच. परंतु, योग्यवेळी माझा निर्णय मी घेईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या