तरुणाई का भरकटते आहे ?

0

नाशिक परिसरातील सुमन पेट्रोलपंप दरोड्याचा मुख्य सूत्रधार कोण असावा? अंदाज चुकल्याशिवाय राहणार नाही. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी त्या गुन्ह्यात पडकला गेला आहे.

तो सधन व्यवसायी कुटुंबातील आहे. मित्रांच्या मदतीने योजना आखून त्याने हा दरोडा टाकला, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

काही काळापासून गुन्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग ही अगदी वेगळीच चिंता समाजापुढे उभी आहे. चोरी-दरोडे यासारखे गंभीर गुन्हे केवळ चैनीसाठी केले जात आहेत.

विद्यार्थीदशेतच या दिशेने प्रगती करणारे तरुण देशाला महासत्ता बनवण्याची जबाबदारी पेलू शकतील का? सधन घरातील तरुणांनादेखील हा जवळचा मार्ग (शॉर्टकट) का हवासा वाटू लागावा ?

एखादा शहाजादा वर्ष-दोन वर्षांत हजारो कोटींच्या उलाढालीचे साम्राज्य उभारतो, अशा हकिगती वाचून अशी प्रेरणा तरुणाईच्या मनात जागी होत असेल का ?

की ज्या पद्धतीने विकासाच्या वाटा चोखाळल्या जात आहेत, त्या बघून आपले भविष्य घडवण्याच्या प्रामाणिक प्रयत्नांवरचा विश्वास अशा तरुणांनी गमावला असावा ?

योजनाबद्ध दरोडे टाकण्याचा मोह अतिआत्मविश्वासातून निर्माण होत असेल की आत्मविश्वास गमावल्यामुळे? महान भारतीय संस्कृतीचा वारसा सांगणार्‍या पिढीचा देशातील शिक्षण पद्धतीतून गुन्हेगारीकडे ओढा वाढत असेल का ?

देशातील तरुणाईच्या जोरावर भारताला महासत्ता बनवण्याचे स्वप्न माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी पाहिले होते. जगातील कोणत्याही देशापेक्षा भारतीय लोकसंख्येत युवकांचे प्रमाण जास्त आहे ही गोष्ट पंतप्रधानदेखील वारंवार सांगत आहेत.

‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्ट अप इंडिया’ अशा अनेक घोषणा होत असल्या तरी त्या योजनांद्वारे आपले भविष्य घडवण्याचा विश्वास तरुणाईला का वाटत नसावा ?

शेकडो विश्ववंद्य संत आणि हजारो आदर्श समाजसुधारकांचा ऐतिहासिक वारसा सांगणार्‍या देशातील तरुणाई का भरकटू लागली आहे ?

विश्वास हरवलेली व आत्मबल पोखरलेली तरुणाई या देशाची ठसठसती जखम बनत जाणार आहे, असा इशारा नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांना का द्यावासा वाटला असेल ?

अनेक उच्चशिक्षित युवक-युवतींच्या वाढत्या आत्महत्या हाही त्या चिंतेचाच दुसरा भाग नाही का? याबाबत केवळ तरुणाईला दोष देणे म्हणजे वास्तवापासून पलायन करणारी आत्मवंचना ठरेल.

देश समृद्ध होत असताना भावी पिढी दिशाभ्रमित होत असेल व त्यांचा जगण्यावरचा विश्वास उडत असेल तर शासन व समाजाने अत्यंत गांभीर्याने दखल घेण्याचा हा अग्रक्रमाचा विषय मानला पाहिजे.

यशाला कोणतेही जवळचे मार्ग नसतात हे सांगण्याचे सामर्थ्य आमच्या शिक्षण पद्धतीत कसे निर्माण होणार, हाही अनुषंघिक प्रश्न दुर्लक्षून चालणार नाही.

LEAVE A REPLY

*