उत्सवी पर्वाचे प्रागतिक पायंडे

0
गणेशोत्सवाच्या उत्सवी आणि उत्साही पर्वाचा समारोप शांततेत व सुखासमाधानात पार पडला. यंदाच्या गणेश विसर्जन सोहळ्याने काही चांगले पायंडे पाडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
यंत्रणा व पोलीस प्रशासनाने जनतेशी ताळमेळ साधत बदल करण्याचे प्रयत्न केले तर ते यशस्वी होतात, हा संदेश यानिमित्ताने दिला गेला आहे. गणेश विसर्जनाची मिरवणूक डीजेच्या दणदणाटापासून मुक्त असावी, ती दुपारी बारा वाजता सुरू होऊन लवकर संपावी यासाठी मनपा व पोलीस प्रशासनाने विशेष प्रयत्न केले.
ते बर्‍याच प्रमाणात यशस्वी झाले आहेत. दोन-तीन मंडळांनी डीजेच्या वापराचा धिंगाणा चालू ठेवण्याचा केलेला प्रयत्न जनतेला आवडला नाही. बहुसंख्य मंडळांनी पारंपरिक वाद्यांनाच प्राधान्य दिले.

मिरवणूक मार्गावर ढोल-ताशांचाच गजर होता. नागरिकांनी त्याचा मनसोक्त आनंद लुटला. हजारो लोक मिरवणुकीत सहभागी होतात. एखादी किरकोळ घटनाही रंगांचा बेरंग करणारी ठरू शकते, हे लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने विशेष दक्षता बाळगली होती. त्यामुळेच नाशिककरांना घरच्या गणपतीबाप्पांचे शांततेत विसर्जन करता आले.

‘नाशिकची मिरवणूक उशिराच संपली’ असे कुत्सितपणे बोलले जात असले तरी ती दरवर्षीच्या नियत वेळेपेक्षा दोन-तीन तास आधी सुरू झाली, हेही नसे थोडके! यावेळी शाडू मातीच्या मूर्तींची मागणी वाढली होती, असे निरीक्षण विक्रेत्यांनी नोंदवले आहे.

गणेशोत्सवाला पर्यावरणपूरक स्वरूप बहाल करण्यासाठी मनपा प्रशासनासह अनेक सामाजिक संस्थांनी कंबर कसली होती. मनपाने ठिकठिकाणी कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती केली होती.

गंगाघाटावर मूर्ती दान करण्याचे व निर्माल्य कलशातच निर्माल्य सोडण्याचे आवाहन केले जात होते. त्याला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. दीड लाखावर मूर्तींचे दान करण्यात आले.

जनतेच्या भावनांना ठेच पोहोचणार नाही, अशा पद्धतीने संकलित मूर्तींचे विसर्जन करण्याची दक्षता मनपा प्रशासन घेईलच. उत्सवांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे.

जागरुकता वाढत आहे हेच यातून लक्षात येते. जागरुकतेचा पायंडा पुढे सुरूच राहिला व समज वाढीला लागली तर सुजाण नागरिक म्हणवून घेण्यास जनता नक्कीच पात्र ठरेल.

कसलेही गालबोट न लावता विसर्जन पार पडल्याने बाप्पादेखील नक्कीच सुखावले असतील. निरोप घेताना त्यांनी जनतेला व यंत्रणेला धन्यवाद दिले असतील. बाप्पांच्या वतीने ‘देशदूत’कडून सर्व संबंधितांचे अभिनंदन !

 

LEAVE A REPLY

*