पोलीस प्रतिमेवर काळिमा

0

पोलीस दलाच्या विश्वासार्हतेविषयी शंका निर्माण करणार्‍या घटनांची मालिका आजही का थांबत नाही? गुन्हेगारीला वेसण घालण्याऐवजी अनेक प्रकरणांत पोलीस स्वत:च गुन्हेगाराची भूमिका निभावू लागले आहेत.

कायद्याने दिलेले अधिकार व वर्दीमुळे मिळालेली सत्ता यांचा दुरुपयोग गंभीर गुन्ह्यांसाठी केला जात आहे. पोलीस दलाच्या प्रतिमेला काळिमा फासणारी व संबंधितांची मान शरमेने खाली झुकवणारी घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे.

खंडणीखोरीच्या आरोपाखाली अटक केलेल्या व्यक्तीचा अमानुष मारहाणीमुळे कोठडीत मृत्यू झाला. हे प्रकरण अंगावर शेकू नये म्हणून त्या मृत्यूबाबत वेगळा देखावा रचला गेला.

त्याचे प्रेत एकदा नव्हे दोनदा जाळून टाकायचा प्रयत्नही केला. आतापर्यंत लुबाडणुकीच्या व दरोड्याच्या घटनांमध्ये पोलिसांचा सहभाग आढळून येत होता, पण आता एकाचा जीव घेण्याइतके व ते पाप लपवण्यासाठी बनाव रचण्याइतके निर्ढावलेपण सांगलीच्या पोलिसांनी दाखवले.

हे सारेच भयंकर चिंताजनक आहे. मध्यंतरी दिल्लीच्या रेयॉन इंटरनॅशनल स्कूलमधील दुसरीत शिकणार्‍या प्रद्युम्न ठाकूरच्या अमानुष हत्येचे प्रकरण चांगलेच गाजले होेते.

पोलिसांनी शाळा बसच्या वाहकावर आरोप निश्चित करून त्याला अटक केली होती. या प्रकरणाचा तपास नंतर सीबीआयकडे सोपवण्यात आला.

दहशतीचा वापर करत वाहकाकडून पोलिसांनी जबरदस्तीने गुन्ह्याची कबुली घेतल्याचे सकृतदर्शनी आढळून आले, असे सीबीआय तपास यंत्रणेने म्हटले आहे. पोलीस यंत्रणेने निर्माण केलेली ही भयंकर आणीबाणी आहे.

समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस दलाची असते. समाजव्यवस्था सुरळीत चालू राहायची असेल तर ही व्यवस्था टिकली पाहिजे व सुरळीतपणे चालली पाहिजे, पण त्या वर्दीचा गुन्हे करण्यासाठी व ते लपवण्यासाठी वापर होणार असेल तर जनतेला वाली कोण ?

शासन व्यवस्था अनेक रितीने खिळखिळी करण्याचे उद्योग सत्तेच्या लोभाने चालू असतात. देशाच्या सीमा रक्षणाच्या कामाला प्रतिष्ठा देण्याची जागरूकता अलीकडे बरीच वाढली आहे.

तथापि अंतर्गत राज्य व्यवस्था व समाज स्वास्थ्य पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. या वस्तुस्थितीकडे राज्यकर्त्यांकडून पुरेसे लक्ष दिले गेले नाही तर सर्वत्र अनागोंदी माजेल.

त्या दृष्टीने सांगली पोलिसांकडून घडलेल्या खुनाच्या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेतली जाणार का? एकूणच पोलीस दलाचा कारभार सुधारण्याकडे फार तातडीने व तितक्याच तिडिकेने लक्ष देण्याची गरज आहे हे निर्विवाद!

LEAVE A REPLY

*