गिरणा पाटबंधारेच्या विश्रामगृहांची दूरवस्था

0
सुनील पाटील,भडगाव । दि.1-गिरणा पाटबंधारेचे विश्रामगृहाची वैभवशाली परंपरा आहे. आता तर जलसंपदा मंत्रीपद जिल्ह्याचे आहेत. मात्र तरीही या विश्रामगृहाची दयनीय अवस्थेमुळे शेवटची घटका मोजत आहे. त्याच्या दुरूस्तीकडे पाटबंधारे विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
एकेकाळी गिरणा पाटबंधारेच्या विश्रामगृहांनी अनेकांना आकर्षित केले आहे. तेथे अनेक मातब्बर मुक्कामास राहीले. मात्र हे संपन्नतेचा भुतकाळ सांगणारे विश्रामगृह लयास जाण्याची परीस्थिती निर्माण झाली आहे.
पाटबंधारे विभागाला दुरूस्तीचा विसर – गिरणा पाटबंधारे विभागाच्या अक्तीरीत येणार्‍या विश्रामगृहाच्या दुरूस्तीकडे पाटबंधारे विभागाने पुर्णपणे दुर्लक्ष केले असल्याचे दिसते.

गिरणा धरण बांधल्यानंतर त्याच्या लाभक्षेत्रात ठिकठिकाणी पाटबंधारे विभागामार्फत अलिशान विश्रामगृह बांधण्यात आले. या विश्रामगृहाना अनेक मोठ्या लोकांचे सहवास लाभले आहेत.

वैभवशाली परंपरा सांगणारे विश्रामगृहाच्या दुरूस्तीकडे पाटबंधारे विभाग का दुर्लक्ष करीत आहे? असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे.

विश्रामगृह सलाईनवर – गिरणा पाटबंधारे विभागाचे जामदा, भडगाव, गोंडगाव, एरंडोल, दहीगाव, धरणगाव येथे विश्रामगृह आहेत. याशिवाय गिरणा धरणावरही विश्रामगृह आहे. याची स्थिती इतर विश्रामगृहाच्यां तुलनेने चांगली आहे. चाळीसगाव तालुक्यातील जामदा बंधार्‍याला लागुनच विश्रामगृह आहे. मात्र त्याची दयनीय स्थिती झाली आहे. ते मोडकळीस आले आहे. या विश्रामगृहाला पुर्वी खुप पसंती होती.

भडगाव तालुक्यातील गोंडगावच्या विश्रामगृहाची त्यापेक्षा अवघड परीस्थिती आहे. ते असुन नसल्यासारखे आहे. तर भडगावचे गिरणा काठावरचे वैभवसंपन्न विश्रामगृह अखेरची घटका मोजत आहे. गेल्या दोन वर्षापासुन ते बंद झाल्यासारखे आहे. तेथे एकही कर्मचारी कार्यरत नाही.

एरंडोलला म्हसावद रस्त्यावर असलेले विश्रामगृहात दोन वर्षापासून प्रांत कार्यालय सुरु करण्यात आले आहे. धरणागावचे विश्रामगृह जेमतेम आहे. त्यामुळे सर्व विश्रामगृह हे सलाईनवर आहेत. याकडे पाटबंधारे विभाग ढुंकुनही पहायला तयार नाही.

पुन्हा कर्मचार्‍यांची भरती नाही – पुर्वी पाटबंधारे विभागाच्या या विश्रामगृहानां बड्या राजकीय पुढार्‍यांसह, अधिकार्‍यांचा राबता असायचा. ते या निसर्गरम्य विश्रामगृहानां अधिक पसंतीने देत. या विश्रामगृहाला पुर्वी चौकीदार, खानसबा नियुक्त होते. पण ते कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर पुन्हा कर्मचार्‍यांची भरती करण्यात आली नाही.

त्यामुळे हे रेस्टहाउस वापरात येत नसल्याचे दिसते वा त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने येथे फक्त इमारती शिल्लक राहील्या आहेत. त्यापण कीती दिवस तग धरतील? हा प्रश्न आहे. दरम्यान या कामासाठी निधीची मागणी करण्यात येते, पण निधी मिळत नसल्याचे पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे.

जलसंपदा मंत्र्यानी लक्ष घालावे – पाटबंधारे विभागाचे वैभव असलेल्या या विश्रामगृहांच्या दुरूस्तीकडे राज्याच्या जलसंपदा मंत्र्यानी लक्ष घालावे, अशी मागणी केली जात आहे.

यासंदर्भात प्रस्ताव पाठविल्याचे पाटबंधारे विभागाकडुन सांगण्यात येते. पण निधी नसल्याने कारण पुढे केले जाते. मंत्री ना. गिरीश महाजन यांनी खास बाब म्हणून या विश्रामगृहाच्या दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा आहे.

दरम्यान या विश्रामगृहांकडे जाण्याचा प्रसंग आला नाही, परंतु आता या विश्रामगृहांची पाहणी करुन ना. गिरीष महाजन यांच्याकडे दुरुस्तीसाठी पाठपुरावा करु, असे आ. किशोर पाटील यांनी ‘देशदूत’ला सांगितले.

 

LEAVE A REPLY

*