जनतेचे आरोग्य वेठीला ?

0
उत्तर प्रदेशमधील फर्रुखाबाद जिल्हा रुग्णालयात गेल्या महिनाभरात 49 नवजात मुलांचा मृत्यू झाल्याचे नवे प्रकरण उघडकीस आले आहे.
बहुतेक मुलांचा मृत्यू ऑक्सिजन व औषधांअभावी झाला, असे चौकशीत आढळले आहे. या प्रकरणी तीन अधिकार्‍यांसह इतर काही अधिकार्‍यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशातील एफआरआय दाखल झालेल्या पण आरोपी नसलेल्या अधिकार्‍यांची संख्या आता फारच थोडी असेल. गोरखपूरच्या बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयात ऑगस्ट महिन्यात शे पाऊणशे मुलांचा याच बेपवाईने मृत्यू ओढवला होता.

उत्तर प्रदेश सरकारच्या आरोग्य खात्याचे आरोग्य पुरते बिघडले आहे यात आता शंका राहू नये. पण ज्या राज्यामध्ये ते आरोग्य बरे असेल असे जनतेला वाटत होते, त्या महाराष्ट्र राज्यातही परिस्थिती कितीशी वेगळी आहे ?

पुरोगामित्वाचे ढोल पिटणार्‍या राज्याची आरोग्यात मात्र पिछेहाट झाली आहे. महाराष्ट्रातील सर्व शासकीय रुग्णालयांच्या नवजात बालक कक्षात आवश्यक जीवनरक्षक प्रणालीचा (व्हेंटिलेटर) एकही संच उपलब्ध नसणे हे धक्कादायक नाही का?

या प्रणालीचा वापर करता येणारे तज्ञ उपलब्ध नसल्याची कबुली आरोग्य सूत्रांनी दिली आहे. मार्च 2017 अखेरपर्यंत योग्य औषधोपचारांअभावी राज्यातील शासकीय रुग्णालयांत अडीच हजारांपेक्षा बालमृत्यू झाले असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

35 प्रकारच्या व्याधींवर उपचार करणारी नाशिकच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील कोट्यवधी किमतीची अत्याधुनिक यंत्रसामुग्री बंद पडली आहे.

शासनाची आरोग्य यंत्रणाच मृत्यूशय्येवर असल्याचे याआधीही अनेक घटनांमधून स्पष्ट झाले आहे. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे वारंवार सांगितले जाते तरी जनतेचे अनुभव मात्र तसे नाहीत.

शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी अनेकदा उपस्थित नसतात. शासकीय सेवेत असतानाही अनधिकृतरीत्या खासगी रुग्णालय चालवणार्‍यांचा सुळसुळाट वाढला आहे.

औषधांचा, विविध लसींचाही तुटवडा असतो किंवा अधिकार्‍यांच्या ‘कार्यक्षमते’मुळे निर्माण होतो. शासकीय सेवा देण्यास डॉक्टर नाखूश असल्याचे कारण पुढे केले जाते.

पण सेवेत दाखल झालेल्या डॉक्टरांचेही नियोजन व्यवस्थित न केल्याचे अनेकदा आढळले. याचाच अर्थ आरोग्याचे दुखणे अधिक खोल व गंभीर आहे.

त्याचा सखोल शोध घेतला जाईल आणि उपाययोजना केल्या जातील अशी अपेक्षा आरोग्येच्छु जनतेने करावी का?

LEAVE A REPLY

*