राजकीय पक्षांच्या कार्यालयात वाढली गजबज

0
जळगाव । जस-जसा निवडणुकीचा हंगाम जवळ येवू लागला आहे, तस-तशी शहरातील प्रमुख पक्षांच्या जिल्हा कार्यालयांमधील गजबज वाढू लागली आहे. ‘देशदूत’ने भर दुपारी केलेल्या पाहणीत भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली.

लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक पक्षाकडून तयारीला तसेच संघटनात्मक बांधणीला वेग आला आहे. विविध पक्षांकडून कार्यक्रम, मेळाव्यांच्या आयोजनातही वाढ झाली आहे.

भाजपा कार्यालय

बळीराम पेठेतील कार्यालयात भर दुपारीही पाच ते सहा प्रमुख कार्यकर्त्यांसह पदाधिकारी उपस्थित होते. 16 फेब्रुवारीला धुळ्यात होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या नियोजनला वेग आला आहे. या सभेला जळगावातूनही मोठ्या प्रमाणावर गर्दी व्हावी या दृष्टीने कार्यकर्त्यांना फोनवरून निरोप देण्याचे काम सुरू होते. कामे घेवून येणार्‍या नागरिकांचीही वर्दळ होती.

राष्ट्रवादी कार्यालय

आकाशवाणी चौकातील जिल्हा कार्यालयात निवडणूक निरिक्षक करण खलाटे यांच्या उपस्थितीत बैठक तसेच जवाब दो आंदोलनासाठी कार्यकर्त्यांची नेहमीपेक्षा अधिक वर्दळ होती. या चौकातीलच माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या कार्यालयातही मोठी गर्दी होती. बाहेर ‘शंभूराजे’ लिहिलेली कार व सुयोग संस्थेची मुंबईतील पासिंगची नाटकाची बस उभी होती. एरव्ही जिल्हा कार्यालयापेक्षा मजूर फेडरेशनच्या याच कार्यालयात अधिक गर्दी असते. मात्र निवडणुकांचा हंगाम व बैठका, आंदोलन, निरिक्षकांच्या उपस्थितीमुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्येही चैतन्य दिसून आले. तरूण पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी लक्षणीय होती.

काँग्रेस कार्यालय
टॉवर चौकाजवळ मोक्याच्या ठिकाणी असलेल्या कार्यालयात नेहमीप्रमाणेच शुकशुकाटाऐवजी काल थोडी वर्दळ व कार्यकर्त्यांची काहीशी गर्दी बघायला मिळाली. एरव्ही अवतीभवती रस्त्यावर स्टॉल लावणारे काही हॉकर्स काँग्रेस कार्यालयातच सामान ठेवतात, असे कळले. हे कार्यालय फक्त सकाळी आणि सायंकाळीच उघडले जाते.

LEAVE A REPLY

*