वा रे दिल्लीतील कायदा-रक्षक !

0

प्रभू रामचंद्रांचे नाव बदनाम करणारे समाजातील पुष्कळ तथाकथित राम सध्या तुरुंगाची हवा खात आहेत. अशा फक्त चौदा गणंगांना आखाडा परिषदेने ‘भोंदू’ जाहीर करण्याचा भोंदूपणा केला आहे;

पण स्वयंघोषित राधे माँ मात्र अजून सरकार दरबारी (किंवा सरकारी कृपेने) त्यात नसाव्यात, अशी राजधानीतील पोलिसांना खात्री असावी. कदाचित ‘राजधानी’ या शब्दात ‘रा’ व ‘धा’ या दोन्ही अक्षरांचा समावेश आहे;

म्हणून राधे माँवर अद्याप सरकारी कृपापात्र असावी, असाही दिल्ली पोलिसांचा समज असावा. साहजिकच परवा अचानक ही तथाकथित राधा दिल्लीतील विवेकविहार पोलीस ठाण्यात दाखल झाली आणि काय नवल !

तिथल्या ठाणे अंमलदाराने आपली अधिकृत सरकारी खुर्ची राधेला सुपूर्द केली. पोलीस सर्व कर्मचारी तिच्या दर्शनाला उत्सुक होते. कमालीच्या भक्तिभावाने खुर्चीत बसलेल्या राधेभोवती त्यांनी फेर धरला होता. (अर्थात हा फेर म्हणजे पोलिसांची रासलीला नव्हे!)

आपल्या कनिष्ठ सरकार्‍यांना व नागरिकांनासुद्धा गुन्हेगार किंवा आरोपीची वागणूक देण्यात निष्णात असलेले त्या विवेकी ठाण्याचे विवेकी अधिकारीसुद्धा नम्रपणे राधेच्या आदेशाची आतूरतेने वाट बघत होते.

हा राधा नावाचा महिमा की उचंबळून आलेला भक्तिभाव म्हणावा? या राधेला पोलीस ठाण्यात जावेसे वाटले यामागे आणखी काही नवीन कारणे आहेत का ?

या प्रसंगाचे चित्रिकरण समाजामाध्यमांवर प्रसारित होताच संबंधित ‘विवेक विहारी’ ठाण्याच्या पोलिसांबद्दल चौकशीचे आदेश दिले गेले आहेत. कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची असते.

कायदा मोडणार्‍यांना जरब बसवण्याचे कामही पोलीसच करतात. तोच न्याय पोलिसांना लावला जाईल का? की राधेच्या भक्तीत कर्तव्य विसरलेल्या पोलिसांनादेखील जनतेसाठी कधीच न आढळणार्‍या सौजन्याचे पाठ पुन्हा द्यावे लागणार ?

सरकारी सेवक, मग ते कुठल्याही खात्याचे असोेत; त्यांच्याबद्दल होणार्‍या चौकशांचे फलित काय होणार हे आता जनतेला कळून चुकले आहे.

जनतेला भेडसावणार्‍या चिंता, काळज्या व कामाच्या जबाबदारीचे ओझे पोलिसांच्या मन:स्वास्थ्यावर ताण पडायला कारणीभूत होतच असतील.

कदाचित तेही यावर उपाय शोधत असतील. तरीही उपायासाठी तथाकथित दांभिक साधू-संतांच्या नादी त्यांनी लागावे का ?

खुद्द पोलीस ठाण्यातच भक्तीचे असे जाहीर प्रदर्शन करणार्‍या पोलिसांना व अंमलदाराला साधा सारासार विवेकसुद्धा नसावा ?

पोलीस म्हणजे कायद्याचे रक्षक! तेच जर या प्रकारे भोंदूभक्तीत कर्तव्यच्यूत होऊ लागले तर जनतेला किती दिलासा देऊ शकतील ?

तुरुंगात असलेल्या आसाराम आणि राम रहीम यांच्या आशीर्वादाला मोठमोठे नेतेसुद्धा भुकेले असत. त्या देशातील सरकारी अधिकारी आणि पोलिसांना तरी किती दोष देता येईल?

LEAVE A REPLY

*