कायापालटाच्या प्रतीक्षेत

0

भारताच्या विकासाला गती देण्याचे महत्त्वाचे माध्यम म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते. रेल्वेत सुधारणा होण्यासाठी संसदेपासून ते खेड्यातील ओट्यापर्यंत गप्पा होत राहिल्या आहेत.

भारतीय रेल्वेचा प्रवास वेगवान होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना खानपानासंदर्भातील टीकेमुळे यश झाकोळले जात आहे हे संबंधितांच्या लक्षात येईल का?

देशाचा कणा, महत्त्वपूर्ण आधार आणि वाहतुकीचे सशक्त माध्यम म्हणून भारतीय रेल्वेकडे पाहिले जाते. त्यामुळे रेल्वेतील अव्यवस्था आणि ढिसाळपणा हे राष्ट्रीय चिंतेचे कारण ठरते.

रेल्वे प्रवासात जी सर्वात महत्त्वाची गोेष्ट मानली जाते ती म्हणजे जेवण. भारतीय रेल्वेचे जेवण निकृष्ट आणि बेचव असल्याचे अनुभव प्रवाशांना आले आहेत.

प्रसारमाध्यमांनी देखील रेल्वे प्रशासनाच्या अनास्थेबाबत टीका केली आहे. आता तर कॅग अहवालात देखील रेल्वेच्या जेवणाबाबत ताशेरे ओढले आहेत.

लेखक – सूर्यकांत पाठक

भारतीय रेल्वेचा प्रवास वेगवान होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना खानपानासंदर्भातील टीकेमुळे यश झाकोळले जात आहे.

भारतीय रेल्वेला नवा आणि सशक्त भारतनिर्मितीचा आधार मानले जाते. देशाची लाईफलाइन असलेल्या रेल्वेला जागतिक दर्जाची सेवा म्हणून तयार करण्याची सातत्याने रेल्वेप्रशासनाला पंतप्रधान आठवण करून देत आहेत.

सुरेश प्रभू यांना नवनवीन प्रयोग करून रेल्वेत सुधारणा करण्याचे अधिकारही प्रदान करण्यात आले आहेत. रेल्वेतील बदलाबाबत अनेक नामवंत लोकांना सल्लागार म्हणून नेमले आहे.

तरीही रेल्वेतील ढिसाळपणा, संथ गती, असुरक्षितपणा, स्थानकावरील कचर्‍याचे साम्राज्य, निकृष्ट दर्जाचे जेवण, भ्रष्टाचार, तिकिटाचा काळाबाजार, लाचखोरीचे प्रमाण कायम आहे. एकीकडे देश बुलेट ट्रेनचे स्वप्न पाहत आहे तर दुसरीकडे प्रवाशांना पायाभूत सुविधा देखील उपलब्ध नाहीत.

जेवणाचा दर्जा दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. यासाठी ठेकदाराच्या उदासीनतेबरोबरच रेल्वेत असलेला भ्रष्टाचारही तितकाच कारणीभूत मानला जात आहे.

त्यामुळे सुरेश प्रभू यांना आहाराबाबत नवीन निती आणावी लागली, परंतु त्यापासून फारसा फायदा झाला नाही. कॅगच्या ताज्या अहवालानुसार रेल्वेत आणि स्थानकावर प्रवाशांना केवळ महागडेच नव्हे तर गुणवत्ताहीन जेवण दिले जाते आहे.

संसदेत सादर झालेल्या अहवालात म्हटले की, गाड्यात आणि स्थानकावर तयार करण्यात येणारे जेवण हे प्रवाशांना आजारी पाडणारे आहे.

डबाबंद आणि बाटलीबंद वस्तू कालबाह्य झाल्या तरी विकल्या जात आहेत. कॅग आणि रेल्वेच्या संयुक्त पथकाने 74 स्थानक आणि 80 गाड्यांची तपासणी केल्यानंतर अहवाल तयार केला आहे.

रेल्वे व स्थानकातील साफसफाईबाबत अजिबात लक्ष दिले जात नसल्याचेही अहवालात नमूद केले आहे. आहाराविषयक सरकारचे सतत बदलणारे धोरणही त्यास कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.

धोरण बदलत असल्याने केटरिंगची सुविधा देणारा ठेकेदार नेहमीच द्विधा मनःस्थितीत दिसून येतो. तसे पाहिले तर रेल्वेतील खानपानासंबंधी रेल्वेचे निश्चित धोरण आहे.

एमआरपीनुसार खाद्यपदार्थांची विक्री, प्रत्येक किंमत रेल्वे निश्चित करणार, सिलबंद उत्पादने, मिठाई आदीबाबत रेल्वेप्रशासनाच्या धोरणानुसारच विक्री करावी, या गोष्टीचा त्यात समावेश आहे.

मात्र बाजारमूयापेक्षा या वस्तू अधिक किमतीने विकल्या जात असल्याचे समितीच्या लक्षात आले. याप्रकरणात दंड ठोठावूनही प्रवाशांंकडून अधिक किंमत वसूल करण्याचे प्रकार सर्रास सुरूच आहेत.

या अहवालात ठेकदाराकडून होत असलेली मनमानी निदर्शनास येते. रेल्वेतील सुविधांवर देखरेख ठेवण्याचे काम रेल्वे प्रशासनावर असताना ती जबाबदारी चोखपणे पार पाडली जात नाही का? अशी विचारणा केली जात आहे.

भारताच्या विकासाला गती देण्याचे महत्त्वाचे माध्यम म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते. रेल्वेत सुधारणा होण्यासाठी संसदेपासून ते खेड्यातील ओट्यापर्यंत गप्पा होत राहिल्या आहेत.

रेल्वेतील क्रांतिकारी बदल घडवून आणणार्‍या माधवराव सिंदीया यांचा कार्यकाळ आजही आठवतो. तत्कालीन काळात रेल्वेत विशेषत: राजधानी रेल्वेतील जेवणाच्या स्वादाची विशेष चर्चा झाली होती.

त्यानंतर मात्र रेल्वेतील अन्नपदार्थांचा दर्जा घसरतच राहिला आणि तो आजतागायत कायम आहे. राजधानी एक्स्प्रेससारख्या रेल्वेतूनच निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असेल तर सामान्य रेल्वेतील जेवणाच्या दर्जाबाबत विचार न केलेलाच बरा.

तसे पाहिले तर प्रवासी रेल्वेतून प्रवास करताना जे सहन करतात, त्यास अहवालातून दुजोरा मिळाला आहे. काही वर्षांपासून भारतीय रेल्वेला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

परकीय गुंतवणूकदारांना रेल्वेत गुंतवणुकीसाठी आकर्षित केले जात आहे. मात्र या सर्व दीर्घकाळाच्या योजना असून त्यादिशेने आणखी काही प्रयत्न झालेले दिसून येत नाही.

रेल्वे ही सर्वच बाबतीत उणे असताना सुधारण्याचा कसोटीवर उतरण्यास रेल्वेला अडथळे येत आहेत. रेल्वेला व्होट बँकेच्या बाहेर ठेवून सामान्य जनतेशी जोडणे महत्त्वाचे आहे.

रेल्वेला विकासाच्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी सशक्त आणि धोरणी चारित्र्याची गरज आहे. भ्रष्टाचारामुळे राष्ट्रीय जीवनाबरोबरच भारतीय रेल्वेतही विकृती निर्माण झाली आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळवून सात दशके लोटली तरी आज राष्ट्रीय चरित्र निर्माण झालेले नाही. राष्ट्रीय चारित्र्यात दिवसेंदिवस घसरण होत असून साम, दाम, दंड भेद या चारही मार्गाने सर्वकाही मिळवण्याची प्रवृत्ती बळावली आहे.

भारतीय रेल्वेला आधुनिक बनवण्याबरोबरच संवेदनशील आणि शिस्त लावणेही महत्त्वाचे बनले आहे. यासाठी प्रवाशांना जागरुक राहावे लागणार आहे.

रेल्वेत साफसफाई सुरू असताना प्रवाशाने देखील त्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. रेल्वे ही राष्ट्रीय संपत्ती असल्याने प्रवाशांनीही त्याची देखभाल ठेवणे हे त्यांचे कर्तव्य आहे.

रेल्वेत आणि स्थानकावर जेवण कसे तयार केले जाते, हे प्रवासी पाहू शकत नाही. यासाठी रेल्वेप्रशासन कोणावर तरी खापर फोडणारच.

फ्रेट कॉरिडॉर आणि रेल्वेची गती वाढवण्यासंदर्भात महत्त्वाकांक्षी योजना अजूनही जैसे थेच आहेत. अशा स्थितीत रेल्ेवचा कायापालट कधी होणार याची प्रतीक्षा तमाम भारतीयांना आहे. कारण रेल्वेच्या विकासावरच देशाचा विकास अवलंबून आहे.

रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सुुरेश प्रभू यांनी रेल्वेचे प्रभू व्हावे लागेल. अनेक आव्हानांचा सामना करणार्‍या रेल्वेला रुळावर आणण्यासाठी समाधानकारक धोरण तयार करावे लागणार आहे.

प्रत्येक वेळी सबबी सांगून वेळ मारून नेण्याचे धोरण सरकारला सोडून द्यावे लागणार असून प्रवाशांना सकस आहार उपलब्ध करून देण्याबाबत विशेष निर्णय घ्यावे लागणार आहेत.

भारतात रेल्वे ही सर्वात मोठी परिवहन सेवा मानली जाते. प्रवाशाबराबेरच माल नेण्याचेही काम मोठ्या प्रमाणात रेल्वे करते. दररोज लाखो प्रवासी हजारो ट्रेनमधून प्रवास करत असतात.

अत्यावश्यक सेवा प्रवाशांना वेळेवर मिळावी यासाठी गांभीर्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. ठिकठिकाणी तुटलेले रुळ, स्थानक आणि फाटकाची दुरवस्था, रेल्वेचे जुने पूल याकडेही काळजीपूर्वक पाहण्याची गरज आहे.

रेल्वेची संथ गतीदेखील उत्पन्नावर परिणाम करणारी आहे. रेल्वेचे जादा दरदेखील सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत.
रेल्वेच्या तिकिटात आता विमानसेवा उपलब्ध झाल्याने विमान प्रवाशांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे.

तिकिटाच्या प्रमाणात रेल्वेत सुविधा असतात का? हा ही प्रश्न यानिमित्ताने उद्भवतो. जर रेल्वेला सर्वश्रेष्ठ सेवा बनवायची असेली असल तर रेल्वेमंंत्रालयाने संकल्प करण्याची गरज आहे, त्या आधारेच रेल्वे सर्व संकटावर मात करून पुढे वाटचाल करेल.

LEAVE A REPLY

*