Type to search

maharashtra जळगाव फिचर्स

समुद्री ‘सँडरलीन’ पक्षांचे खडकी परिसरात झाले दर्शन

Share

जळगाव  – उत्तर अमेरिका, उत्तर युरोप, उत्तर आशियातील मूळ निवासी  व प्रामुख्याने समुद्र किनारी आढळणार्‍या ‘सँडरलीन’  या पक्ष्याच्या थव्याचे दर्शन   एरंडोल तालुक्यातील खडकी खुर्द परिसरातील पाणथळ जागी झाले,  अशी माहिती पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी दिली.

‘सँडरलीन’   या पक्ष्याचे थवे हिवाळ्यात स्थलांतर करतात व ते जगभर  पसरतात. या पक्षांचे स्थलांतर प्रामुख्याने वालुकामय व दलदलीच्या सागर किनारी होते. मात्र, प्रथमच हे पक्षी आपला सागरी भाग सोडून यंदा हिवाळी पाहुणा म्हणून खान्देशातील अंतर्भागात आले आहेत.

आमच्या 10 वर्षांच्या पक्षी निरीक्षणात सँडरलीन पक्ष्याची आम्ही केलेली ही नोंद आमच्यासाठी खूप मोठी उपलब्धी असल्याचे पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी सांगितले.  सँडरलीन हा पक्षी मराठीत ‘पोची’ या नावाने ओळखला जातो. ‘छोटी चिखली’ या पाणथळ जातीच्या पक्षाशी त्याचे खूप साधर्म्य आहे. सँडरलीन पक्ष्याचा अंतर्भाग पांढरा आणि  राखाडी पंखांना खांद्यापाशी छोटासा गडद पॅचमुळे हा वेगळा ओळखू येतो.

पसरलेल्या पंखावरच्या शेपटीला जाऊन मिळणारा पांढरा पट्टा उडताना ठळकपणे दिसून येतो. पाय आणि चोच काळी असते.  पाणथळ जागी पक्षीनिरीक्षण करीत असताना एक थवा  उडता उडता अचानक  थांबून पाण्याच्या काठी उतरला. हे पक्षी  आखूड चोच दलदलीत, वाळूत खुपसून किडे पकडून खातात. तसेच त्यांना छोटे खेकडे फार आवडतात.

स्थलांतराबाबत आश्चर्य

हिवाळा संपत आला की साधारण मार्च अखेरीस सँडरलीन हे त्यांच्या मायदेशी परततात. टुंड्रा, अलास्का, सैबेरीयन बेटे आणि उत्तर रशिया या अतिथंड प्रदेशात यांची वीण असते. ते एकावेळी दोन ते तीन अंडी घालतात.हजारो मैलांचा प्रवास करुन ते  अन्नाच्या शोधात भारतीय समुद्र किनारी येतात. परंतु, यंदा समुद्र किनारा सोडून ते इतक्या खोल गोड पाणी  असलेल्या या पाणथळ जागी कसे आले? भटकत रस्ता चुकून आले की जागतिक तापमानात होणार्‍या बदलाचा परिणाम ? असा प्रश्न  गाडगीळ यांनी उपस्थित केला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!