‘अग’तिक ‘अहों’चा ताप

0

महाराष्ट्र शासनाने पहिले महिला धोरण जाहीर केले त्याला आता तेवीस वर्षे झाली आहेत. त्या धोरणात 2001 व 2014 मध्ये कालसुसंगत बदलही केले गेले. स्त्रीविषयक कायदे व धोरण कडक केले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण जारी झाले.

यामागचा शासनाचा हेतू महिला सक्षमीकरणाचा असला तरी घडले वेगळेच! निवडून गेलेल्या बहुतेक महिला लोकप्रतिनिधी विवाहिता आहेत.

त्यामुळे कायद्याने महिलांना दिलेल्या अधिकारांचा वापर त्यांच्या ‘अहों’नी करण्याचा प्रघात रूढ झाला आहे. बिचार्‍या महिला होत्या तितक्याच ‘अग’तिक आहेत.

दिवसेंदिवस स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडल्या गेलेल्या महिला प्रतिनिधींचे ‘झेरॉक्स’ कारभारीच डोईजड ठरू लागले आहेत. आपापल्या घरात पुरुषी वरचढपणा अलीकडच्या काळात फारसा चालत नाही.

ती कसर आता कायद्याने महिलांना दिलेले अधिकार वापरून भरून काढण्याचा केविलवाणा वरचढपणा स्थानिक स्वराज्य संस्थांत ‘दिन दुगुना, रात चौगुना’ या गणिताने वाढत आहे.

आता-आता तर केवळ ‘अहो’च नव्हे तर त्यांचे अन्य कुटुंबियसुद्धा घरात नसलेला आपला दरारा मनपा, जिल्हा परिषदा, नगरपालिका, तालुका पंचायती, ग्रामपंचायती आदींच्या कार्यालयीन कारभारात लुडबूड करून तेथे गाजवू लागले आहेत.

अशा स्वयंघोषित ‘झेरॉक्स’ मंडळींच्या जाचाला त्या-त्या कार्यालयातील अधिकारी मात्र चांगलेच वैतागले असल्याच्या बातम्या येत आहेत.

नाशिक मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयातील अधिकारी ‘झेरॉक्स’ नगरसेवकांच्या उचापतींमुळे भरपूर त्रस्त आहेत. कामाच्या फाईल्सची देवघेव, कामांचा पाठपुरावा, कामांबद्दलच्या कायदेशीर-बेकायदेशीर सूचना करण्यात असे ‘झेरॉक्स’च आघाडीवर आहेत.

त्यामुळे नेमके ऐकावे कोणाचे असा प्रश्न अधिकार्‍यांना पडत आहे. या प्रकारांबद्दल तक्रार करावी तरी पंचाईत आणि न करावी तर ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अधिकार्‍यांना सहन करावा लागत असल्याची कुजबूज कार्यालयात सुरू आहे.

त्यामुळे प्रत्यक्षात नाव महिला प्रतिनिधींचे व गाव ‘अग’तिक महिलांच्या ‘अहों’चे अशी परिस्थिती आढळते. असल्या ‘अहों’ना कुणी ‘जाहो’ असे म्हणायचे हा प्रश्न बहुतेक महिला लोकप्रतिनिधींना नक्कीच डाचत असेल.

पुणे मनपाच्या एका बैठकीला ‘अग’च्या अगोदर ‘अहो’च पोहोचले. त्यांच्या ‘अग’ पोहोचल्यानंतर हे भांडे फुटले. नाशिक मनपात एका ‘अहों’नी ‘अग’च्या देखत आयुक्तांनाच बदलीची धमकी दिली.

हे प्रकरण मिटवण्यासाठी धावाधाव करण्याची वेळ पक्षप्रतिनिधींवर आली होती. ‘अग’तिक ‘अहों’चा हा ताप थांबवण्यासाठी कुणी प्रभावी उपाय सुचवतील का?

LEAVE A REPLY

*