Type to search

Breaking News जळगाव

अमळनेरचा ‘नाभिक’ जागतिक प्रकाशझोतात

Share

अमळनेर । राजेंद्र पोतदार

आजवर ज्यांना भीक देत आलो व दयेच्या नजरेने बघून त्यास अन्नदान, आर्थिक मदत करून केवळ पुण्य मिळावे, म्हणून खिशात हात टाकणारे कधी मनोरुग्ण, बेवारस, भिकारी लोकांना जवळून भेटले आहात का? नाही ना. मात्र, त्यांना बघून नाक दाबणारे, त्यांच्या किळसवाण्या अवतारामुळे लांबून पैसे फेकून सुटका करून घेणारे आपण रोज पाहतो.

पण असा एक अवलिया आहे, ज्याला किळस न वाटता त्यांची सेवा करण्यात धन्यता वाटते. ज्याने बाबा आमटे व संत गाडगेबाबा यांचा वारसा जपला आहे. असा हा अमळनेर राष्ट्र सेवादलाचा कार्यकर्ता रवींद्र बिरारी अमळनेर पैलाड भागात राहणारा अत्यंत गरिबीत जगणारा कार्यकर्ता.

दिवसभर पोटाची खळगी भरण्यासाठी सलूनवर जाऊन निम्मी पातीवर काम करणे व सायंकाळी राष्ट्र सेवादल शाखेत येऊन समाजवादी संस्कार आत्मसात करणे हा नित्यक्रम.

पण पोटपुरते भरेना म्हणून त्याने मुंबई गाठली.. तिथेही त्याने दुसर्‍या सलूनवर काम करीत स्वतःचा पाय घट्ट रोवला..

टिटवाळा येथे राहायला जागा मिळवून भांडूपला स्वतःचा व्यवसाय स्थिर स्थावर करण्यात त्याने यश मिळविले. परंतु, पोटाची खळगी भरणे हे मर्यादित लक्ष रवींद्र बिरारीसारख्या महान लोकांचे कधीच असू शकत नाही.

रोज लोकलचा प्रवास करताना दिसणारे असली-नकली भिकारी, मनोरुग्ण, अनाथ मुले, महिला यांचे वाढलेले केस दाढी बघून बेचेन झालेल्या बिरारी या तरुणाने आपल्या कंगवा, कैची व वस्तराला धार लावत हेच आपले पुढील कार्य म्हणून ध्येय निश्चित केले व अशा केस, दाढी वाढलेल्या पुरुष, मुलांना व मनोरुग्ण महिलांना त्यांचा खरा चेहरा दाखवायला सुरुवात केली.

अत्यंत विद्रूप दिसणार्‍या लोकांची दाढी-कटिंग करून त्यांना त्यांचे मूळ दर्शन करावे, म्हणून रवींद्र बिरारी आपल्यासोबत आरसादेखील बाळगत असतात. आपला बदललेला चेहरा बघून त्या लोकांच्या चेहर्‍यावर कमालीचे आश्चर्य व समाधान पाहून रवी बिरारी घरची वाट समाधानाने धरतात.

आज व्यवसाय व घरासोबत परिवाराची चिंता मिटली तरी दर सोमवारी स्वखर्चाने रवींद्र बिरारी अशा गरीब गरजू लोकांच्या शोधात मुंबईभर फिरतात व त्यांचे केशवपन, दाढी करून त्यांना स्वच्छ सुंदर करून घाणीतून सोडवितात.

रवींद्र बिरारी यांनी खान्देशच्या अमळनेर शहरात पूज्य साने गुरुजी यांच्या कर्मभूमीत राहून सेवाव्रत स्वीकारले. धडाडीचे सेवादल कार्यकर्ते धनंजय सोनार भारती गाला आदींसोबत ते अमळनेरात होते.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!