Type to search

Breaking News जळगाव मुख्य बातम्या राजकीय

खडसे राज्यात की केंद्रात, याचा निर्णय केंद्रीय नेते घेतील

Share

भुसावळ । माजी महसूलमंत्री आ. एकनाथराव खडसे हे आमचे व राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना राज्यात ठेवायचे की केंद्रात न्यायचे, याचा निर्णय केंद्रीय नेते घेतील, असे वेगळेच संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिले. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीची सत्ता आल्यास खडसेंना मंत्रिमंडळात घेणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. तसेच माजी मंत्री खडसे हे पक्षाचे नेते असतानाही त्यांच्या मुक्ताईनगरात महाजनादेश यात्रेची जाहीर सभा का वगळण्यात आली? या प्रश्नावर बोलताना मतदारसंघातील बोदवड येथून ही जनादेश यात्रा जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुक्ताईनगर मतदारसंघात प्रचार सभा घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले; परंतु या विषयात राजकारण आणू नका, अशी सूचनाही त्यांनी या वेळी केली. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकेतामुळे आ. खडसे यांना दिलासा नसल्याचे दिसून आले.

ते येथील महामार्गावरील एका हॉटेलात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, पालकमंत्री गिरीश महाजन, आ. हरिभाऊ जावळे, महाजनादेश यात्राप्रमुख सुरजित सिंग, आ. संजय सावकारे, डॉ. राजेंद्र फडके, प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, खा. सुभाष महात्मे, नगराध्यक्ष रमण भोळे आदी उपस्थित होते.

आपणदेखील केंद्रात जाणार असल्याची चर्चा आहे, यावर उत्तर देताना, मी जे बोललो नाही तेच व्हायरल होते. पक्ष देईल त्या जबाबदारीवरच मी समाधानी आहे; परंतु मी राज्यातच राहण्याचे विधानसभेतच सांगितले आहे. तेथे खोटे बोलता येत नाही. नारायण राणे यांचा पक्ष भाजपात विलीन करणार का? असा प्रश्न विचारला असता, याबाबत चर्चा सुरू आहे. याशिवाय खा. उदयनराजे भाजपा सरकारच्या कामांची स्तुती करतात, यावर फडणवीस यांनी सातारा व प. महाराष्ट्रात शासनाने अनेक विकासकामे केल्यामुळे ते प्रभावित झाले आहेत. ते भाजपात आल्यास फायदाच होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पाच वर्षांत अनेक प्रकल्प केले पूर्ण
जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी कोट्यवधींचा निधी देण्यात आला आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंर्तगत जिल्ह्यातील दोन लाख शेतकर्‍यांना 786 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. किसान सन्मान योजनेत 4 लाख 55 लाभार्थ्यांना मदत करून पाच लाख शेतकर्‍यांना अनुदान दिले आहे. खान्देशातील तापी मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी 6 हजार कोटींचा डीपीआर, तर गिरणा नदीवर 13 धरणांची निर्मिती करण्यात येणार आहे. यातून नाशिक व जळगाव जिल्ह्यात सिंचनाची सोय होणार आहे. त्यासाठी बळीराजा संजीवनी योजनेंर्तगत तापी महामंडळाला 2,300 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तसेच भुसावळला रेल्वे कोच फॅक्टरी व दीपनगर प्रकल्पाच्या 660 मेगावॅट प्रकल्पासाठी निधी दिला आहे. ही कामे केल्यामुळेच राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपा एक नंबरचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जनता महायुतीला अभूतपूर्व यश देईल, असा विश्वास मुख्यमंत्री यांनी दिला. विरोधकांना पाच वर्षांत सूरच सापडला नसल्याचे सांगून मोदींना शिव्या देणे एवढाच विरोधकांचा अजेंडा होता. मात्र, त्यात अपयशी ठरल्यामुळे विरोधकांनी आता ईव्हीएमचा मुद्दा उचलल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आमच्याकडे डॅशिंग रसायन
खा. सुप्रिया सुळे यांनी भाजपाकडे कोणती वॉशिंग पावडर आहे? असे वक्तव्य केले आहे. यातून त्यांनी आपल्या पक्षातील लोक घाण असल्याचे मान्य केले आहे. मात्र, आमच्याकडे वॉशिंग पावडर नाही, तर डॅशिंग रसायन असल्याचे सांगून विविध पक्षांतील लोक भाजपात येत आहेत. विरोधकांनी आमच्या मेेगा भरतीपेक्षा स्वत:च्या मेगा गळतीचा विचार करावा, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. भुसावळ, जळगावच्या एमआयडीसीबाबात विचारणा केली असता, यासंदर्भात राज्य सरकार लक्ष घालेल, असे त्यांनी सांगितले.

भुसावळ जिल्ह्यासंदर्भात निकषानुसार निर्णय
भुसावळ जिल्हा होण्यासंदर्भात अनुकूल परिस्थिती आहे. त्यामुळे जिल्हा होणार का? या प्रश्नावर राज्यात आणखीही काही प्रस्ताव आहेत. त्यामुळे योग्य निकषांनुसार जिल्ह्यांची घोषणा होणार आहे.

पीक विमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु
राज्यातील पीक विम्यापोटी शेतकर्‍यांनी 2,161 कोटी भरले; परंतु त्यांना 14 हजार 940 कोटींची मदत मिळाली आहे, असेही मुख्यमंत्री फडवणीस यांनी या वेळी स्पष्ट केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!