रेल्वेतील सरंजामी थाटाला कात्री !

0

रेेल्वे अधिकार्‍यांसाठी गेली 36 वर्षे लागू असलेला शिष्टाचार (प्रोटोकॉल) मागे घेण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयाने काढले आहेत. यापुढे रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व सदस्यांच्या भेटीप्रसंगी अधिकार्‍यांना उपस्थित राहावे लागणार नाही.

रेल्वेच्या अधिकार्‍यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू स्वीकारता येणार नाहीत. रेल्वेतील चतुर्थश्रेणी सेवकांनी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या घरी काम करण्याची परंपरा रूढ आहे. सद्यस्थितीत असे तीस हजार सेवक असावेत, असा अंदाज सांगितला जातो.

यापुढे ती अघोषित परंपरा निकाली काढली जाईल. चतुर्थश्रेणी सेवक आपापल्या कामावर रुजू होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

ऐषोआरामी प्रवासाचा त्याग करत वरिष्ठ अधिकार्‍यांना रेल्वेच्या नियमित डब्यांमधूनच प्रवास करावा लागणार आहे. हे सगळे बदल तातडीने अंमलात आणले जातील.

वर्षानुवर्षे अंगवळणी पडलेला शाही सरंजाम सुधारण्याचा रेल्वेने चालवलेला हा प्रयत्न अत्यंत अभिनंदनीय आहे. समर्थ लोकशाही व्यवस्थेसाठी भारत देश जगभर नावाजला जात असला तरी नोकरशाही व राजकारणाला पडलेला सरंजामीचा विळखा फारसा सैल झालेला नाही.

मोगल सम्राटांच्या कारकीर्दीत सुरू झालेले ते सोपस्कार ‘काप गेले तरी भोके राहिली’ या म्हणीप्रमाणे सरकारी कारभारात जागोजागी रुतलेले आहेत.

सरकारी फर्मानांनी कागदी समानतेवर शिक्कामोर्तब केले तरी नोकरशाही व नेत्यांच्या मनातील सरंजामी सवयी हद्दपार करण्यासाठी निरंतर प्रयत्नांचीच आवश्यकता आहे.

हा प्रश्न एकट्या रेल्वे खात्यापुरता मर्यादित नाही. अंगवळणी पडलेली सरंजामी कोणालाही सोडवत नाही. कारण इतरांपेक्षा वेगळेपण दाखवण्याची सुप्त इच्छा लहानथोरांच्या मनात असतेच असते.

त्यामुळे कनिष्ठ सरकारी सेवकांनी ‘साहेबां’च्या घरी राबणे हा अनेक वरिष्ठ आपला हक्कच समजतात. साहेबांचा आदेश पटत नसला तरी सेवकांचा नाईलाज होतो. साहेबांच्या मेहेरबानीचा काटा अनुकूल ठेवण्यासाठीच कनिष्ठ सेवक परिस्थितीशरण वागतात (आणि वाकतातसुद्धा!).

रेल्वे मंत्रालयाच्या नव्या फर्मानामुळे रेल्वे खात्यापुरता परिस्थितीत चांगला बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बदलाचे हे वारे रेल्वेपुरते मर्यादित राहू नये.

अनेक सरकारी खात्यांनी काळानुरूप बदलत सरंजामीला राम-राम ठोकण्याची गरजच आहे. अर्थात ही समानतेची बांधिलकी मनामनातून तयारी होण्याची गरज आहे.

शासन-प्रशासनातील वरिष्ठांकडूनसुद्धा त्यासाठी देखाव्याची विनम्रता टाळून पुरेशी लवचिकता स्वीकारली जावी, ही कुणाही लोकशाहीवादी नागरिकाची इच्छा असेल.

LEAVE A REPLY

*