सामाजिक सुधारणांची काटेरी वाट

0

समानतेचे वारे आता देवस्थानांच्या व्यवस्थापनातही वाहू लागले आहेत. केरळच्या प्रख्यात त्रावणकोर मंदिर देवस्थानने अभिनंदनीय पायंडा पाडण्याचा निर्णय घेतला आहे.

मंदिराच्या पुजार्‍यांच्या यादीत सहा अनुसूचित जाती व जमातीच्या व्यक्तींचा समावेश केला आहे. पुरोहितांच्या त्या यादीत एकूण 36 पुजारी ब्राह्मणेतर असणार आहेत.

या नियुक्त्या राज्यसेवा आयोगामार्फत करण्यात आल्या आहेत. दक्षिणेकडील देवस्थाने रुढी आणि कर्मकांडांचे पालन करण्यात आग्रही मानली जातात.

या पार्श्वभूमीवर त्रावणकोर देवस्थानचा निर्णय क्रांतिकारी सुधारणा घडवणारा निश्चितच आहे. राज्य कोणतेही असो; भारतीय समाज रुढी-परंपराप्रिय आहे.

समाजातील अनिष्ट रुढी-परंपरांचे व चालीरितींचे उच्चाटन करण्यासाठी समाजसुधारकांनी, संतांनी हयातभर प्रयत्न केले. हालापेष्टा सोसल्या. मानहानी सहन केली.

तरीही अनेक समाजहितैषींनी आजही हे प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. या सामूहिक प्रयत्नांना काहीअंशी यश प्राप्त होत असले तरी स्पृश्यास्पृश्यता, जातीपाती, उच्च-नीच भेदाभेदांची मगरमिठी अजूनही पुरेशी सैल झालेली नाही.

बदलायची तयारी केरळातील देवस्थानाकडून दाखवली असताना जनतेतील मंत्रचळ अजूनही फारसा का थांबत नसावा? पालकांचे आणि एका मांत्रिकाचे प्रताप नुकतेच मालेगाव परिसरातील म्हाळदे शिवारात उघडकीस आले आहेत.

तरुणाला भूतबाधा झाल्याच्या संशयावरून पालकांनी त्याला तथाकथित मांत्रिकाच्या दरबारात दाखल केले. मांत्रिकाने त्याला उग्र दर्पाची अनेक औषधे पाजली. मारहाण केली. त्याला बांधून ठेवण्यात आले होते. त्यामुळे तरुणाची प्रकृती अत्यवस्थ झाली व त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आता त्याच पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मांत्रिकाला ताब्यात घेतले आहे. समाजातील अंधश्रद्धा निर्मूलनासाठी नरेंद्र दाभोळकरांनी आपले प्राण वेचले.

संत साहित्यातून धर्मभोळ्या अंधश्रद्धांवर अत्यंत कडक शब्दांत प्रहार करून समाजजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आढळतो.

समाजातील तथाकथित बाबा-बुवा आणि मांत्रिकांचे सोंग अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अनेकदा उघडकीला आणले आहे. तरीही हे नसते उद्योग थांबलेले नाहीत.

मालेगाव घटनेत मांत्रिकाचा दोष आहेच; पण तरुणाला त्याच्याकडे घेऊन जाणारे पालकही तितकेच दोषी नाहीत का? सामाजिक सुधारणांची वाट किती काटेरी आहे आणि त्यासाठी निरंतर प्रयत्न हाच एकमेव उपाय आहे, हेच मालेगावच्या दुर्दैवी घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे.

LEAVE A REPLY

*