मधुमेहदिनाचा इशारा !

0

आज जगभर जागतिक मधुमेहदिन साजरा केला जात आहे. ‘महिला आणि मधुमेह-चांगले आरोग्य हा आमचा हक्कच’ ही संकल्पना यावर्षी केंद्रस्थानी ठेवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेतर्फे जाहीर झालेली आकडेवारी भारतीय जनतेला अस्वस्थ करणारी आहे.

या संघटनेच्या अहवालानुसार सुमारे सात कोटी भारतीयांना मधुमेहाने ग्रासले आहे व ही संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. आधुनिक काळाबरोबर जगभरात चंगळवादी संस्कृती फोफावली आहे. ‘बैठ्या जीवनशैली’चे आकर्षण समाजात वाढत आहे.

बदलत्या जीवनशैलीने माणसाच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. केवळ मधुमेहच नव्हे तर स्थूलता, कॅन्सर, रक्तदाब, हृदयविकार अशा दीर्घकाळ रेंगाळणार्‍या व्याधी माणसाचे जीवन अकाली ग्रासू लागल्या आहेत.

व्यायामाचा अभाव, बदलत्या आहार-विहाराच्या सवयी, व्यसनाधीनता, खाण्यापिण्यातील जिभेचे वाढलेले चोचले, खाण्यापिण्यात नियमितपणा अभाव, निद्रानाश आदी त्याची कारणे तज्ञांनी सांगितली आहेत.

या संकटाशी सामना करण्याचे आव्हान समाजासमोर उभे आहे. देश जागतिक आर्थिक महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत आहे. भारत हा ‘तरुणांचा देश’ म्हणून भारताची ओळख जगाला सांगितली आहे; पण तरुणाईवर समाजमाध्यमांचा अतिरेकी प्रभाव वाढला आहे.

झोपेसारख्या महत्त्वाच्या गरजेकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. आयुर्वेदतज्ञांच्या कथनानुसार शांत निद्रा ही मेंदू व शरीरासाठी उत्तम औषधाचे काम करते.

निद्रानाश अनेक व्याधींचे मूळ आहे. अनेक अहवालांच्या निष्कर्षानुसार तिशीच्या आतच तरुणांना अनेक दुर्धर व्याधींशी सामना करावा लागत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या धोक्याच्या इशार्‍याकडे दुर्लक्ष करण्याची फार मोठी किंमत समाजाला मोजावी लागू शकते. ती वेळ येऊ नये म्हणून योग्य त्या उपायोजना करण्यासाठी समाजहितैषींनी पुढाकार घ्यायला हवा.

समाजात सध्या व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुकवर स्वयंघोषित वैद्यकीय, आरोग्य व योगतज्ञांची चलती आहे. परस्परविरोधी मोफत सल्ल्यांचा भडीमार जनतेवर सुरू आहे.

समाजाच्या आरोग्याचा ठेका आपल्याकडेच आहे, असा त्या सल्लागारांचा समज असावा. त्याचे अंधानुकरण करण्याने आरोग्याचे प्रश्न सुटण्याऐवजी वाढण्याचे नवे संकट ओढवण्याची शक्यता जास्त आहे.

त्यामुळे समाजाने आरोग्याचे सल्ले तज्ञांकडूनच घ्यावेत व त्याची त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी करावी, यासाठी तद्विषयक सामाजिक संस्थांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

*