मराठी भाषेबद्दल खरी आस्था !

0

सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात नेवरी गावच्या सुनील चव्हाण या तरुणाने मराठी भाषा संवर्धनासाठी अनोखी वाचक चळवळ रुजवण्याचा प्रयत्न आरंभला आहे.

त्यासाठी त्याने ‘मराठी साहित्य भेट’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील वाचनालयांना एक लाख पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले आहे.

भालचंद्र नेमाडे यांच्या ‘कोसला’ने आपल्याला वाचनाची आवड लागली. मराठी भाषेची व जतनाची प्रक्रिया वाचनवाढीने सुरू होऊ शकते, अशी भावना चव्हाण यांनी व्यक्त केली व वाचन चळवळीचा हा प्रयोग सीमा भागात अंमलात आणण्यास सुरुवात केली.

ज्या गावात वाचनालय होते तिथे पुस्तकरूपाने मदत करायची. ज्या गावात वाचनालय नाही तिथे मराठी तरुण एकत्र करत त्यांच्या पुढाकारातून वाचनालय सुरू करायचे, असा त्यांचा उपक्रम गेली अनेक वर्षे सुरू आहे.

मायबोली मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला त्यालाही आता बरीच वर्षे झाली; पण आजच्या घडीला मराठी भाषा दिवसेंदिवस अधिकच गर्तेत जात आहे.

भाषांच्या यादीत मराठीचे स्थान कोणते आहे यापेक्षा मनामनातून ती हद्दपार होत आहे. पर्यटकांशी किंवा परराज्यातील पाहुण्यांशी कोलकातात बंगालीत किंवा गुजरातमध्ये गुजराथीतच संवादाचा प्रारंभ केला जातो.

इतर अनेक राज्यांतही स्थानिक भाषेतच संभाषण सुरू करण्यात कोणालाही कमीपणा वाटत नाही. मग मराठी माणसांनाच मराठी भाषेचा न्यूनगंड का वाटावा ?

मराठी भाषा संवर्धनात शालेय शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे; पण मराठी शाळांचे अस्तित्वच सध्या धोक्यात आहे. गावोगावी विद्यार्थ्यांअभावी मराठी शाळा बंद पडत आहेत.

पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे कल वाढत आहे. व्याकरणाबद्दलची अनास्था मराठीच्या अवकळेला मोठा हातभार लावत आहे. परिणामी मराठी शाळा व मराठी भाषेची वेगाने घसरण सुरू आहे;

पण ठरवले तर मराठी भाषेचे संवर्धन व संगोपन होऊ शकते, हा आशावाद सुनील चव्हाणच्या प्रयोगाने मराठी मनात जागा व्हायला मदत व्हावी; पण त्याचे एकट्याचे प्रयत्न किती पुरेसे ठरतील ?

त्याला मराठी भाषिकांनीदेखील साथ द्यायला हवी. दैनंदिन व्यवहारात व घराघरांत बोलीभाषेचाच वापर कटाक्षपूर्वक झाला पाहिजे. बोलीभाषेत उत्तम साहित्याची निर्मिती व प्रसाराला शासनानेही प्रोत्साहन द्यायला हवे.

मुलांच्या हाती दर्जेदार मराठी साहित्य देण्याचे पालकांनीही मनावर घेतले पाहिजे. मंथनाअंती असे अनेक व्यवहार्य उपाय पुढे येतील.

राजकीय पोळी भाजण्यासाठी मराठीचा वापर करणार्‍या नेतेमंडळींचे भाषेवरील प्रेम केवळ दिखाऊ असते हे मुंबई शहरातील मराठी शाळांच्या दुर्दशेने केव्हाच उघड झाले आहे.

त्यामुळे जे काही करायचे ते समाजालाच करावे लागणार आहे. ‘मराठी साहित्य भेट योजना’ हा त्यासाठी व्यक्तिगत पातळीवरचा एक चांगला उपक्रम आहे. सुनील चव्हाणांचे त्यासाठी अभिनंदन!

LEAVE A REPLY

*