जबाबदारी सर्वांचीच !

0

समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडणार्‍या पोलीस यंत्रणेला आव्हान देणार्‍या पुंडाईचे प्रकार वाढू लागले आहेत. नाशिकमध्ये एकाच दिवशी अशा दोन घटना घडल्या.

सिग्नल मोडला म्हणून कारवाई करणार्‍या वाहतूक पोलिसाला दुचाकीस्वाराने बेदम मारहाण केली. शालिमार चौकात वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावणार्‍या पोलिसाच्या अंगावर तर गाडी घालण्याचा प्रयत्न आणखी एका दुचाकीस्वाराने केला.

कार बाजूला घ्यायला सांगणार्‍या फौजदाराला जालना शहरात बेदम मारहाण झाली. व्यवस्थेला आव्हान देणार्‍या व कायदा-सुव्यवस्था धोक्यात आणू पाहणार्‍या अशा घटना का वाढू लागल्या असाव्यात ?

कायदापालन व नियमांची अंमलबजावणी ही दुधारी हत्यारे का ठरू लागली असावीत? नागरिक व पोलिसांकडूनही कायद्याचे उल्लंघन का होऊ लागले ?

कायदापालन कसे आणि कुठे करावे याचे भान सुटत चालल्याच्या वरील घटना निदर्शक आहेत. नको तिथे कायद्याचा बडगा उगारण्याची वृत्ती समाजावर नकारात्मक परिणाम करत असावी का ?

काही काळापासून गुन्हेगारीत पोलिसांचाही सहभाग उघड होऊ लागला आहे. पोलिसांनी दरोडेखोरांच्या मुसक्या आवळायच्या त्यांनीच दरोडे घालण्याचे उघडकीस आले आहेत.

कायदेभंगासाठी जनतेवर कारवाई करणारे पोलीसच कायदा धाब्यावर बसवताना दिसतात. विनाहेल्मेट वाहनचालकांना दंड करणारे पोलीसच अनेकदा विनाहेल्मेट गाडी चालवतात.

त्यांची छायाचित्रे समाजमाध्यमांवर आढळतात. एका दुचाकीस्वाराने अंगावर गाडी घातल्याने वाहतूक पोलिसाच्या पायाचे हाड मोडले होेते; पण दुचाकीस्वार नेमका वाहतूक शाखेतीलच एकाचा नातेवाईक निघाला.

मग गुन्हा फक्त सरकारी कामात अडथळा आणल्याचा नोंदवला गेल्याची चर्चा ऐकायला मिळते. अशा घटना पोलिसांची विश्वासार्हता धोक्यात आणत आहेत. प्रतिमाहनन करत आहेत. पोलीस यंत्रणेत अनेक उणिवा आहेत.

त्या दूर करण्यासाठी कसोशीने प्रयत्न व्हायला हवेत. प्रतिमा संवर्धन व कायद्याचा गैरवापर रोखणे हे पोलिसांच्याच हातात आहे. नागरिकत्वाच्या हक्काचा गैरवापर जनतेने करू नये यासाठी नेतेमंडळींनी पुढाकार घ्यायला हवा.

अन्यथा व्यवस्थेला आव्हान देणारे प्रकार वाढतच जाण्याचा धोका नाकारता येणार नाही. समाजव्यवस्थेचा गाडा सुरळीत चालण्यासाठी व्यवस्था तर टिकलीच पाहिजे.

म्हणून व्यवस्थेला बळकटी देण्याची जबाबदारी व नैतिक कर्तव्य समाजाच्या सर्व घटकांचे आहे, ही जाणीव जबाबदार नेतृत्वच वाढवू शकेल.

LEAVE A REPLY

*