आरोग्य विद्यापीठाचे भव्य यश

0

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 17 वा दीक्षांत समारंभ परवा व्यवस्थित पार पडला. मानसी मयूर गुजराथी व सुलतान मोईनोद्दीन शौकत अली या नाशिकच्याच दोन विद्यार्थ्यांनी तो सोळा सुवर्णपदके मिळवून गाजवला.

दोघेही नाशिकच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी! विविध अभ्यासक्रमांमध्ये गुणवत्ता सिद्ध करत मानसीने सात तर सुलतानने नऊ सुवर्णपदके पटकावली.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाची व नाशिकची शान त्यांनी वाढवली. त्यांच्यासह गुुणवत्ताप्राप्त इतर विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणार्‍या गुरुजनांचे यश कौतुकास्पद आहे.

या सोहळ्यात बोलताना वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी वैद्यकीय क्षेत्रातील ‘कट प्रॅक्टिस’चा उहापोह केला. ‘वैद्यकीय क्षेत्राला कट प्रॅक्टिसचा रोग लागला आहे. यासंदर्भात सरकार लवकरच कायदा करणार आहे.

परंतु अशा प्रकारे कायदा करावा लागणे दुर्दैवी आहे. भावी डॉक्टरांनी कट प्रॅक्टिसपासून दूर राहावे. आजच्या काळात नवनवे आजार उद्भवत आहेत.

भावी डॉक्टरांनी त्या व्याधींवर संशोधन करावे व प्रभावी उपचार शोधून काढावेत’ असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी केले. आजारांचे अचूक निदान करण्याचे कौशल्य डॉक्टरांनी आत्मसात करावे, असा उपदेश अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केला.

वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी दिलेला सल्ला योग्यच आहे. काळ बदलतो आहे तसतसे व्याधींचेही स्वरूप बदलत आहे. नवे साथीचे रोग व नव्या व्याधी उदयाला येत आहेत. समाजातील अनारोग्य त्यामुळे वाढत आहे.

प्रतिजैवकांचा (अ‍ॅण्टिबायोटिक्स) अनिर्बंध वापर वाढल्याने प्रतिजैवकांचा प्रतिरोध (रेझिटन्स) वाढत आहे. अनेक प्रतिजैवके निष्प्रभ ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

या परिस्थितीवर मात करण्यासाठी वैद्यकीय संशोधनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे; पण 1970 सालापासून वैद्यकीय संशोधनासाठी राज्य सरकारतर्फे निधीच दिला गेला नाही, असे का बोलले जाते?

राज्यात संशोधनासाठी पोषक वातावरण तर नाहीच, शिवाय निधीचीही कमतरता, असे निरीक्षण या क्षेत्रातील तज्ञांनी नोंदवले आहे. सध्या पाश्चात्य देशांतील संशोधन प्रमाण मानून उपचारपद्धती अवलंबली जात आहे, असेही तज्ञ म्हणतात.

संशोधनासंबंधीचे हे वास्तव वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनाही माहीत नसावे? की मंत्र्यांनी केवळ उपदेशच करावा, बाकीचे प्रश्न प्रशासन पाहून घेईल हा त्यांचा भ्रम अद्यापही कायम असावा? भावी डॉक्टरांनी या परिस्थितीत नेमका कोणता संदेश घ्यावा? या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळतील का?

LEAVE A REPLY

*