वीरचक्र पुरस्कार प्राप्त माजी नौदल अधिकारी बहादूर कविना यांचे निधन

0
भुसावळ । दि.5 । प्रतिनिधी-येथील रेल्वे स्थानकाजवळील मॉर्डन रोडवरील रहिवासी व सन 1971 मध्ये बांग्लादेश मुक्तीसाठी भारत व पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धात कराचीवरील हल्ल्यात महत्वाची भूमिका बजावणारे माजी नौदल अधिकारी लेफ्टनंट कमांडर बहादूर नरीमन (बी.एन.) कविना यांचे नुकतेच ऑस्ट्रेलियातील डलेड शहरात मुलाकडे निधन झाले. ते 80 वर्षांचे होते.
सन 1971 च्या युद्धात भारताच्या हल्ल्याचा मुख्य भर पूर्व आघाडीवर असला तरी पश्चिम आघाडीवरही काही महत्वाच्या कारवाया करण्यात आल्या होत्या.
त्यात 4 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानच्या कराची बंदरावर भारतीय नौदलाच्या क्षेपणास्त्र सज्ज युद्ध नौकांनी केलेल्या यशस्वी हल्ल्याचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो.

या हल्ल्यात नौदलाच्या 25 व्या क्षेपणास्त्र स्क्वाड्रनच्या आयएनएस नि:पात, निर्घात व वीर या युद्धनौकांनी भाग घेतला होता. त्यापैकी आयएनएस नि:पातचे नेतृत्व लेफ्टनंट कमांडर बहादूर कविना यांनी केले होते.

कराची हल्ल्याच्या शिल्पकारांपैकी ते एक प्रमुख सेनानी होते. आयएनएस नि:पातने कराची बंदराजवळ पाकिस्तानी मालवाहू जहाज एमव्ही व्हिनस चॅलेंजर आणि त्याला संरक्षण देणार्‍या पीएनएस शाहजहान यांच्यावर स्टाइक्स क्षेपणास्त्र डागल्याने दोन्ही नौकांचे मोठे नुकसान झाले होते.

तसेच कराची बंदरातील केमारी येथील इंधन साठ्यांवर हल्ला करुन ते नष्ट केले होते. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याला युद्धात इंधनाचा तुटवडा झाला होता.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना वीरचक्र पदक प्रदान करण्यात आला होता. त्यांचे शालेय शिक्षण नाशिक येथील बॉईज टाऊन व मुंबईच्या के.सी. कॉलेजमध्ये झाले होते.

ते भुसावळ येथील तज्ज्ञ दंतरोग तज्ज्ञ डॉ. कविना व नरीमन पॉईंटचे संचालक आदिल कविना यांचे काका होते.

 

LEAVE A REPLY

*