टमरेल-लोटा बहाद्दरांवर कायद्याचा दंडूकाच उगारा !

0

भारताशेजारील बांग्लादेश 100 टक्के हगणदारी मुक्त, श्रीलंका 99 टक्के, पाकिस्तान 72 आणि भारत 46 टक्के त्यातल्या त्यात महाराष्ट्र 65 टक्के सांगितला जात आहे.

मात्र तरीही गावा-खेड्यांमधून चार पाऊले बसून सरकण्याची रामप्रहरी सर्कस थांबायला तयार नाही. हाती टमरेल… मुखी तंबाखू… आणि सकाळ-संध्याकाळचा व्यवहार गावाबाहेर उरकू! ही गावराण डोकॅलीटी आणि टिपीकल मेंटॅलिटी का बदलत नाही, याविषयीचा जांगळगुत्ता आजच्या चावडीत!

स्वच्छता ही आर्थिक परिस्थितीशी निगडीत असली तरी, ती मनाच्या धारणेविषयी अधिक निगडीत आहे. मात्र कोतावलेल्या मानसिकतेमुळे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी स्वच्छता अभियान छेडले.

परंतु या अभियानाचा प्रत्यक्ष संबंध देशाच्या विकासाशी आहे. हे पटल्यानंतर स्वच्छता अभियानावरील विरोधकांची टिका थांबली.

लेखक-पुषोत्तम गड्डम

मात्र आपण सामान्य भारतीय आपल्या स्वच्छतेच्या बाबतीत कसे मागासलेले आहोत, याचं एक गंमतीदार पण कुठेतरी वाचलेलं उदाहरण सांगायला हरकत नाही.

जॉन केनेडींचा किस्सा?
युनाईटेड स्टेटस्चे 35 वे प्रेसिडेंट जॉन एफ.केनेडी 1961 मध्ये भारत भ्रमंतीवर आले होते. त्यावेळी त्यांचा राजधानी दिल्लीत भव्य-दिव्य सत्कार झाला.

महात्मा गांधींच्या वैचारीक प्रभावाखालील तो कालखंड होता. दिवंगत बापूंच्या ‘भारत खर्‍या अर्थाने पाहायचा असेल तर खेड्याकडे चला’ या विधानाला जॉन केनेडी यांनी गांभीर्याने घेत, भारतातील खेडेगावाला भेट देण्याची ईच्छा प्रकट केली.

त्यानुसार भल्या पहाटेच अर्धा डझन मोटारींचा ताफा राजधानीतून जवळच्या खेड्यांकडे निघाला… खेडेगावाच्या अलिकडे केनेडींची मोटार येताच, रस्त्याच्या दुतर्फा बसलेल्या माता-भगिनी पटापट उभ्या रहायला लागल्या… केनेडींना सदर प्रकार कळला नाही.

त्यांना वाटले आपल्या स्वागतासाठीच हा उपक्रम आहे की काय? …पण पुढील गावातही अनेक लोटाबहाद्दर रस्त्याच्या कडेने हलके होतांना बघीतल्यावर त्यांना खरा अंदाज आला. आणि त्यांनी शेजारी बसलेल्या पंडीत नेहरूंकडे आपली नाराजी व्यक्ती केली.

गांधीजींनी सांगितलेल्या या खेडेगावामध्ये गावकर्‍यांची स्वच्छतेबाबत एवढी अनास्था का? या प्रश्नाचे उत्तर शोधत अखेर केनेडी यु.एस.मध्ये परतले.

परंतु तत्कालीन प्रधानमंत्री पं.नेहरूंना मात्र हा सारा प्रकार अपमानास्पद वाटला आणि त्यांनी त्या अनुषंगाने स्वच्छतेबाबत काही उपाययोजनाही सुरू केल्या. पण अगदी महिनाभरानेच नेहरूजी युनाईटेड स्टेटस्मध्ये दौर्‍यावर गेले.

तेथे झालं-गेलं विसरून केनेडींनी त्यांच्या आदर-सत्कार केला आणि सहज भटकंती म्हणून नेहरूंनी यु.एस.मधील दुर्गम खेडेगावांना सकाळीच भेट देण्याची इच्छा प्रकट केली.

पहाटे अमेरीकेतील खेड्यांबाहेरील वातावरण आल्हाददायक होते. अशा प्रसन्न वातावरणाचा आस्वाद घेतानाच नेहरुजींना रस्त्याच्या थोड्या अंतरावर एक माणूस प्रांतःर्विधीला बसल्याचे दिसले आणि अमेरीकेत सुध्दा लोटाबहाद्दर आहेत… अशा सूचक नजरेने त्यांनी केनेडींकडे बघीतले…. चाणाक्ष केनेडींच्या लक्षात येताच, त्यांनी सुरक्षा कर्मचार्‍यास सदर व्यक्तीस बोलवण्यास धाडले. विधीसाठी उघड्यावर बसलेला व्यक्ती नेहरूंसमोर येताच पंडीतजींना ‘हात दाखवून अवलक्षण’ केल्याची जाणीव झाली… कारण तो व्यक्ती अमेरिकेतील एन.आर.आय.भारतीय होता! हा किस्सा नमुद करण्याच कारण म्हणजे आपल्यातील काही कुठेही गेलेत तरी त्यांची ‘शौच की सोच’ कुठपर्यंत आहे याची जाणिव होते.

महाराष्ट्राच महादुखणं…?
गेल्या अडीच वर्षापासून महानायक अमिताभ बच्चन भारत सरकारच्या स्वच्छता विभागाचे सदिच्छा दूत आहेत. एवढ्या मोठ्या अभिनेत्याला हगणदारीमुक्तीसाठी जाहीरात करावी लागत आहे.

यामध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, ठाणे, भंडारा, पुणे, नागपूर, वर्धा आणि गोंदीया आदिंच्या समावेश आहे. मात्र इथे प्रत्यक्ष गेल्यानंतर आपल्याला सरकारी आकडेवारीचा अंदाज येईल.

गेल्या वर्षात महाराष्ट्रात 19 लाख 17 हजार 670 शौचालये निर्माण केले. गेल्या अडीच वर्षात 40 लाख 51 हजार शौचालये बांधली.

149 तालुके 24 हजार 884 गावे आणि 16 हजार 584 ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झाल्यात. यावरून महाराष्ट्रातील स्वच्छतेचे प्रमाण 35 टक्केवरून 65 टक्केपर्यंत पोहोचल्याचे दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

असे असले तरी गावागावात लोटाबहाद्दर अजूनही रस्त्याच्या कडेला किंवा वेशीबाहेर, शेतात, नदी-नाले, उघड्या माळरानावर व शहरी-निमशहरी भागात बसस्थानकाच्या बाजुला तसेच रेल्वे स्थानकाच्या बाजुला शौचास कसे बसतात, हा चिंतनप्रश्न आहे.

आता कायद्याचा दंडूकाच हवा !
शौचालय बांधण्यासाठी 17 हजारापर्यंत अनुदान…यासह इतरही अनेक योजना स्वच्छता गृहांसंदर्भात शासनाच्या आहेत. मात्र तरीही मोबाईलवर बोलता-बोलता ऊठ-बस करणार्‍यांची संख्या कमी नाही.

यासाठी आता उघड्यावर शौचास बसणार्‍यांना कायद्याचाच धाक वठणीवर आणू शकतो. परवा उस्मानाबाद शहरामध्ये उघड्यावर बसलेल्या 53 जणांना अटक करुन न्यायालयात आणले.

यामध्ये महिलांचाही समावेश होता. न्यायालयाने त्यांना लिंगभेद न करता मुंबई पोलीस अधिनियम जामिनवर मुक्त केले. या घटनेचा परिणाम म्हणजन हे 53 जण थेट शौचालय निर्माण करुनच शांत बसले.

काही बाबतीत आपण कायद्याच्या दंडूक्याशिवाय ठिकाणावर येत नसल्याने ‘गुड मॉर्निंग’ पथकाने अधिक सक्रिय होण्याची गरज आहे.

शौचालय निर्मितीच्या मर्यादा
महाराष्ट्रातील भीषण पाणी टंचाई हा प्रमुख अडसर आहे. शौचालयातील फ्लशसाठी 4 ते 5 लिटर पाण्याचा वापर करावा लागतो. मुक्त हगणदारी रक्तात भिनली असल्यामुळे बर्‍याच ठिकाणी शौचालय असूनही त्याचा वापर केला जात नाही.

बर्‍याच ठिकाणी ग्रामस्थ आणि सरकारी यंत्रणा यांच्यात मांडवली होऊन पैशांची देवाण-घेवाण होते आणि कागदोपत्री शौचालये तयार होऊन निधी हडप केला जातो.

याशिवाय गावकर्‍यांची कोतावलेली मानसिकता शौचालय निर्मितीच्या कामात मोठा अडसर ठरत आहे. प्रत्येकाच्या मनात टॉयलेट एक प्रेमकथा या चित्रपटासारखी विचारसरणी भरल्याशिवाय हा बदल शक्य नाही.

सर्वाधिक कुचंबणा महिलांची
मुक्त हगणदारीचा परिणाम सार्वजनिक आरोग्यावर होतोच, मात्र यामध्ये सर्वाधिक कुचंबना महिलांची होत असल्याचे विदारक वास्तव आहे. ग्रामीण भागात पहाटे किंवा रात्रीच महिला यासाठी बाहेर पडतात.

यामुळे दिवसभर त्यांना या नैसर्गिक विधीवर नियंत्रण ठेवावे लागते. यातून दुर्धर आजार उदभवतात. अंधार्‍या वेळेत विनयभंग घडण्याचे प्रकार वाढतात. अनेक शाळांमध्ये मुलींसाठी शौचालये नाहीत. असली तरी ती शो-पीस आहेत. त्यामुळेही शाळकरी मुलींच्या अडचणी वाढत आहेत.

त्यामुळे गावकर्‍यांनी आपल्या आया-बहिणींच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या आत्मसन्मानासाठी घराघरात शौचालय निर्मिती करणे गरजेचे आहे.

आजच्या युगात खेड्यापाड्यातील लोक महागडे मोबाईल मिरवतात मात्र शौचालयासाठी त्यांच्याकडे पैसा नसतो. ही मानसिकता निश्चितच उपयोगाची नाही!

 

LEAVE A REPLY

*