गांभीर्याचा दुष्काळ !

0
मुलांच्या तुलनेत कमी असलेली मुलींची संख्या वाढावी म्हणून अनेक सामाजिक संस्था प्रयत्नशील आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने याकामी पुढाकार घेऊन विविध योजना जाहीर केल्या असल्या तरी अंमलबजावणीअभावी त्यांचे यश कागदावरच उरणार का? तरीही समाजावरील ‘वंशाच्या दिव्याचा’ अट्टाहास उसळत्या सांस्कृतिक अभिमानाच्या आधारे शालेय पुस्तकातसुद्धा दाखल झाला आहे.
पुण्यातील सुनीता वाघ यांनी संततीसाठी टेस्टट्यूब बेबी तंत्रज्ञानाचा आधार घेतला होता. त्यांना दोन कन्यारत्ने झाली. त्याचा आनंद साजरा करण्याऐवजी पतीकडून सुरू झालेला छळ अनावर झाल्याने सुनीताने आत्महत्या केली.

टेस्टट्यूब बेबीसाठी उपचारांच्या खर्चाचा मोठा भार सुनीता यांच्या मातोश्रींनीच उचलला होता. पुरुषप्रधान संस्कृतीच्या प्रभावामुळे मुलींना कमी लेखण्याची सामाजिक मानसिकता, गर्भलिंग परीक्षणाची उपलब्धता व त्याचा गैरवापर करण्याची प्रवृत्ती यामुळे मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे. त्याचे भीषण दुष्परिणाम समाजाला भोगावे लागत आहेत.

अशीच घटना कोल्हापुरात घडली आहे. कोल्हापूर येथे निराधारांसाठी बालसंकुल व अठरा वर्षांवरील मुलींसाठी आधारगृह चालवले जाते. संस्थेतर्फे तीन मुलींचे विवाह केले जाणार आहेत.

या मुलींशी विवाह करण्यासाठी मुलांची झुंबड उडाली आहे. विवाहासाठी चारशे मुलांनी अर्ज केले आहेत. मुलींच्या सुरक्षिततेसाठी संस्थेने काही महत्त्वाच्या अटी विवाहासाठी निश्चित केल्या आहेत.

त्या अटींची पूर्तता करण्याची तयारीही इच्छुक वरांनी दाखवली आहे. हा सामाजिक बदल किंवा समाज जागरुक झाला आहे, असे मानण्याची चूक जाणते नक्कीच करणार नाहीत. कारण एरवी विवाह ठरवताना वराचे पालक शंभर अटी घालतात.

विशेषत: मुलीचे कूळ-मूळ-पालक-आर्थिक स्थिती-नातेसंबंध हे मुद्दे महत्त्वाचे ठरतात; पण समाजातील मुलींची संख्या घटत असल्याने विवाहासाठी मुली मिळणे दिवसेंदिवस कठीण होत आहे हेच चारशे मुलांच्या अर्जामागचे गमक असेल का? लिंगभेदातील धोका यातून पुरेसा स्पष्ट झाला आहे हे राज्यकर्ते आता तरी लक्षात घेतील का?

राज्यकर्त्यांच्या जनकल्याणाच्या संकल्पनेचा विस्तार फक्त बगलबच्चे आणि नातेवाईंकांपुरताच मर्यादित का झाला असावा? या लक्ष्मणरेषेमुळेच समाजहिताचा विचार करण्यासाठी राज्यकर्त्यांकडे वेळच उरलेला दिसत नाही.

साहजिकच या प्रश्नाचे गांभीर्य दिवसेंदिवस वाढतच आहे. ते लक्षात घेऊन सरकार आता तरी जागे होणार का? की नजीक भविष्यकाळात मुलींची आयातसुद्धा चीनमधून करावी लागणार?

LEAVE A REPLY

*