‘युगधर्म’ कसा बदलणार ?

0

कोणत्याही माध्यमातून येनकेन प्रकारेन पैसा मिळवणे व श्रीमंत होणे हाच नव्या जगाचा युगधर्म बनला असावा, याबद्दल आता शंकेला जागा नाही.

महात्मा फुले जीवनदायी योजनेतून अँजिओप्लास्टी करून घेण्यासाठी सटाण्याहून एक रुग्ण नाशिकला आला. वडाळा रस्त्यावर सह्याद्री रुग्णालयात दाखल झाला.

आर्थिक परिस्थिती बेताची आहे हे माहीत असूनही ‘आम्हाला जीवनदायी योजनेचा लाभ नको’ असे त्याच्याकडून रुग्णालयाने लिहून घेतले. नंतर एक लाख पासष्ट हजार रुपयांचे बिलही रुग्णालयाने वसूल केले.

जीवनदायी कार्यालयात तक्रार दाखल केल्यावर चुकीने बिल वसूल झाल्याचे सांगण्याचा साळसूदपणा रुग्णालयाने केला. घेतलेली परत करण्याचे औदार्य दाखवले.

दुसर्‍या घटनेत इंदिरानगर परिसरात खरेदी-विक्री न झालेल्या दुचाकी वाहनांच्या सुट्या भागांची खोटी बिले तयार करून संबंधित विक्रेत्याला फसवण्यात आले. ती बनावट बिले विक्रीकर कार्यालयात दाखलही झाली होती. बोभाटा झाल्यावर आता चौकशी सुरू आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांची एखादी निवडणूक जिंकून नगरसेवक बनणार्‍यांची आर्थिक परिस्थिती अल्लादिनचा दिवा सापडल्यासारखी झपाट्याने बदलते.

कुठलाच व्यापार-उद्योग न करता फक्त सेवेच्या व्यापारातून माणसे करोडपती कशी होतात हे कोडे सामान्य जनतेला उलगडत नाही. समाज माध्यमांवर देवस्थानांच्या जाहिराती झळकू लागल्या आहेत.

वेगवेगळ्या पूजांचे सारे कर्ममांड दाखवणारे व्हिडीओ जाहिरात रूपाने का दाखवले जातात? म्हणजे देव व देवाची भक्ती हासुद्धा दुकानदारीचा विषय का बनवला गेला ?

तब्बल दोनशे अब्ज रुपयांचा मुद्रांक शुल्क घोटाळा करून शासनाला व जनतेला फसवणारा तेलगी नावाचा महापुरुष नुकताच तुरुंगात मेला. तो बहुतेक थेट स्वर्गात पैगंबरांकडेच पोहोचला असावा.

मात्र गावोगावी तेलगीचे अनेक अवतार रोज जन्म घेत आहेत. जनतेची राजरोस लुबाडणूक करत आहेत. ‘काळाबरोबर माणसे बदलली; पण त्यांची वृत्ती मात्र तशीच राहिली’ अशी खंत निवृत्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी परवा नाशिकमध्ये जाहीर भाषणात व्यक्त केली.

अशा न बदलणार्‍या वृत्तीला ‘सनातन संस्कृती’ किंवा ‘युगधर्म’ हे नाव दिले गेले असेल का? परिश्रम न करता श्रीमंत होण्यासाठी लांड्या-लबाड्या, भ्रष्टाचार, जनसामान्यांची फसवणूक व लुबाडणूक हेच या सध्याच्या युगधर्माचे समृद्धी मार्ग बनले आहेत, अशी जनतेची खात्री आता व्हायला हरकत नसावी.

‘आकडेवारी, अनागोंदी व अस्वस्थता हे सद्यस्थितीत महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाचे तीन ‘अ’कार बनले आहेत’ असे शिक्षणशास्त्राचे अभ्यासक किशोर दरक यांनी एका लेखात म्हटले आहे.

त्यांनी शिक्षणक्षेत्रापुरतेच हे मत व्यक्त केले असले तरी दुर्दैवाने परिस्थिती सर्वत्र समान आहे. या एका बाबतीत तर समानतेचे यश कसे नाकारता येईल ?

‘समर्थ जे जे आचरिती, तया लोक धर्म म्हणती’! साहजिकच आदर्श ढासळलेल्या समाजात युगधर्म तरी वेगळा कसा असणार?

 

LEAVE A REPLY

*