आरोग्य ही सक्षमतेची गुरुकिल्ली !

0

सातारा जिल्ह्यातील नांदगाव (वेणेगाव) येथील महिला बचतगटाने गृहोद्योगासारख्या पारंपरिक मानसिकतेला सोडचिठ्ठी देत स्वयंसिद्धतेची नवी वाट चोखाळली आहे.

या गावातील सरस्वती माजी सैनिक महिला सहायता बचतगटाच्या सदस्या प्रवासी वाहतूक क्षेत्रात उतरल्या आहेत. या बचतगटाने आराम बस खरेदी केली आहे. एका व्यावसायिकाला ती भाडेतत्त्वावर चालवण्यास दिली आहे. यातून बचतगटाला दरमहा 45 हजारांचे उत्पन्न अपेक्षित आहे.

बस खरेदीसाठी बचतगटाच्या सदस्यांनी काही रकमेचा अतिरिक्त वाटाही स्वखुशीने उचलला आहे. बचतगटांनी फक्त पापड-कुरडया, मिरची-मसाले अशा गृहोपयोगी वस्तुंचेच उत्पादन करावे, असे सामान्यत: मानले जाते.

या गृहितकाला नांदगावच्या बचतगटाने धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रयत्नांचे समाज स्वागत करील व बचतगटाच्या पाठिशी पाठबळ उभे करील, अशी आशा आहे.

महिलांच्या भरारीला दिवसेंदिवस आकाश ठेंगणे होऊ लागले आहे. परिस्थितीशी झुंज देत त्या पुरुषांच्या बरोबरीने उभ्या राहू लागल्या आहेत.

विविध पातळ्यांवर आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत, पण महिलांच्या आरोग्यासंदर्भात जागतिक पोषण आहार अहवालातील निष्कर्ष बरेच चिंताजनक व अस्वस्थ करणारे आहेत.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘जागतिक पोषण आहार 2017’च्या अहवालातील आकडेवारीनुसार माता होण्याच्या वयातील 51 टक्के भारतीय महिलांमध्ये रक्ताची कमतरता असल्याचे निष्पन्न झाले आहे.

22 टक्क्यांहून अधिक वयोवृद्ध महिलांचे वजन अधिक असल्याचे आढळले आहे. महिलांच्या आरोग्याचा प्रश्न सरकारदरबारी नेहमीच दुर्लक्षिला जातो, या आक्षेपावर या अहवालाने शिक्कामोर्तब केले आहे.

महिला स्वत:च्या आरोग्याबाबत फारशाच्या आस्थेवाईक नसतात. त्याचा त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. शारीरिक तक्रारींकडे होता होईल तेवढे दुर्लक्षच करण्याची स्त्रियांची मानसिकता असते.

महिलांचे सक्षमीकरण झालेच पाहिजे, पण त्यापेक्षा त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आरोग्य उत्तम असेल तरच वेगवेगळ्या क्षेत्रात महिलांचे आज जाणवणारे कर्तृत्व अधिक झळाळून उठेल.

आरोग्यपूर्ण व स्वस्थ शरीर हा सर्वात मोठा किमती दागिना आहे. योग्य भोजन, निद्रा, व्यायाम व सकारात्मक मानसिकता यांचा ध्यास महिलांनी घ्यायला हवा.

त्यासाठी वेळेचे नियोजन करायला हवे. स्वत:चे आरोग्य उत्तम राखणे हे महिलांच्याच हातात आहे हे विसरुन कसे चालेल?

LEAVE A REPLY

*