नोकरी न करता नोकरी देणारे व्हा!

विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात अमेरिकेतील भारतीय उद्योजक डॉ.करंजीकर यांचे प्रतिपादन

0
जळगाव । भारतात उद्योजक होण्यासाठी तरुणांना मोठी संधी आहे. कारण देशाची पन्नास टक्के लोकसंख्या पंचवीस वर्ष वयोगटाच्या आत आहे. उद्योजक होणे म्हणजे केवळ नवीन व्यवसाय सुरु करणे असे नव्हे, तर नवनवीन कल्पना आणि त्या कल्पनांचा सामाजिक उपयोग आवश्यक आहे. परंपरागत विचार न करता नाविन्यपूर्ण विचार करण्याची गरज आहे. नोकरी न करता नोकरी देणारे व्हा, असे आवाहन अमेरिकेतील प्रसिध्द भारतीय उद्योजक डॉ.मुकुंद करंजीकर यांनी शनिवारी बहिणाबाई विद्यापीठाच्या 27 व्या पदवीप्रदान समारंभात केले.

यांची होती उपस्थिती
समारंभाला प्रा.एस.टी.इंगळे, प्राचार्य एल.पी.देशमुख, प्राचार्य डी.एस.सुर्यवंशी, प्रा.नितीन बारी, प्रा.मोहन पावरा, दीपक पाटील, विवेक लोहार, डॉ.जितेंद्र नाईक, डॉ.प्रिती अग्रवाल, प्रभारी वित्त व लेखाधिकारी एस.आर.गोहिल,परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील आदी उपस्थित होते.

पदवीनंतर एक पर्व संपते. विद्यापीठातून जीवनातील यशाचा प्रवास सुरु होतो. तरुणांनी नवकल्पना जास्तीत-जास्त विकसीत करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील व्हावे, असे प्रतिपादन डॉ. करंजीकर यांनी यावेळी केले.

नामविस्तारानंतर हा पहिलाच पदवीप्रदान समारंभ असल्याने त्याला वेगळे महत्व प्राप्त झाल्याचे कुलगुरु पाटील यांनी प्रारंभी नमूद केले. त्यानंतर अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यापीठाच्या गेल्या वर्षभरातील वाटचालीचा आढावा घेतला.

समारंभाला विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे प्रभारी अधिष्ठाता प्राचार्य डी.आर.पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.पी.पी.छाजेड, मानवविज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता प्राचार्य पी.एम.पवार आणि आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता प्राचार्य डॉ.लता मोरे हेही उपस्थित होते.

डॉ. करंजीकर म्हणाले…
सिंथेटिक बायोलॉजी, शाश्वत ऊर्जा, शाश्वत कृषी, हवामानातील बदल, रोबोट, वायरलेस संप्रेषण, डेटा विश्लेषण या क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत.

महाविद्यालयीन मित्र, कुटुंब शिक्षक, सार्वजनिक ठिकाणी भेटणारे लोक यांच्याशी चांगले संबंध ठेवत आपले नेटवर्क विस्तारावे, निर्णय घेताना गोंधळू नका, उत्पादनाची धूर्तपणे विक्री करु नका.

आजच्या युगात ज्ञान विरुध्द अज्ञान, ज्ञानाचे लोकशाहीकरण, ज्ञान व उद्योजकतेमुळे समाजाची भरभराट ही नवीन प्रतीमाने उदयाला आली आहेत.

उद्योजक हा मूलत: जन्माला येत असतो. रात्रभरातून यश प्राप्त होते किंवा भाषा हा उद्योजक होण्यासाठी अडथळा आहे, संसाधने नसलेल्या वातावरणात उद्योजक होणे शक्य नाही अशा काही भ्रामक कल्पना दूर सारण्याची गरज आहे.

90 विद्यार्थ्यांना सुवर्ण
गुणवत्ता यादीतील 90 विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्याहस्ते पदके प्रदान करण्यात आली. डॉ.आशुतोष पाटील, डॉ.विजयप्रकाश शर्मा व प्रा.सुरेखा पालवे यांनी समारंभाचे सूत्रसंचालन केले. सुरुवातीला विद्यापीठाचा मानदंड घेऊन मिरवणुकीच्या अग्रभागी सहायक कुलसचिव एन.टी.निकुंभ होते. प्रा.संजय पत्की व सहकार्‍यांनी विद्यापीठगीत सादर केले.

पित्याला कौतुक गुणवंत लेकीचे
धुळ्याच्या जयहिंद महाविद्यालयाची बीए संस्कृत विषयात प्रथम आलेल्या प्रतिक्षाचे वडिल सुरेश सोनवणे यांनी समारंभ आटोपल्यानंतर विद्यापीठ आवारात पदवी प्रमाणपत्रासह लेकीचे छायाचित्र मोबाईल कॅमेर्‍याने टिपले.

पालकांनाही व्यासपीठावर संधी
विद्यापीठाने गेल्या वर्षापासून वेगवेगळ्या विभागाच्या सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करतांना विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांनाही व्यासपीठावर संधी दिली आहे. प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते विद्यार्थ्यांबराबरच पालकांचाही त्यामुळे सन्मान होतो. या सन्मानाने पालकांचा आनंद व्दिगुणीत होतो.

पदवी प्रमाणपत्र ऑनलाईन
जे विद्यार्थी पदवीप्रदान सोहळ्यात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नाही, असे विद्यार्थी यापुढे विद्यापीठाच्या वेबसाईटवरुन स्वतःच्या लॉगईनमधून आपले पदवी प्रमाणपत्र डाऊनलोड करुन घेवू शकतात. नॅशनल अ‍ॅकेडमिक डिपॉझिटरीच्या माध्यमातून विद्यार्थांना घरपोहच ऑनलाईन डिजीटल पदवी प्रमाणपत्र देण्यास पदवीप्रदान सोहळ्यातून प्रारंभ झाला. सोहळ्यात प्रातिनिधीक स्वरुपात प्रियंका जोधा व संदेश पाटील या दोन विद्यार्थ्यांना डिजीटल प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

लेकरांनी फेडले दिव्यांग पालकांचे पांग
आयुष्यभर कधी, कुठे महत्वाच्या सभा, समारंभाला सन्मानपूर्वक उपस्थित राहण्याचा योग नशिबी न आलेल्या दिव्यांग माता-पित्यांचे पांग शनिवारी गुणवंत विद्यार्थ्यांनी फेडल्याचे चित्र शनिवारी पाहायला मिळाले. ‘सेलिब्रिटी’ म्हणून काही मिनिटे का होईना, सुवर्णपदक विजेत्या लेकरांसह मिळालेल्या सन्मानाने दिव्यांग पालकांबरोबरच ग्रामीण भागातील इतरही अनेक सामान्य पालक भारावलेले दिसून आले. वरील छायाचित्रात एलएलएममध्ये सुवर्णपदक विजेती मणियार महाविद्यालयाची पूजा सुरळकर व खालच्या छायाचित्रात एमए मराठी विषयात प्रथम आलेली शिरपूरच्या एसपीडीएम महाविद्यालयाची रुपाली कुंवर पालकांसह उपस्थित होते.

नरेंद्र अण्णांच्या लेकीला सुवर्णपदक
आयुष्यभर जळगावातील भ्रष्टाचाराविरुद्ध एल्गार पुकारलेले दिवंगत नगरसेवक नरेंद्र भास्कर पाटील यांची कन्या मयुरी हिने एमए इंग्रजीमध्ये सुवर्णपदक मिळविले. आई व काकांसह तिने पदवी स्वीकारली.

मुस्लीम विद्यार्थ्यांची छाप…
पदवीप्रदान सोहळ्यात मुस्लीम विद्यार्थ्यांनीही आपल्या गुणवत्तेची छाप उमटविली. मविप्रच्या यावल महाविद्यालयातील सायमा खान हिने बीए उर्दू विषयात सुवर्णपदक पटकाविले. जामनेरच्या जेटीई महाविद्यालयाच्या इम्रान शेखने बीएस्सी रसायनशास्त्रात, भुसावळच्या नाहाटा महाविद्यालयाच्या इम्राम शेखने एमए इंग्रजीमध्ये तर शाहाद्यासारख्या दुर्गम भागातील पीएसजीव्हीपीएम पटेल कॉलेजच्या मसूद देशमुख याने एमएस्सी भौतिकशास्त्र या विषयात प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक मिळविले.

खानदेशच्या मातीचा योग्य सन्मान
विद्यापीठाचे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असा नामविस्तार करुन शासनाने खान्देशच्या मातीचा आणि समस्त कष्टकरी स्त्री वर्गाचा योग्य सन्मान केला आहे. एका साहित्यिकाचे नाव विद्यापीठाला देण्याची ही पहिलीच घटना आहे. नामविस्तारामुळे विद्यापीठासह खान्देशची जाबाबदारी वाढली असून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सर्वांनी आगामी काळात जोमाने सुरुवात करावी, असे कुलगुरु पाटील यांनी नमूद केले.

पदव्या बहाल
38,912

विद्यान, तंत्रज्ञान
15,631

वाणिज्य
4,466

मानवविद्या
17,788

आंतरविद्याशाखा
1057

पीएच.डी
251

LEAVE A REPLY

*