जळगावकरांचे वैरी

0

गेल्या महिनाभरापासून जळगावकरांचे आरोग्य अक्षरशः धोक्यात आले आहे. साथरोगांच्या प्रादुर्भावामुळे हजारो जळगावकर बाधित झाले असतांना प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही, हे संतापजनक आहे.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार शहरात डेंग्युचे 1105 संशयित रुग्ण असले तरी शहरातील सर्वच खासगी रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या दहा हजाराच्या घरात असल्याचे सांगितले जाते आहे.

गेल्या आठवडाभरातच पाच जणांचा मृत्यू झाला आहे. इतकी भयावह स्थिती असतांनाही महापालिकेचे प्रशासन मात्र सुस्तावलेले आहे. शहरात जागोजागी कचर्‍याचे ढिग साचले आहेत. डासांची उत्पत्ती मोठ्याप्रमाणात वाढली आहे. साथरोग बळावले असतांना उपाययोजनेसाठी पैसा कुठून आणायचा यावर चिंतनात महापालिका प्रशासन वेळ दवडते आहे.

उशिरा का होईना जाग आल्याने रविवारी रात्री जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेत तातडीची बैठक घेऊन प्रशासनासह सर्व नगरसेवकांनाही वार्डावार्डात जावून काम करण्याच्या सूचना दिल्या. कामचुकार अधिकार्‍यांना तंबी देऊन कारवाईचा इशाराही दिला.

परिस्थिती आटोक्यात न आल्यास मुंबईच्या डॉक्टरांचे पथक जळगावला आणणार असल्याचेही महाजन यांनी सांगून टाकले. मुळात साथरोगांची भयावह स्थिती निर्माण झाल्यानंतर आता वेळ दवडण्यापेक्षा तातडीने सफाई व फवारणीची कामे हातात घेतली पाहिजेत.

मुंबईचे पथक येईल आणि उपचार करेल यापेक्षा साथ कशी आटोक्यात आणता येईल यासाठी परिणामकारक प्रयत्न झाले पाहिजेत. रस्त्यांच्या डागडुजीसाठी ना. महाजनांनी नव्याने दहा कोटींच्या निधीचे गाजर दाखविले आहे.

रस्त्यांची डागडुजी करा पण त्याआधी जळगावकरांचे आरोग्य सांभाळा असे सांगण्याची वेळ आली आहे. जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकरांकडे जळगावची अतिरिक्त जबाबदारी आहे.

त्यांनी सुरुवातीला ज्या घडाक्यात काम करुन जळगावकरांची मने जिंकली तो उत्साह कुठे मावळला असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महापालिका प्रशासन ढीम्म असतांना माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांनी पदरमोड करुन शहरात फवारणीची कामे सुरु केली आहेत.

प्रशासनासह नगरसेवकांनीही त्यांचे अनुकरण केले पाहिजे. आ. राजूमामा भोळेंना महापालिका हा त्यांचा विषय वाटत नसला तरी त्यांचा मतदारसंघ याच महापालिका हद्दीत येतो, राजकारण कशाचे करावे याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे.

जळगावकरांच्या आरोग्याची काळजी वाहण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, मात्र तेच जळगावकरांचे वैरी असल्यासारखे वागत आहे. नगरसेवकांनीही राजकारणाच्या वर जाऊन हा विषय हाताळावा, ही अपेक्षा आहे.

 

LEAVE A REPLY

*