पाकिस्तानात अस्थिरतेचे पर्व

0

पनामागेटमुळे पायउतार झालेल्या शरीफ यांच्या जागी पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ पक्षाचे शाहिद खाकन अब्बासी यांची हंगामी पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे. त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.

पाकिस्तानमधील लोकशाही सध्या अस्थिर असल्याचे दिसते आहे. पाकिस्तानमध्ये शाहिद खाकन अब्बासी यांची हंगामी पंतप्रधान म्हणून निवड झाली.

मतदानाच्या वेळच्या परिस्थितीवरून सध्या तरी नवाज यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग या पक्षाला आव्हान देण्याची क्षमता कुणातही नाही, हे दिसले.

विरोधकांमध्ये एकवाक्यता नसल्याचे चित्र पुढे आले. निवडणुकीच्या वेळी अनेक सदस्यांनी सभागृहात नवाज शरीफ यांची पोस्टर्स झळकावली.

यावरून नवाज यांची पक्षावर पकड असून त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे काही सहकारी त्यांना सोडून जाण्याची जी चर्चा होती ती सध्या तरी फोल ठरली आहे. अब्बासी हे नवाज यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात.

लेखक – प्रा. डॉ. विजयकुमार पोटे

नवाज यांनी आपले बंधू शाहबाज यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे केले आहे. ते सध्या पाकिस्तानी संसदेचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांना आधी निवडणूक जिंकून संसदेत प्रवेश करावा लागेल.

58 वर्षीय शाहिद अब्बासी हे नवाज शरीफ यांचे अत्यंत विश्वासू आहेत. ते पंजाब प्रांतातून निवडून आले असून आतापर्यंत पाकिस्तानचे पेट्रोलियममंत्री होते.

त्यांचे वडील खाकम अब्बासी हेसुद्धा पाकिस्तानचे पेट्रोलियममंत्री होते. पण 10 एप्रिल 1988 रोजी रावळपिंडीजवळ एका दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

शाहिद अब्बासी सहावेळा निवडून आले आहेत. नवाज यांच्या तिन्ही कार्यकाळादरम्यान त्यांनी मंत्रिपदे भूषवली आहेत. 1997 ते 1999 या काळात अब्बासी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे चेअरमन होते.

1999 मध्ये जनरल परवेझ मुशर्रफ यांनी पाकिस्तानमधील शरीफ यांचे सरकार उलथवून लावले. त्यावेळी अब्बासी यांना अटक करण्यात आली.

ते दोन वर्षे तुरुंगात होते. 2001 मध्ये कोर्टाने त्यांची सुटका केली. आताही त्यांच्यावर दोनशे अब्ज डॉलर्सचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

शाहबाज यांची पंतप्रधान म्हणून निवड झाली तरी त्यांच्याविरोधातही उद्योजकांकडून लाच घेतल्याचा आरोप आहे. त्याविरोधात इम्रान खान यांनी न्यायालयात दावे दाखल केले आहेत.

शाहबाज यांनीही इम्रान खान यांच्याविरोधात बदनामीचे दावे दाखल केले आहेत. नवाज यांच्या पक्षाने इम्रानविरोधातही आरोपांचे सत्र सुरू केले आहे.

पुढच्या वर्षी तेथील संसदेच्या निवडणुका असून तोपर्यंत हे आरोप-प्रत्यारोप सुरूच राहतील. लष्कराला नवाज नको होते. आता लष्करी मुत्सद्दी काय भूमिका घेतात याला महत्त्व आहे.

पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे अध्यक्ष, माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनी सर्वोच्च न्यायालयात खोटी कागदपत्रे दाखल केली, असा आरोप सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीगने (नवाज गट) केला आहे.

नवाज यांना सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवल्यानंतर इम्रान खान यांच्या पक्षाने भ्रष्टाचाराविरोधात पाकिस्तानचा विजय साजरा करण्यासाठी आभारदर्शक दिन साजरा केला होता.

त्यावर टीका करताना पीएमएल-एनचे नेते आसिफ किरमाणी म्हणाले, तेहरिक-ए-इन्साफची रविवारची सभा म्हणजे ‘म्युझिकल नाईट’ होती. इम्रान यांनी पाकिस्तानला संकटात ढकलले आहे.

त्या पक्षाच्या नेत्याला सर्वोच्च न्यायालयात खोटी कागदपत्रे सादर करण्यास काहीच वाटत नाही. इम्रान खान आपली परदेशातील संपत्ती घोषित का करत नाहीत? तुम्ही तुमची संपत्ती का लपवत आहात? या सर्व प्रश्नांची उत्तरे इम्रान खान यांना देशाला द्यावी लागतील.

आमचा पक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करतो पण देशात अजूनही एक न्यायालय आहे, ते म्हणजे देशाचे नागरिक. नवाज त्या न्यायालयात पुन्हा जिंकतील.

विदेशी निधी प्रकरणाशी संबंधित खटल्यात पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने इम्रान खान यांच्याविरोधात सुनावणी सुरू केली आहे.

या प्रकरणी दोषी आढळल्यास इम्रान अपात्र ठरतील. त्यामुळे या खटल्यात सर्वोच्च न्यायालय काय निकाल देते याकडे
पाकिस्तानमधील राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नवाज यांनी कुरकुरत राजीनामा दिला. या निकालाला अपील नसल्याने त्यांचा नाईलाज झाला.

राजकीयदृष्ट्या सर्वात बलाढ्य मानल्या जाणार्‍या शरीफ कुटुंबियांच्या राजवटीचा या निकालामुळे अंत होणार का, असा सवाल चर्चेत आहे.

शरीफ यांची मुले हसन व हुसेन तसेच मुलगी मरियम यांच्यावरही खटले भरण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

मरियम यांनी लंडनमध्ये घेतलेल्या मिळकतींचा कोणताही तपशील किंवा खुलासा, अन्य काही देशांमध्ये केलेल्या गुंतवणुकींबाबतही शरीफ कुटुंब फारसा खुलासा करू शकले नाही.

पाकिस्तानच्या आर्थिक आणि राजकीय नाड्याही नवाज आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हाती होत्या. प्रारंभी लष्कराशी जुळवून घेणारे आणि प्रसंगी त्याच्या बळाचा वापर करून घेणारे नवाज आपल्या राजवटीच्या उत्तरार्धात मात्र लष्कराच्या सामर्थ्यालाच आव्हान देत राहिले.

पाकिस्तानच्या राजकारणावर, समाजकारणावर, अर्थकारणावर असलेला लष्कराचा प्रभाव कमी व्हावा म्हणून प्रयत्नशील राहिले.

पाकिस्तानचे समाजजीवन लष्करापासून मुक्त ठेवण्याचे त्यांचे ध्येय होते. नवाज यांना सध्या पद गमवावे लागले असले तरी ते किती काळासाठी राजकारणाबाहेर राहणार, हाही प्रश्न आहे.

पाकिस्तानी घटनेच्या 62(1)(फ) कलमानुसार नवाज यांना दोषी ठरवण्यात आले आहे. तथापि या कलमात कालमर्यादेचा कोणताही उल्लेख नाही.

त्यामुळे दहा महिन्यांनंतर पाकिस्तानमध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीत ते उतरू शकतात का, यावरही आता तिथे वादंग निर्माण झाले आहे.

विरोधक सध्या गलितगात्र असल्याने प्राप्त परिस्थितीचा फायदा उठवण्याच्या परिस्थितीत नाहीत. इम्रान यांना लष्कराचा पाठिंबा असला तरी जनमताचा कौल नाही, हे त्यांचे दुखणे आहे.

बेनझीर यांचे पती असीफ अली झरदारी आणि त्यांचे चिरंजीव बिलावल पक्ष सावरण्यातही अपयशी ठरत आहेत. अन्य पक्ष प्रादेशिक स्तरावरही अस्तित्वासाठी झुंजत आहेत.

त्यामुळे पाकिस्तानमध्ये सध्या एक विचित्र राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी कोण भरून काढणार आणि तेथील राजकीय कोंडी कशी फुटणार याकडे भारतासह सर्वांचेच लक्ष लागून असणे स्वाभावीक आहे.

नवाज शरीफ यांना पाकिस्तानचे पंतप्रधानपद तिसर्‍यांदा गमवावे लागले याबद्दल पाकिस्तानचे माजी अध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांना सर्वाधिक आनंद झाला आहे.

मुशर्रफ यांना पाकिस्तानमध्ये जाऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे आहे आणि इम्रान खान यांच्या पक्षासमवेत हातमिळवणी करून आपली सत्ता गाजवायचा प्रयत्न करायचा आहे. अर्थात तो यशस्वी होण्याची शक्यता नाही.

शरीफ यांना कसेही करून अडकवायचा डाव याआधीचे लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ यांनी रचला होता. मोदी यांच्या शपथविधीला हजर राहू नका, असे बजावूनही ते हजर राहिले.

मोदी यांच्याशी शरीफ यांची जवळीक तेथील लष्कराला खुपत होती. अमेरिकेच्या इशार्‍यावरून त्यांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली होती. त्यावरूनही लष्कर नाराज होते.

मुशर्रफ यांनी दिलेल्या मुलाखतीतील वक्तव्ये पाहिली तर शरीफ यांचा लष्कराने बळी घेतल्याचे दिसत आहे. यापूर्वीच्या 15 पंतप्रधानांनाही तोच अनुभव आला आहे.

हे सर्व पाहिले तर लष्कर लोकशाही मार्गाने संसदेने निवडलेल्या पंतप्रधानांना काम करू देईल की उठाव करून सत्ता ताब्यात घेईल, हे सांगणे अवघड आहे. भारताला मात्र तेथील घडामोडींवर लक्ष ठेवावे लागेल.

 

 

 

LEAVE A REPLY

*