‘विराट’ सल्ला !

0

‘सध्या मुले मैदानी खेळांपेक्षा व्हिडीओ गेम्स अधिक प्रमाणात खेळतात. सर्वत्र काय घडते आहे याचा आढावा घेण्यासाठी दिवसातील बराचसा वेळ युवा मंडळी समाज माध्यमांवर घालवतात.

हा वेळ मर्यादित ठेवायला हवा. वाचलेला हाच वेळ मग मैदानी खेळांना द्या. ऑनलाईन गेम खेळण्यापेक्षा मैदानावर प्रत्यक्ष खेळ खेळा. शारीरिक तंदुरुस्ती अतिशय महत्त्वाची असते, असा सल्ला भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान विराट कोहली याने दिला आहे.

हा सल्ला फक्त युवकांसाठी नाही तर देशातील प्रत्येक नागरिकासाठी आहे, असेही त्याने म्हटले आहे. तंदुरुस्ती व कौशल्यपूर्ण खेळासाठी कोहली ओळखला जातो.

‘शॉर्ट टेम्पर्ड’ ते संघभावना जपणारा व सहकार्‍यांच्या भावना जाणून घेणारा कप्तान हा कोहलीचा गेल्या काही वर्षांमधला प्रवास प्रत्येक नागरिकांसाठी विलक्षण प्रेरणादायी आहे.

नव्या पिढीने तरी त्याचा सल्ला मनावर घ्यावा, अशी वेळ नक्कीच आली आहे. आभासी जगातील खेळांनी लहानांना झपाटून टाकले आहे.

‘ब्ल्यू व्हेल’सारखे खेळ तरुणांच्या जीवावर उठले आहेत. समाज माध्यमे व मोबाईल प्रेमाचे व्यसनात रूपांतर होऊ लागले आहे. चोवीस तास ऑनलाईन राहणे ही तरुणाईची जणू गरज किंवा व्यसन बनले आहे.

काही अपरिहार्यतेमुळे मोबाईल बंद ठेवावा लागला तरी माणसे मनाने ऑनलाईन राहण्याचा धोका वाढत आहे. या अतिरेकामुळे तरुणाई अनारोग्याच्या विळख्यात सापडण्याचा धोका वाढत आहे.

मधुमेह, कॅन्सर, रक्तदाब यांसारख्या व्याधींना वयाच्या तिशीमध्येच बळी पडणार्‍यांची संख्या वेगाने वाढत आहे. डोकेदुखी, पोटदुखी व डोळ्यांचे विकार ही अनारोग्याची काही लक्षणे सामान्य झाली आहेत; पण एकाग्रतेचा र्‍हास, निद्रानाश, निराशा, शांत झोप न लागणे, एकटेपणा अशा गंभीर मनोविकारांसाठी मानसोपचार घेण्याची वेळ अनेकांवर आली आहे.

मोबाईलमुळे अनेकांना कायमचे बहिरेपण येऊ लागले आहे. विज्ञानाने मोठी झेप घेतलेली असली तरी विज्ञानाला कान मात्र अजूनही तयार करता आलेला नाही.

चॅट करता-करता माणसाचे खासगी आयुष्य चव्हाट्यावर कधी येते हे त्यालाही कळेनासे झाले आहे. माणसाच्या या वेडाचा फायदा राजकारण्यांनी व मनोरंजन क्षेत्रातील मंडळींनी घेतला नसता तरच नवल!

पण या मंडळींचे यामागचे हेतू व डावपेच वेगळे असतात हे तरुणाई ध्यानात कधी घेणार? आजचे युग तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे समाज माध्यमे व मोबाईलचा वापर नकोच, असे सांगणे अव्यवहार्य ठरेल; पण त्याचा वापर तारतम्याने करणे प्रत्येकाला शक्य आहे.

अर्थात स्मार्टफोन हे व्यसन बनते, असे लक्षात येण्यापूर्वी तारतम्य सुचत नाही हे दुर्दैव! आरोग्य हीच खरी श्रीमंती आहे हे लक्षात आणून देण्याकरता जाणत्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

*