अनुदान आयोगाची स्वागतार्ह सूचना

0

विद्यापीठांच्या नावात धर्माचा उल्लेख केल्यामुळे धर्मनिरपेक्षतेला बाधा येते. त्यामुुळे बनारस हिंदू विद्यापीठ व अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या नावातून अनुक्रमे हिंदू व मुस्लिम हे शब्द वगळावेत, अशी सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) केंद्र सरकारला केली आहे.

अनुक्रमे काशी विद्यापीठ व अलिगढ विद्यापीठ असे संबोधले जाऊ शकते, असे मत आयोगाने व्यक्त केले आहे. दहा केंद्रीय विद्यापीठांतील अनियमिततेची चौकशी करण्यासाठी आयोगाने समिती नेमली होती.

या समितीनेही विद्यापीठांच्या नावातील धर्माचे उल्लेख टाळावेत, असे म्हटले आहे. सर्वधर्मसमभाव व धर्मनिरपेक्षता हीच भारताची ओळख आहे. या दोन्ही विद्यापीठांना शंभर-सव्वाशे वर्षांचा इतिहास आहे.

धर्मनिरपेक्ष भारतात मानवता आणि गुणवत्तेला प्राधान्य दिले जाणे समितीला व अनुदान आयोगाला अभिप्रेत असावे. देशाला थोर समाजसुधारकांचा आणि संतांचा वारसा लाभला आहे.

त्यांनी नेहमीच मानवता धर्माचा पुरस्कार केला आहे. माणसाने माणसाला माणूस म्हणून वागवावे, माणसातच परमेश्वर पाहावा व माणुसकी जोपासून मानवधर्माची अनुभूती घ्यावी, असा उपदेश संतांनी केला आहे.

संत चक्रधर स्वामींनी ‘मनुुष्य होऊनी असावे’ असे चिंतन केले आहे. ‘मानवता हीच मानवाची खरी जात’ असे संत रोहिदासांनी म्हटले आहे.

संत गाडगेबाबा आपल्या आचरणातून आयुष्यभर मानवधर्माची उपासना करत राहिले. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज अशा अनेक समाजसुधारकांनी समाजातील जात हद्दपार करण्यासाठी कष्ट उपसले आहेत.

मानवी जीवनातून फक्त जात किंवा धर्म हे शब्द हद्दपार होणे पुरेसे नाही. मनातूनही हे भेद हद्दपार व्हायला हवे आहेत. आयोगाची सूचना अंमलात आणणे ही त्या बदलाची उत्तम सुरुवात ठरू शकेल.

शिक्षणाने माणसाची विचारशक्ती व तर्कशक्ती जागरुक होते असे मानले जाते. विद्यार्थ्यांमध्ये सर्वधर्मसमभाव व समानतेची बीजे पेरण्याचे महत्कार्य पार पाडणार्‍या शैक्षणिक संस्थांची तरी धर्माच्या नावाने ओळख असू नये ही अनुदान आयोगाची अपेक्षा रास्त आहे.

अनुदान आयोगाची सूचना अंमलात आणण्यासाठी जबरदस्त राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. विद्यापीठांच्या नावातून शब्द वगळण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारपुढे नाही व सरकारचा तसा विचारही नाही, ही केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांची घाईची प्रतिक्रिया सरकारची याविषयीची भूमिका असेल का ? कदाचित असेलही.

असे असले तरी सध्याच्या धार्मिक विद्वेषाच्या हिंसक वातावरणात आयोगाने अशी सूचना करण्याचे धाडस दाखवले ते अभिनंदनीय व देशभक्तीची बूज ठेवणारे आहे.

 

LEAVE A REPLY

*