कमालीचा पाचवा दणका

0

महिलांच्या आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत खासदार मेरी कोमने पुन्हा एकदा सुवर्ण दणका (गोल्डन पंच) मारला आहे. आशियाई स्पर्धेतील मेरी यांचे हे पाचवे सुवर्णपदक आहे.

महिलेने आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर कितीही यश मिळवले तरी तिला समाजाच्या साचेबद्ध मानसिकतेला सामोरे जावेच लागते. विवाह, अपत्यप्राप्ती, विवाहानंतर आवडीच्या क्षेत्रात राहणार की नाही, याविषयी चर्चा होत राहतात.

तिने सिद्ध केलेली कार्यक्षमता व यशासाठी घेतलेल्या मेहनतीपेक्षा असंबंधित विषयांना बहुधा महत्त्व दिले जाते. मग ती एखादी प्रसिद्ध खेळाडू असो अथवा अभिनेत्री ! मेरी कोमही याला अपवाद नव्हत्या.

त्यांनाही समाजाच्या पठडीबद्ध मानसिकतेचा सामना करावा लागला आहे. अपत्यप्राप्तीनंतर त्यांच्या क्षमतेविषयी शंका उपस्थित केल्या गेल्या, पण महिलांसंदर्भातील समाजाच्या पारंपरिक दृष्टिकोनाला धक्का देत या खासदार महिलेने नवा विक्रम रचला आहे.

तीन अपत्ये, खासदारकी व अनुषंगिक जबाबदार्‍या पार पाडत त्यांनी हे यश मिळवले आहे. ‘माझ्या प्रत्येक पदकामागे संघर्षाची कहाणी दडलेली आहे. मी कार्यक्षम खासदार आहे. मी संसदीय कामकाजात सतत सहभागी असते. क्रीडा क्षेत्राशी संबंधित बैठकांना नियमितपणे उपस्थित राहते. बॉक्सिंग अकादमीकडेही लक्ष देते. तीन अपत्यांचे संगोपन करते. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मी माझ्या कामगिरीवर होऊ दिला नाही’ अशा भावना मेरी यांनी त्यांच्या विजयानंतर व्यक्त केल्या आहेत.

त्या अनेकांसाठी प्रेरणादायी व दिशादर्शक ठरतील. क्रीडा क्षेत्रात कमालीचे राजकारण चालते. मेरी कोमही या सार्‍यातून गेल्या आहेत.

राजकीय साठमारीत अनेक खेळाडूंची कारकीर्द बहरण्याआधीच कोमेजते. खेळाडू आपल्या खेळावर प्रचंड मेहनत घेतात. यशप्राप्तीसाठी अनेक गोष्टींचा त्याग करतात.

तथापि क्रीडा क्षेत्रातील राजकारणामुळे उपेक्षित राहिलेले अनेक प्रतिभावंत खेळाडू भारताच्या कानाकोपर्‍यात आढळतील. त्यांना संधी कशी मिळेल या दृष्टीने खासदार मेरी मार्गदर्शन करू शकतील.

क्रीडा क्षेत्रातील राजकारण आणि अन्य समस्या त्यांना माहीतच असणार. त्या सोडवण्याचे उपाय देखील त्याच अधिकाराने सुचवू शकतील.

खासदार म्हणून त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष होणार नाही, या दृष्टीनेही खासदार मेरी कोम प्रयत्न करतच असतील. त्यातही त्यांना लक्षणीय यश लाभावे यासाठी व मिळवलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल त्यांचे अभिनंदन!

 

LEAVE A REPLY

*