1942 च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाला 75 वर्षे पूर्ण होत असताना ‘2017 : विरोधक फोडो’ आंदोलन आकाराला येत आहे.

नितीशकुमार यांनी भाजपचा हात धरल्याने विरोधी पक्षांच्या महाआघाडीचे स्वप्न विरल्यात जमा झाले. त्यात गुजरातमधील काँग्रेसचे काही आमदार भाजपच्या गोटात आले.

उत्तर प्रदेश, कर्नाटकात विरोधकांत मोठी फूट पाडली जात आहे. फोडाफोडीच्या राजकारणात विरोधकांना पुरते निष्प्रभ केले जात आहे.

राजकीय क्षेत्रात यशाचे वारे कधी कोणाच्या बाजूने वाहिल ते सांगता येत नाही, अशी परिस्थिती आहे. परंतु या वार्‍याची दिशा लक्षात घेऊन त्या दिशेने जाण्यातच शहाणपण आहे, हे राजकीय क्षेत्रातील अनेकांना चांगलेच उमगले आहे.

लेखक – अभय देशपांडे

त्यामुळे ‘खोबरं तिकडं चांगभलं’ या न्यायाने निवडणुकांमध्ये उत्तम यश मिळवण्याची चिन्हे असलेल्या वा चर्चेत असलेल्या पक्षाची वाट धरणे अनेकांचा चुकीचे वाटत नाही.

अलीकडच्या काळात अशा आयाराम, गयारामांची संख्या वाढत चालल्यामुळे पक्षनिष्ठा, पक्षाच्या ध्येय-धोरणाशी प्रामाणिक राहणे या गोष्टी जणू इतिहासजमा होत चालल्या आहेत.

अर्थात कोणत्याही पक्षाला राजकीय वाटचालीत यशापयशाचा सामना करावा लागत असतो. बदल हा निसर्गाचा स्थायीभाव आहे, असे म्हटले जाते.

त्या अनुषंगाने सत्ताधारी बदलत असतात. परंतु असे अपयश वाट्याला आले म्हणून पक्षालाच सोडचिठ्ठी देण्याचा मार्ग कितपत उचित ठरतो? परंतु असा विचार करणेही शहाणपणाचे समजले जात नाही.

खरे तर देशात आजवर बराच काळ काँग्रेसची सत्ता राहिली आहे. स्पष्ट बहुमतासह तसेच आघाडीच्या रूपाने सत्ता उपभोगण्याचा या पक्षाचा नेहमीच प्रयत्न राहिला.

परंतु याही पक्षाला 1977 मध्ये दारूण पराभवाचा सामना करावा लागला. परंतु त्यातून तावून-सुलाखून निघत पक्षाने पुन्हा सत्ता काबीज केली.

या पार्श्वभूमीवर 2014 मधील लोकसभा निवडणुकांमध्ये या पक्षाचा सुपडा पुन्हा एकदा साफ झाला. नरेंद्र मोदी यांच्या झंझावातात काँग्रेसच नव्हे तर अन्य पक्षही हतबल झाल्याचे चित्र समोर आले. त्यानंतर काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांतही भाजपने विजयी घोडदौड सुरूच ठेवली.

तरीही 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अन्य पक्षातून भाजपत आलेले अनेकजण निवडून आले. यावरून भाजपच्या एकूण खासदारांमध्ये निव्वळ पक्षाचे म्हणून खासदार किती आणि हे केवळ भाजपचे यश म्हणायचे का, असाही प्रश्न विचारला गेला.

त्याचबरोबर आता भाजपचे कांँग्रेसीकरण होत चालल्याची टीकाही करण्यात आली, परंतु यावेळी काहीही झाले तरी केंद्रात सत्ता मिळवायची, हा भाजप नेत्यांचा ध्यास होता आणि तो त्यांना पूर्ण करता आला.

त्यानंतर ‘शत-प्रतिशत भाजप’ अशी घोषणा करत विविध राज्यात सत्ता स्थापन करण्याचा चंग भाजपने बांधला. त्यासाठीच्या प्रयत्नात इतर पक्षांचे आमदार, खासदार भाजपच्या गळाला लागत आहेत.

त्यात नितीशकुमार यांच्यासारखा महत्त्वाचा मोहरा भाजपकडे आल्याने या पक्षाचे बळ चांगलेच वाढले आहे. दुसरीकडे विरोधकांची अवस्था आणखी बिकट झाली आहे.

नितीशकुमार यांनी बिहारमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपची साथ घेतली. त्यावर विरोधकांकडून टीका करण्यात आली.

तत्त्वाशी तडजोड न करणार्‍या भाजपसारख्या पक्षाची ही रणनीती कितपत योग्य आहे, असाही प्रश्न विचारला गेला. परंतु त्यावर विचार करायला भाजप नेत्यांकडे वेळ नाही.

नितीशकुमारांच्या सहाय्याने सत्ता बळकावल्यानंतर त्यांचे लक्ष आता कर्नाटककडे लागले आहे. तसेच विरोधी पक्षांत फूट पाडून त्यांची ताकद आणखी क्षीण करण्याचेही प्रयत्न होत आहेत. याच सुमारास तामिळनाडूमधील अण्णा द्रमुकही भाजप आघाडीत सामील होण्याची दाट शक्यता आहे.

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असून या सरकारमधील ऊर्जामंत्री शिवकुमार यांच्याशी संबंधित विविध 39 ठिकाणांवर सीबीआयने नुकत्याच धाडी टाकल्या.

या छाप्यात शिवकुमार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी 5 कोटी रुपयांची रोख रक्कम मिळाल्याचे सांगितले जाते. सध्या गुजरातमधील काँग्रेसमध्ये बंडाळी माजली असून आतापर्यंत सहा आमदारांनी राजीनामे दिले आहेत.

या घडामोडींमुळे काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्यासाठी राज्यसभेची निवडणूक अडचणीची ठरणार आहे. हे लक्षात घेऊन आणखी आमदार फुटून जाऊ नयेत म्हणून त्या सर्वांना बंगळुरूमध्ये हलवण्यात आले असून तिथे आलिशान रिसॉर्टमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

खरे तर गेल्या दहा वर्षांमध्ये काँग्रेसच्या दरबारी राजकारणात अहमद पटेल यांच्याशिवाय पान हालत नसे. कोणाला मंत्री करायचे, कोणाचा पत्ता कापायचा, कोणाला उमेदवारी द्यायची याची सारी सूत्रे अहमदभाईंकडून हलवली जात.

भल्याभल्यांच्या छातीत धडका भरवणार्‍या अहमद पटेल यांची झोपच सध्या उडाली आहे. वाघेला यांच्या बंडानंतर काँग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामे दिले.

भाजपकडे 29 अतिरिक्त मते असून काँग्रेसमधील असंतुष्टांना गळाला लावून अहमद पटेल यांचा पराभव करण्याची भाजपची योजना आहे.

हे लक्षात घेऊनच काँग्रेसने आपल्या आमदारांना बंगळुरूमध्ये हलवले. राष्ट्रपती निवडणुकीत गुजरातमधील काँग्रेस आमदारांची आठ मते फुटली होती.

गुजरातमध्ये सध्या राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने मोठा घोडेबाजार पाहायला मिळत आहे. यासंदर्भात अब्दासा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आणि प्रवक्ते शक्तीसिंह गोहिल यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

सध्या गुजरातमध्ये पूरपरिस्थिती असूनही अनेक आमदार आपल्या मतदारसंघाबाहेर आहेत. कारण भाजपकडून त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

भाजपने यापैकी अनेक आमदारांना 15 कोटी रुपये आणि आगामी निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी देण्याचे आमिष दाखवायला सुरुवात केली आहे.

भाजपकडून आमदारांना लक्ष्य करण्यासाठी प्राप्तिकर विभाग किंवा सीबीआयचे छापे टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोप शक्तीसिंह गोहिल यांनी केला आहे.

बंगळुरूच्या रिसॉर्टमध्ये हलवण्यात आलेल्या आमदारांकडून मोबाईल फोन काढून घेण्यात आले असून त्यांना एकप्रकारे बंदिवासात ठेवल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला.

मात्र गोहिल यांनी हे आरोप फेटाळून लावले. एकंदर गुजरातमध्ये काँग्रेस पक्षातील फाटाफुटीचा पुरेपूर लाभ उठवण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.

गुजरातपाठोपाठ भाजपने उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाचे आमदार फोडले आहेत. आता महाआघाडीला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.

तो म्हणजे शिवपाल यादव यांचा. सपमध्ये झालेल्या संघर्षानंतर सपच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून शिवपाल यादव यांना हटवण्यात आले होते.

आता शिवपाल यादवही भाजपसोबत हातमिळवणी करू शकतात, असा अंदाज राजकीय जाणकारांकडून वर्तवला जात आहे. शिवपाल यादव यांच्यापुढे सध्या दोन पर्याय आहेत.

त्यावर ते आपल्या निकटवर्तीयांशी चर्चा करत आहेत, अशी माहिती समोर आली आहे. शिवपाल यादव यांनीही भाजपशी
हातमिळवणी केल्यास महाआघाडीसाठी तो चांगलाच धक्का असेल.

अखिलेश आणि शिवपाल या काका-पुतण्यामधील राजकीय लढाई देशाने पाहिली आहे. उत्तर प्रदेश निवडणुकांनंतर शिवपाल स्वतःचा पक्ष काढतील, अशी चर्चा होती.

मात्र आता त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी करण्याचे संकेत दिले आहेत. उत्तर प्रदेश विधानसभेत एकहाती सत्ता मिळवल्यानंतर शहा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

यादव आणि जाट समाजातील वजनदार नेत्यांना पक्षात आणण्याचे निर्देश त्यांनी पक्ष पदाधिकार्‍यांना दिले आहेत.
महाराष्ट्रातही काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांमधील अस्वस्थता राष्ट्रपती निवडणुकीनिमित्ताने पाहायला मिळाली.

पुन्हा निवडून येण्यासाठी दोन्ही काँग्रेसमधील काही आमदारांना भाजपचे वेध लागले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार संपर्कात असल्याचा दावा भाजपच्या गोटातून नेहमीच करण्यात येतो.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतील मतांची फाटाफूट पाहता भाजपच्या दाव्यात तथ्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतील काही आमदारांना पुन्हा निवडून येण्याबाबत साशंकता वाटते.

भाजपत प्रवेश केल्यास आपण निवडून येऊ शकतो, असे शहरी भागातील आमदारांचे मत आहे. हेच चित्र आणखी काही दिवस कायम राहिले तर पंजाबची सत्ताही भाजपच्या ताब्यात येईल की का?

 

 

LEAVE A REPLY

*