सावध ऐका पुढल्या हाका !

0

लातूर जिल्ह्यात लिंगायत समाजाचा वधू-वर मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्यात प्रीती अबेसंगे या तरुणीने व्यक्त केलेल्या भावना समाजाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणार्‍या आणि भयावह वास्तवावर प्रकाश टाकणार्‍या आहेत.

राज्य आरोग्य विभागाच्या अहवालानुसार राज्यात एक हजार मुलांमागे मुलींंचे प्रमाण 899 इतकेच आहे. परिणामी मुलांच्या विवाहाचा प्रश्न दिवसेंदिवस अवघड होत आहे.

इतकी वर्षे मुलींच्या लग्नाची चिंता पालकांना करावी लागत होती. हळूहळू परिस्थिती बदलली आहे. पालकांना सध्या मुलाच्या लग्नाची चिंता सतावत आहे. आई-वडिलांनी मुलींना चांगले शिक्षण देण्याचे काम करावे.

पालक आपल्या मुलीला रोपट्याप्रमाणे सांभाळतात. हे रोपटे मोठे झाल्यानंतर सासरच्या घरी त्या रोपट्याचे पुनर्रोपण होते. हे रोपटे कोमेजणार नाही याची काळजी आता सासरच्या मंडळींंनी घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रीतीने आत्मविश्वासाने ठणकावून सांगितले.

भारतीय समाजात विवाहयोग्य तरुणीवर अनेक बंधने लादली जातात. तिची प्रत्येक कृती ‘पराया धन’ या चौकटीतच जोखली जाते. वधू-वर मेळाव्यात तरुणीने मंचावर जाऊन बोलणे समाजाला आजही मानवत नाही.

या पार्श्वभूमीवर प्रीतीने पालकांचे कान टोचण्याचे दाखवलेले धाडस अभिनंदनीय आहे. त्यात केवळ भावनांचे उद्रेकी प्रगटीकरण नाही.

तिने व्यक्त केलेल्या भावनांना औरंगाबाद येथील एका घटनेने दुजोरा मिळाला आहे. औरंगाबादच्या सातारा परिसरात भगवानबाबा बालिकाश्रम आहे.

या आश्रमातील एका मुलीच्या विवाहासाठी दीडशे तरुणांनी अर्ज दाखल केले आहेत. मुलींच्या विवाहासाठी विचारणा करणार्‍यांची संख्या गेल्या पाच वर्षांत तिपटीने वाढल्याचे आश्रम संचालकांनी सांगितले.

कोल्हापूरमधील बालसंकुल संचालकांचाही अनुभव तसाच आहे. येथील तीन मुलींना मागणी घालणारे चारशे मुलांचे अर्ज आले होते.

मुलगा निर्व्यसनी असावा, कुटुंब सुशिक्षित व अनाथ मुलीचा मनापासून स्वीकार करणारे असावे, मुलाला स्वत:चे घर हवे, नोकरी सरकारी किंवा खासगी असली तरी चांगला पगार असावा, शेती असेल तर उत्तमच अशा अनेक अटी मुलींच्या वतीने ठेवल्या गेल्या होत्या.

त्याही मान्य करण्याची तयारी अनेक मुलांच्या पालकांनी दाखवली होती. तथापि समाजातील मुलांच्या पालकांची मानसिकता अद्याप जुन्या आठवणीत रेंगाळत आहे.

मुलीच्या पालकांना आजही दुय्यम समजून वागवले जाते, पण वास्तव नेमके काय आहे हे आता प्रीतीसारख्या तरुणींनाही उमजले आहे.

वरचष्मा दाखवण्याचा मुलाच्या पालकांचा चष्मा परिस्थितीच्या गरजेप्रमाणे बदलला नाही तर अनाथ मुलींसाठी संस्थांकडे दाखल होणार्‍या अर्जांची संख्या शेकड्यातून हजाराकडे जायला फार काळ लागेल, असे वाटते का?

LEAVE A REPLY

*