Type to search

जळगाव

हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Share

अमळनेर । रणरणत्या मे महिन्यात शेती तयार केली. जून महिन्यात पाऊस पडताच पेरणी केली. लावलेल्या पिकांचे पोटच्या पोरासारखे संगोपन केले. त्या संगोपनानंतर आता फळं मिळण्याची तयारी असतानाच हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला, अशीच परिस्थिती आता तालुक्यातील जवळपास सर्वच शेतकर्‍यांची झाली आहे. शेतकर्‍यांना तातडीच्या मदतीची गरज असताना मात्र राज्यात सत्तेचा खेळ सुरू आहे. दिवाळी अंधारात गेली, आता रोजचे जीवन जगावे कसे? असा प्रश्न बळीराजासमोर पडला आहे.

तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसामुळे सर्वच पिके उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे बळीराजा आर्थिक नुकसानीसोबत आता मानसिक धक्क्यात आहे. राजकीय नेते व अधिकारी पाहणी करून निव्वळ आश्वासने देत आहेत. प्रत्यक्षात पंचनामे किंवा नुकसानभरपाईबाबत ठोस पावले अजूनही उचललेली नाही. अस्मानी संकटामुळे अडचणीत आलेला शेतकरी कृषी व महसूल विभागाच्या दप्तर दिरंगाईने त्रस्त झाला आहे. तालुक्यातील 115 गावांमध्ये 44 हजार 727 शेतकर्‍यांचे 43 हजार 373 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे, असा प्राथमिक अहवाल तहसीलदार मिलिंद वाघ व तालुका कृषी अधिकारी भारत वारे यांनी संयुक्तरीत्या शासनस्तरावर पाठवला आहे.

पीकविमा काढणारा शेतकरी ओल्या दुष्काळातही तांत्रिक अडचणीत सापडू शकतो. 24 तासांत 65 मिमीपेक्षा जास्त पावसाची अट शेतकर्‍यांसाठी मारक ठरू शकते. ऑगस्ट महिन्यात पावसामुळे 6509 शेतकर्‍यांच्या 5598 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. त्यांच्या मदतीसाठी सुमारे सव्वाकोटी रुपयांची मागणी यापूर्वीच प्रशासनाने केली होती. मात्र, नंतर पुन्हा ऑक्टोबर महिन्यात ज्वारी, मका, बाजरी, कपाशी, सोयाबीन ही पिके कापणीवर होती. परंतु, कापणीपूर्वीच आलेल्या पावसामुळे या पिकांनाही कोंब फुटले.

महसूल, पंचायत समिती व कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार संपूर्ण तालुक्यातील पिकांचे नुकसान झाले आहे. पूर्वीची गावे वगळून ऑक्टोबर महिन्यात 115 गावांत 3 हजार 551 हेक्टर क्षेत्रावरील ज्वारी, 33 हजार 101 हेक्टर क्षेत्रातील कपाशी, 4 हजार 859 हेक्टर क्षेत्रातील मका, 1 हजार 251 हेक्टर क्षेत्रावरील बाजरी, 36 हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन व 190 हेक्टर क्षेत्रातील इतर कोरडवाहू पिके तर बागायती क्षेत्रातील 39 हेक्टरवरील ऊस, 346 हेक्टरवरील भाजीपाला आणि 20 हेक्टरवरील केळीचे नुकसान झाले आहे.

प्रत्यक्षात शेती बांधावर पाहणी केली असता, शेतकर्‍यांच्या हातातोंडाला आलेला घास नैसर्गिक आपत्तीने हिरावून नेला आहे. कपाशी, मक्यासारख्या नगदी पिकांचीही डोळ्यादेखत हानी झाली आहे. पूर्वी आकाशात ढग कधी येतील, यासाठी शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी येत होते. आता शेतात सर्वत्र पाणी व सडलेली पिके पाहून बळीराजा खचून गेला आहे. शेतांची इतकी प्रचंड हानी झाली आहे की, उभी पिके जनावरांना चार्‍यासाठीसुद्धा कामात येणारी नाही. उलट शेतात सडलेली व पंचनाम्यासाठी शेतातून न काढल्यामुळे कुजलेली पिके शेतातून फेकण्यासाठी मजूर लागणार आहे. त्यामुळे बळीराजाच्या रिकाम्या झोळीला पुन्हा एक आर्थिक फटका बसणार आहे.

दरम्यान, नवनियुक्त आमदार अनिल पाटील यांनी निकषाकडे दुर्लक्ष करून सरसकट तलाठ्यांकडून पीकपेरा मागवून नुकसानीचा अहवाल सादर करण्याची मागणी केली आहे. वावडे, मांडळमुडीसह तापी बोरी व पांझरा काठासह सर्वच परिसरातील कपाशी, मका, ज्वारी, बाजरी तसेच भुईमूग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्वारी, बाजरी, मका, पिकांच्या कणसांना कोंब फुटले आहेत. आ. अनिल पाटील, आ.स्मिता वाघ यांनी तालुक्यात दौरा केला खरा; मात्र नवीन खासदार उन्मेष पाटील निवडून आल्यानंतर त्यांनी पाडळसरे धरणाची माती आपल्या माथ्याला लावली होती. त्यावेळी मोठमोठ्या आश्वासनांची खैरातही वाटली होती. मात्र, बळीराजाचे अश्रू पुसायला अजूनही त्यांना वेळ मिळला नसल्याने शेतकरीवर्ग संतापला आहे.

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला केराची टोपली
पालकमंत्री गिरीश महाजन व जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सुटीच्या दिवशीही शेतांमध्ये जाऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले. मात्र, तालुक्यातील काही गावांमध्ये उलट परिस्थिती आहे. येथे सुटी नसतानाही मांडळ येथील तलाठी शेतकर्‍यांचे मोबाईल उचलत नाही. तर वावडे येथील तलाठी यांना अद्यापही किती नुकसान झाले, याची आकडेवारी माहीत नाही.

शेतकर्‍यांना निकषात अडकवू नका!
ऑक्टोबर महिन्यात 24 तासांत 65 मिमी पाऊस पडलेला नाही, त्यामुळे निकष शिथिल झाल्याशिवाय मदत मिळू शकत नाही. जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांनी तांत्रिक निकषात शेतकर्‍यांना अडकवू नका, असे स्पष्ट आदेशच दिले आहेत. त्यानंतरही तांत्रिक गोष्टींची पाहणी करून शेतकर्‍यांसमोर अडचणी निर्माण केल्या जात आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!