फुटिरतावाद्यांना लगाम

0

गेल्या काही वर्षांपासून काश्मीर खोर्‍यातील अलगाववादी किंवा फुटिरतावादी नेत्यांविरोधात कारवाई व्हावी अशी मागणी होत होती. कारण याच फुटिरतावाद्यांना पैसे देऊन काश्मीरमधील स्थिती अशांत राखण्याचा प्रयत्न केला जातो.

अर्थातच हा पैसा पाकिस्तानकडून येतो. हा पाकिस्तानच्या युद्धनीतीचा भाग आहे. त्यामुळेच त्याला चाप लावणे गरजेचे ठरले होते.

आता शासनाने या अलगाववादी नेत्यांना मिळणार्‍या मदतीचे मार्ग बंद करत आणले असून त्यांनाही अटक केली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्याच्या आरोपांवरून हुर्रियत कॉन्फरन्सचे सरचिटणीस शब्बीर शाह यांच्यासह सात जणांना राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएनने ताब्यात घेतले आहे.

दुसरीकडे सय्यद अली शाह गिलानीच्या मुलासह दगडफेक करणार्‍या 48 जणांची ओळख पटली आहे. एनआयएने केलेली कारवाई लक्षात घेता पाकिस्तानकडून पैसा घेऊन काश्मीर खोर्‍यात हिंसाचार पसरवणार्‍या फुटिरतावाद्यांची आता खैर नाही, असे चित्र आहे.

पाकिस्तानकडून सीमेवर सातत्याने होणारा गोळीबार आणि काही काश्मिरी युवकांची राष्ट्रद्रोही भूमिका या पार्श्वभूमीवर एनआयएने सुरू केलेली कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. दोषींच्या लवकरात लवकर मुसक्या आवळून दहशतवादी कारवायांना चाप बसवण्याची आता हीच योग्य वेळ आहे.

लेखक – व्ही. के. कौर, जम्मू

हुर्रियत नेत्यांवर आतापर्यंत कधीही ठोस कारवाई झाली नव्हती. आजवर स्थानिकांच्या रोषामुळे स्थानिक यंत्रणा कारवाईबाबत चालढकल करत होत्या. केवळ नजरकैदेत ठेवण्यापुरती कारवाई केली जात होती.

आता मात्र एनआयएनने लक्ष घातल्यामुळे स्थानिक पोलिसांनादेखील बळ मिळाले आहे. यादरम्यान हुर्रियतचे सरचिटणीस शब्बीर शाह हे अंमलबजावणी संचालनालय (ईडी) च्या रडारवर आले असून अन्य सात फुटिरवादी नेत्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे.

येत्या काही दिवसांत आणखी काही नेत्यांची धरपकड होऊ शकते. एनआयएकडून सय्यद अली शाह गिलानीच्या मुलाची चौकशी केली जाणार आहे. काश्मीर खोर्‍यात दगडफेक करणार्‍या 48 युवकांची ओळख पटली आहे. या मुलांना कधीही अटक होऊ शकते.

गेल्या काही महिन्यांत काश्मीर खोर्‍यात अशांतता आणि हिंसाचार वाढलेला लक्षात घेता केंद्र सरकारने एनआयएला आणि अन्य तपास यंत्रणांना हिंसाचार माजवणार्‍या घटकांवर कारवाई करण्याबाबत हिरवा झेंडा दाखवून योग्य निर्णय घेतला आहे. थोडक्यात सरकारने मोकळीक दिली आहे. ती गरजेचीही होती.

शब्बीर शाहला हवालाकांडाच्या ज्या प्रकरणात अटक केली आहे ते प्रकरण दहा वर्षांपूर्वीचे म्हणजेच 2005 सालचे आहे. सध्याची कारवाई पाहता हे प्रकरण हवालापर्यंतच मर्यादित राहू शकेल, असे वाटत नाही. कारण हवालातून पैसा का घेतला, कोणाकडून घेतला या प्रश्नांना हुर्रियतच्या नेत्यास सामोरे जावे लागणार आहे.

काश्मीरमध्ये हिंसाचार माजवण्यासाठी पाकिस्तानचा पैसा हवालामार्फत स्वीकारला जात असेल तर हे प्रकरण केवळ हवालापुरतेच मर्यादित राहत नाही, दहशतवादी कारवायांत सहभागाचा मुद्दादेखील समोर येतो.

यासाठी येेत्या काही काळात एनआयएला या प्रकरणात लक्ष घालावे लागणार, असे दिसते. ज्या सात नेत्यांना तुरुंगात डांबले आहे त्यांच्यावर बेकायदेशीरीत्या पैैसा गोळा करून दहशतवाद्याला पोसण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरवणे आणि दगडफेक करणार्‍यांना पैैसा देण्याचे प्रकरण उजेडात आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली.

चौकशीअंती एनआयएची टीम या मंडळींपर्यंत येऊन पोहोचली. मे महिन्याच्या शेवटी एका वृत्तवाहिनीनेही 16 मे रोजी स्टिंग ऑपरेशन प्रसारित केले होते.

या स्टिंग ऑपरेशनमध्ये हुर्रियत नेता नईम खानने लष्कर-ए-तोयबाकडून पैसा घेतल्याचे कबूल करताना दाखवले गेले आहे. त्यानंतर 3 जूनला देशात 24 ठिकाणी (काश्मीरमध्ये 14, दिल्लीत 8 आणि हरियाणातील सोनीपत येथे 2) छापे मारले.

दिल्लीत आठ हवाला व्यापार्‍यांविरुद्धदेखील कारवाई केली गेली. काश्मीरमध्ये छापेसत्रादरम्यान 2 कोटी रुपये आणि बेकायदेशीर मालमत्तेशी निगडीत असलेली कागदपत्रे जप्त करण्यात आली होती.

त्याचबरोबर लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीनचे लेटरपॅड, लॅपटॉप, पेन ड्राईव्हसह महत्त्वाचे साहित्य हाताशी लागले होते.

गेल्यावर्षी 8 जुलैला दहशतवादी बुर्‍हान वणीला चकमकीत मारल्यानंतर काश्मीर खोर्‍यात हिंसाचार आणि दगडफेकीच्या घटनांत वाढ झाली आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर एनआयएनला फुटिरतावादी नेते आणि दगडफेक करणार्‍या काश्मिरी युवकांविरुद्ध ठोस पुरावे हाती लागले.

फोनवरून झालेल्या चर्चेतून दगडफेक करणारी मंडळी स्थानिक हुर्रियत नेत्याच्या, नेते फुटिरवादी नेत्याच्या संपर्कात असल्याचेही निदर्शनास आले. चौकशीत दहशतवादी फंडिग मोड्यूलचादेखील तपास लागला आहे.

काश्मीरमधील आणि काश्मीरबाहेर राहून सक्रिय असणारे फुटिरवादी स्थानिक नेत्यांना मोठ्या प्रमाणात फंडिंग करत असल्याचे दिसून येते. हे नेते हिंसाचार घडवून आणणार्‍या आणि दगडफेक करणार्‍या युवकांना पैसा पुरवत होते.

या प्रकरणी पुलवामा, अनंतनाग, बडगाम, कुलगाम, अवंतीपुरा, त्राल, शोपियाँ, बारामुल्लासारख्या ठिकाणी असलेल्या युवकांची चौकशी केल्यानंतर एनआयएनने दगडफेक करणार्‍या 48 युवकांची यादी तयार केली आहे. या युवकांविरुद्ध आता कारवाई सुरू होईल.

एनआयएकडे या युवकांची नावे, मोबाईल नंबर, सध्याचा पत्ता, ट्रू कॉलर याचा संपूर्ण लेखाजोखा आहे. वस्तूत: 1990 च्या दशकात हिजबुल मुजाहिदीन आणि अन्य दहशतवादी संघटनांबरोबर आघाडी करून दहशतवाद पसरवणारे अनेक लोक आता काश्मीरमध्ये या कारवायासाठी आर्थिक पुरवठा करणार्‍या नेटवर्कचा भाग बनले आहेत.

तसे पाहिले तर हा प्रकार पहिल्यांदाच समोर आलेला नाही. याचे पुरावे सहा वर्षांपूर्वीच म्हणजेच 2011 मध्ये सापडले होते. जेव्हा एनआयएच्या पथकाने सय्यद अली शाह गिलानीचे कायदेशीर सल्लागार गुलाम मोहंमद बटला अटक केली होती त्याचवेळी दहशतवादी फंडिगची बाब समोर आली होती.

2010 मध्ये काश्मीरमध्ये निदर्शने आणि दगडफेकीचे प्रमाण प्रचंड वाढले होते. यादरम्यान बट याला 2009 ते 2011 या काळात पाकिस्तानकडून दोन कोटीहून अधिक पैसे हवालामार्फत मिळाले होते.

या प्रकरणाचा शोध लागल्यानंतर केलेल्या कारवाईत 2011 मध्ये बटला श्रीनगरच्या बेमिना बायपासवर पैसे घेताना रंगेहाथ पकडले होते.

यावेळी त्याच्यासमवेत मोहंमद सिद्दीक गिनाई नावाचा व्यक्तीदेखील होता. गिनाई 1990 मध्ये पाकिस्तानला पळून गेला होता. त्यानंतर त्याने चौकशीदरम्यान पाकिस्तानमध्ये आयएसआयने प्रशिक्षण दिल्याचे सांगितले.

सध्या 2007 आणि 2011 नाही तर 2017 सुरू आहे. सध्या संपूर्ण देशात हुर्रियतविरुद्ध वातावरण असून सर्वजण कारवाईची प्रतीक्षा करत आहेत.

एनआयएचे पथक ज्या पद्धतीने कारवाई करत आहे त्यातून पाकिस्तानच्या जीवावर काश्मीरमध्ये हिंसाचार आणि फुटिरतावाद पसरवणार्‍या या नेत्यांविरुद्ध चांगलाच फास आवळला गेला आहे.

दहशतवादी संघटना आणि आयएसआयकडून चोरीच्या मार्गाने पैसा गोळा करून आपल्या देशात दहशतवादी कारवाया करणार्‍यांची जागा तुरुंगात आहे.

 

 

LEAVE A REPLY

*