एकाचा निर्घृण खून : दोघांना अटक

0

साकेगाव, ता.भुसावळ । दि.31 । वार्ताहर-भुसावळसह तालुक्यात खूनासारखे गंभिर गुन्हे सातत्याने घडणे सुरूच आहे. अशीच घटना दि. 31 ऑक्टोबर 17 रोजी सुनसगाव शिवारात साकेगाव ते गोंभी गाड रस्त्या दरम्यान बेहाडची डाम, वांजोळा नाल्याच्या काठावर एका इसमास अनैतिक संबंधातून धारदार शस्त्राने निर्घृण भोसकून ठार केल्याची घटना उघडकीस आली.

तालुका पोलीसांनी वेगाने तपासचक्रे फिरवून अवघ्या तीन तासात दोन आरोपींना ताब्यात घेतले. या आरोपींनी गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.

याबाबत माहिती अशी की, दि.31 ऑक्टोबर 17 रोजी पहाटेच्या सुमारास साकेगाव ते गोंभी गाड रस्त्यादरम्यान एका इसमाचा धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण खुन झाल्याची बातमी वार्‍यावर पसरली.

वृत्त समजताच साकेगाव पोलिस पाटील राजू सपकाळे यांनी तालुका पोलिस ठाण्याला सुचना दिली. त्यामुळे लगेच सहाय्यक पोलिस अधिक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि सुर्यकांत पाटील, पोलिस उपनिरिक्षक सुरेश वैद्य, हेकाँ अशोक गंगावणे, हर्षवर्धन सपकाळे, पोकॉ गजानन काळे, सुधाकर पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

प्रथम दर्शनी अज्ञात आरोपीने कोणत्यातरी कारणावरून मयतास धारदार शस्त्राने निर्घृण वार करून जिवेठार मारल्याचे निदर्शनास आल्याने तसा गुन्हा दाखल झाला.

मात्र तालुका पो.स्टे.चे उपनिरिक्षक सुरेश वैद्य हे एका पथकासह वांजोळा, गोजोरा, चोरवड आदी ठिकाणी मयताचे छायाचित्र दाखवून तपास करित असतांना मयताच्या घरापर्यंत पोहोचले व त्यानंतर त्यांनी अवघ्या तीन तासात दोन आरोपींना खुनाच्या गुन्ह्यात संशयीत म्हणून ताब्यात घेतले.

त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच या दोघांनी खुन केल्याची कबुली दिली. यात मयत शिवा गोविंदा भिल (वय 45, रवंजे खु., ता.एरंडोल, ह.मु.चोरवड, ता.भुसावळ) हा आरोपी कमलाकर शांताराम मोरे (वय 35) व युवराज सोनु मोरे (वय 40) दोघे रा.वांजोळा, ता.भुसावळ यांच्याकडे सालदारकीस कामाला होता.

दि.30 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास आरोपी कमलाकर व युवराज यांनी शिवाला सोबत घेवून अशोक वाईन भुसावळ येथे मद्य सेवन केलेे व सायंकाळी ते साकेगाव-गोंभी गाड रस्त्याने निघाले.

दरम्यान, बेहाडची डाब वांजोळा नाल्याच्या काठावर तिघांमध्ये झटापटी झाली त्यात दोन्ही आरोपींनी शिवाचा धारदार चाकुने चेहर्‍यावर, मानेवर, छातीवर, पोटावर अशा 15 ते 17 ठिकाणी भोसकून निर्घृण खुन केल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेबाबत साकेगाव पोलिस पाटील राजू सपकाळे यांनी फिर्याद दिल्यावरून आरोपींविरूध्द गु.र.नं. 46/17 भा.दं.वि. 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येवून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपास पोनि सुर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊनि सुरेश वैद्य करित आहेत.

LEAVE A REPLY

*