… हसावे की रडावे?

0

भारतात प्राचीन काळापासून वृक्षराजीचे महत्त्व सांगितले गेले आहे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असे संत तुकोबारायांनी सांगितले आहे.

‘जो खांडावया घावो घाली। कां लावणी जयाने केली। दोघा एकचि साउली। वृक्षु दे जैसा॥’ अशा शब्दात संत ज्ञानेश्वरांनी वृक्षांची महती वर्णन केली आहे;

पण झाडांवर भुते राहतात या अंधश्रद्धेपायी संतांच्या उपदेशाकडे पाठ फिरवणारी माणसे आजही झाडांवर घाव घालत आहेत. पिंपळाच्या झाडावर मुंजोबाचा वास असतो, तो माणसांना त्रासदायक ठरू शकतो, अशा भाकडकथेवर विश्वास ठेवणार्‍या काही ग्रामस्थांनी नव्याने लावलेली व चांगली बहरू पाहणारी पिंपळाची काही झाडे उपटून टाकण्याचा गंभीर प्रकार मालेगावात घडला आहे.

तेथील ‘तरुआई’ या संस्थेने मालेगाव शहरातील मसगा महाविद्यालय मार्गावर दोन वर्षांपूर्वी वृक्षारोपण केले होते. वडाची आणि पिंपळाची झाडे लावली होती.

दोन वर्षांत ही झाडे चांगली वाढली होती; पण अंधश्रद्धेने झपाटलेल्या काही ग्रामस्थांनी त्यातील पिंपळाच्या झाडांभोवतीच्या संरक्षक जाळ्या तोडून ती झाडे उपटून टाकली.

समाज माध्यमांवर या घटनेची चर्चा झाल्यानंतर मालेगाव महापालिकेवर टीकेची झोड उठली आहे. कारवाईचा इशारा दिल्यावर स्थानिकांनी उपटलेल्या रोपांचे पुनर्रोपण करण्याची व काही जादा झाडे लावण्याची तयारी दाखवली आहे.

तथापि मुद्दाम लावलेली व काळजी घेतल्यामुळे चांगल्या प्रकारे वाढलेली झाडे तोडून टाकणार्‍या त्या अंधश्रद्ध प्रवृत्तीला काय म्हणावे ?

एकविसाव्या शतकातही भुताखेतांच्या भाकडकथांवर विश्वास ठेवणारे गणंग मालेगावसारख्या शहरातही असावेत ? भुताखेतांवर विश्वास ठेवणार्‍या अशा बावळटांना आज पिंपळाची झाडे तोडाविशी वाटली, त्यांनाच उद्या कदाचित इतरही झाडे भुताखेतांची आश्रयस्थाने वाटू लागतील.

अशांच्या अंधश्रद्धेपायी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाच्या योजनांना धोका निर्माण होणे हाच खरे तर भुताखेतांपेक्षा जिवंत ‘भुतां’चा उपद्रव नव्हे का? भूतखेतरहित झाडे नेमकी कोणती, याचा शोध घेण्यासाठी वनखात्याने आणि महापालिकेने कोणत्या तज्ञांकडे जाण्याची गरज आहे ?

आयुर्वेदातील औषधोपचार मुख्यत्वे वृक्षवेलींच्या वापरावर आधारलेले आहेत. काही वृक्षांचा तर मुळापासून पानापर्यंत प्रत्येक अवयव उपयुक्त ठरवला आहे. काही जातींचे वृक्ष ग्रामीण भागात रोजगाराचे साधन बनले आहेत.

मानवी शरीराच्या पोषणासाठी आवश्यक असलेले सर्व मसाल्यांचे पदार्थ ही कुठल्या ना कुठल्या वृक्षांची मानवाला दिलेली देणगी आहे. या सर्व वास्तवाकडे दुर्लक्ष करून अंधश्रद्धा जोपासणार्‍या मुर्खांनी केलेली वृक्षतोड हा अक्षम्य गुन्हाच नव्हे का? अशा वेड्यांना हसावे की रडावे?

 

LEAVE A REPLY

*