जाहिरातींचा भोवरा !

0

शेेतकरी कर्जमुक्ती व शेतकर्‍यांच्या अन्य प्रश्नांबाबतसरकारी धोरणाबद्दल विरोधांचा विरोध समजू शकतो, पण सरकारी जाहिरातीतूनच नवे प्रश्न उभे राहतात तेव्हा अनेक शंकांना वाव मिळतो.

सध्या राज्य सरकारतर्फे ‘मी लाभार्थी’ अशी जाहिरात मोहीम सर्व माध्यमांवर चालू आहे. या मोहिमेमुळे सरकारची जनमानसातील प्रतिमा किती उंचावली हे कळायला मार्ग नाही, पण या जाहिरातीबाबत वेगवेगळ्या माध्यमांतून छापून आलेले वेगवेगळे तपशील जनतेला अधिकच गोंधळात पाडणारे आहेत हे नक्की ! ‘मागेल त्याला शेततळे’ या जाहिरातीत पुरंदर तालुक्यातील भिवरी येथील शेतकरी शांताराम कटके यांचा फोटो छापला जातो. त्याबाबत ‘पुणे मिरर’मध्ये काही वेगळेच छापून आले आहे.

‘शेतात काम करताना सरकारी अधिकारी आले व ग्रामपंचायत कार्यालयात मला घेऊन गेले. शेततळ्याची माहिती घेतली. माझा फोटो काढून ते निघून गेले. हे कशासाठी याची पुसटशी कल्पनाही नव्हती’ असे कटके यांनी म्हटले आहे.

कटकेंना 1 लाख 89 हजार रु. मिळाले. जाहिरातीत मात्र 2 लाख 30 हजार रुपयांचे अनुदान मिळाल्याचे प्रसिद्ध झाले. ही आकडेवारी कुठून मिळाली याबद्दल आपल्याला कल्पना नाही असा खुलासा पुरंदरच्या कृषी अधिकार्‍याने केल्याचे त्या वृत्तात म्हटले आहे.

जाहिरात पाहिल्यावर कटकेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शेततळे अनुदान फडणवीस सरकारकडून मिळाल्याचे मुख्यमंत्र्यांना त्यांनी सांगितल्याचे दैनिक ‘नवशक्ती’च्या वृत्तात म्हटले आहे.

शेततळे अनुदानाबाबत उलट-सुलट माहिती छापून आल्याने माध्यम प्रतिनिधींचा ससेमिरा मागे लागला आहे. शेतात काम करणे अशक्य झाले आहे. घराला कुलूप लावून इतरत्र फिरण्याची वेळ आली आहे.

यातून सुटका करावी, असे साकडे कटके यांनी मुख्यमंत्र्यांना घातल्याचे ‘नवशक्ती’ने म्हटले आहे. यातील सत्यासत्यतेवर फक्त सरकारच प्रकाश टाकू शकेल. तथापि एका सरकारी जाहिरातीमुळे हा घोळ घातला गेला हे मात्र खरे ! घोळ का घातला गेला हे जनतेला कसे समजणार ?

जाहिरात मोहिमेमुळेच सरकारच्या कार्यक्षमतेवर उजेड पडतो, असे नेमके कोणाला व का वाटले असावे ? जाहिरातींमुळेच सरकारच्या कार्याची माहिती जनतेला कळणार असेल तर मग जनतेच्या अनुभवाला काहीच मोल नाही का ? युती सरकार गत सरकारच्या काळातील कामांचे श्रेय लाटण्याचा खटाटोप करत आहे हा विरोधकांचा आरोप सरकारच्या अशा काहिशी दिशाभूल करणार्‍या जाहिराती खरा ठरवत नाही का ?

सरकारनेच निर्माण केलेल्या जाहिरातींच्या भोवर्‍यामुळे सरकारचीच विश्वासार्हता पणास लागली आहे. तर्‍हेतर्‍हेच्या सरकारी जाहिरातींबाबत व त्यातील झालेल्या वा न झालेल्या कामांच्या श्रेयाची ओढाताण करण्यात अकारण शंका व संशयाला सरकारने वाव का द्यावा?

LEAVE A REPLY

*