भाषाभिमानींना ‘गुलजार’ थप्पड !

0
ज्येष्ठ कवी व गीतकार गुलजार एक बहुआयामी आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहे; पण एवढ्यापुरतीच त्यांची ओळख मर्यादित नाही. त्यांच्यातील लेखक आणि दिग्दर्शकाचे दर्शनही भारतीय रसिकांना भावते.
मनाला साद घालणार्‍या सुमधूर आणि अर्थवाही हिंदी चित्रपट गीतरचनांमधून गुलजार घरोघरी पोहोचले आहेत. काव्य प्रांतात रमणार्‍या गुलजारना देशातील सामाजिक व सांस्कृतिक स्थितीचे उत्तम भान आहे.
भाषावार प्रांतरचना झालेल्या भारतभूमीत अलीकडे भाषिक आणि प्रादेशिक अस्मितांचा गजर वाढीस लागला आहे. भाषांच्या मोठेपणावरून भांडणे वाढवली जात आहेत.

त्याची दखल गुलजार यांनी अचूकपणे घेतली आहे. परवा बंगळुरूतील एका कविसंमेलनात ते सहभागी झाले. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते विविध मुद्यांवर निर्भीडपणे बोलले.

देशातील गढूळलेल्या वातावरणाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. माणुसकीपेक्षा धर्म मोठा झाला आहे. असे वातावरण देशात कधी होते का? असा सवालही त्यांनी केला. आपण राजकीय स्वातंत्र्य मिळवले;

पण सांस्कृतिक स्वातंत्र्य अद्याप मिळवता आलेले नाही. मागासलेल्या मानसिकतेतून आपण बाहेर आलेलोच नाही, असे ते परखडपणे म्हणाले.

‘आपल्या देशात तामिळ, गुजराथी, मराठी, बंगाली यासह अनेक भाषांना प्रादेशिक भाषांचा दर्जा दिला जातो. मात्र या भाषांना ‘प्रादेशिक’ म्हणणे चूक आहे.

या भाषाही देशातील प्रमुख भाषा आहेत. देशात महाविद्यालयीन शिक्षणात इंग्रजी साहित्य शिकवले जाते. मग भारतीय परंपरा का शिकवली जात नाही? आपल्या संस्कृतीशी नाते सांगणारे विषय महाविद्यालयांत शिकवले तर येत्या पिढीला भारतीय संस्कृतीची नीट ओळख होईल’ असे सडेतोड मतही गुलजार यांनी व्यक्त केले.

त्यातून प्रादेशिक भाषांच्या थोरवीचा व देशाच्या विशालतेचा देशवासीयांना नव्याने ‘परिचय’ व्हावा. या भूमिकेने भाषा आणि प्रांतवादाचा पुरस्कार करणारे तथाकथित कैवारी आणि धर्मांधांच्या डोळ्यांत गुलजार यांनी झणझणीत ‘अंजन’च घातले आहे.

आपापल्या भाषांच्या मोठेपणावरून भांडणार्‍या तथाकथित भाषाभिमानींना त्यांची ही सणसणीत चपराक काही शिकवेल का?

‘एक राष्ट्र, एक कर’ अथवा ‘सबका साथ, सबका विकास’ असे नारे दिले जात असताना भाषांना कमी-अधिक का लेखले जाते? सर्वांना समान न्याय असेल तर भाषांना प्रादेशिकतेच्या चौकटीत का बंदिस्त केले जाते?

मराठी, गुजराथीसह सर्वच भाषा ‘राष्ट्रीय भाषा’ असल्याचे सांगून गुलजार यांनी अचूक ‘दिग्दर्शन’ केले आहे. त्याचा विचार सध्याचे भांडखोर भाषाप्रेमी अचूकपणे करू शकतील का?

 

 

LEAVE A REPLY

*