Type to search

maharashtra जळगाव फिचर्स मुख्य बातम्या

आईला मारहाण करणार्‍या मुलाला घरात प्रवेशबंदी – प्रांताधीकार्‍याचा आदेश

Share

जळगाव – 

जगभर आई ची महती सांगणार्‍या अनेक कहाण्या प्रसिद्ध असताना दुसरीकडे मात्र घर हडपण्यासाठी आई ला मारहाण करून धमकी देणार्‍या मुलाला घरात प्रवेश न देण्याचा निकाल प्रांत अधिकारी दीपमाला चौरे यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे.  छळ करणार्या मुलासह इतर दोन मुलांना आईला प्रत्येकी 2500 रूपये निर्वाह भत्ता देण्याचेही आदेश दिले.

शहरातील गणेशवाडी भागातील  सुमन आनंदा पाटील या 75 वर्षीय मातेला  दिलीप आनंदा पाटील, रमेश आनंदा पाटील, किशोर आनंदा पाटील  अशी अपत्ये आहेत.  सुमन पाटील यांचे पती आनंदराव रामजी पाटील हे हातमजुरीचे  काम करीत होते. तर सुमन पाटील ह्या शिवणकाम करून घराचा उदरनिर्वाह भागवित होत्या.

2009 मध्ये आनंदराव पाटील यांचे निधन झाले. त्यामुळे घराची सर्व जबाबदारी आई सुमन पाटील यांच्यावर आली. स्वकमाईतुन सुमन पाटील यांनी दोन मजली पक्के घरे  बांधले. सुमन पाटील यांचे मुले  दिलीप व रमेश पाटील हे  लग्नानंतर विभक्त होऊन संसाराला लागले.मात्र त्यानंतर तिसरा मुलगा किशोर  हा आईमध्येच राहत होता.

किशोर पाटील याने लग्न झाल्यानंतर घर नावावर करावे म्हणून आई सुमन यांना त्रास देण्यास  सुरवात केली. मारहाण करून धमक्याही दिल्या. याबाबत  सुमन पाटील यांनी दि. 1 डिसेंबर 2016 , 6 जानेवारी 2017 रोजी औद्योगिक वसाहत पोलीस निरीक्षकांकडे तक्रार अर्ज दिला. तसेच अ‍ॅड. बिपीन पाटील यांच्यामार्फत आपल्या मुलाला नोटीसही दिली. मात्र ही नोटीस किशोर पाटील यांनी स्विकारली नाही.  उपविभागीय अधिकारी दीपमाला चौरे यांच्याकडेही सुमन पाटील यांनी तक्रार अर्ज केला.

या बाबत दीपमाला चौरे यांनी सुनावणी घेऊन तीनही मुलांना खुलासा सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दिलीप पाटील व रमेश पाटील यांनी घर कुणाला द्यावे याचा सर्वस्वी निर्णय आईने घ्यावा असा लेखी व तोंडी खुलासा दिला. किशोर पाटील यांनी मात्र तसा कुठलाही खुलासा दिला नाही.

अखेर  चौरे यांनी आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह कल्याण अधिनियम 2007  नुसार निर्वाह अर्जाचे कलम 2(एफ), कलम 4,5,2,3  मधील तरतुदीनुसार तिसरा मुलगा किशोर आनंदा पाटील याला घरात प्रवेशबंदी करण्याचा निर्णय दिला आहे. तसेच छळ करणार्या किशोर पाटील याच्यासह इतर दोनही मुलांना आईला निर्वाह भत्ता म्हणून प्रत्येकी 2500 रूपये असे एकुण 7500 रूपये निर्वाह भत्ता देण्याचेही आदेश दिले आहेत.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!