Type to search

जळगाव

अमळनेर न.पा.प्रशासन अधिकार्‍यावर प्राणघातक हल्ला

Share

अमळनेर । येथील नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी संदीप गायकवाड यांच्यावर शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास धुळे रोडवर तीन व्यक्तींनी धारदार चाकूने भ्याड हल्ला केल्याची घटना घडली. यामुळे अमळनेर शहरासह नगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. हे अधिकारी प्रामाणिक आणि धाडसी असल्याने अनेकांना ते अडचणीचे ठरतात. त्यामुळे त्यांचा काटा काढण्यासाठी तर हा हल्ला झाला नसेल, अशी शंका उपस्थित केली जात असून या हल्लामागील खरे कारण शोधून काढणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. दरम्यान, 3 हल्लेखोरांपैकी 2 संशयीतांना पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले असून पोलीस त्यांची कसून तपासणी घेत आहे.

संदीप गायकवाड हे अमळनेर नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत आहे. ते शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास धुळे मार्गे नाशिक जायला निघाले होते. त्यावेळी मोटारसायकलने आलेल्या तीन जणांनी त्यांना अडवून त्यांचा मोबाइल हिसकवण्याचा प्रयत्न केला. मात्र गायकवाड हे सेवानिवृत्त जवान असल्याने त्यांनी तिघांचा जोरदार प्रतिकार केला. ते प्रतिकार करत असताना त्यांच्यावर त्या तिन्ही अज्ञात व्यक्तींनी चाकू हल्ला चढवला. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर अमळनेर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर धुळे येथे हलवण्यात आले आहे. प्रशासन अधिकारी हे सैन्य दलातून बाँड पूर्ण करीत सेवानिवृत्त झाले होते.

त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षा देऊन नगपरिषद कॅडरमध्ये प्रशासन अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत. अमळनेर नगरपालिकेत त्यांच्याकडे प्रशासन अधिकारी पदाचा पदभार आहे. अत्यंत प्रामाणिक आणि धाडसी अधिकारी म्हणून त्यांची नगरपालिकेच्या वर्तुळात ओळख आहे. त्यामुळेच त्यांच्यावर हल्ला झाल्याची शंका घेतली जात आहे. त्यामुळे प्रामाणिक अधिकार्‍यांवर अशाप्रकारे हल्ला झाल्यास नगरपालिकेत कोणीही अधिकारी काम करण्यास धजणार नाही. तसेच बाहेरून कोणीही अधिकारी अमळनेरात येण्यासाठी दहा वेळा विचार करेल. त्यामुळे या घटनेचा कसून छडा लावणे गरजेचे आहे, असे नपा कर्मचारी संघटनेच्यावतीने कामगार नेते यांनी म्हटले आहे.

हल्ल्यामागील कंगोरे शोधावेत…
प्रशासन अधिकारी गायकवाड यांनी आपला उमेदीचा काळ हा देशसेवेसाठी घालवला आहे. त्यानंतर प्रशासकीय सेवेत ते आले आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणा, पारदर्शकपणे काम करणे हे त्यांच्या अंगवळणी आहे. त्यामुळेच नगरपालिकेत भ्रष्टाचार, चुकीचे काम होताना दिसल्यास त्यांना चिड येते. म्हणूनच अशा कामांना आळा घालण्यासाठी ते आपल्या प्रशासकीय कामातून नेहमी प्रयत्न करीत असतात. यासाठी वरिष्ठपातळीवर देखील ते तक्रारी करून भ्रष्टकामांना मोगरी लावतात. त्यामुळेच ते भल्याभल्यांना अडचणीचे ठरत असल्याने ते अनेकांच्या डोळ्यात खुपतात. तर प्रामाणिक काम करणार्‍यांना ते हिरो वाटतात. त्यामुळे या हल्ल्यामागे कोणता कंगोरा आहे, याचा शोध लागणे महत्त्वाचे आहे. तसेच त्यांच्यावर झालेला भ्याड हल्ल्यातील आरोपींचा पोलिसांनी छडा लावून सत्य समोर आणावे, अशी मागणी अधिकारी, कर्मचारी आणि अमळनेरच्या नागरिकांमधून केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!