धार्मिक सहिष्णुतेचा वस्तुपाठ

0
धार्मिक सहिष्णुता, सर्वधर्मसमभाव ही भारतीय संस्कृतीची अभिन्न अंगे आहेत. याच वैशिष्ट्यांमुळे भारत देश जगभर ओळखला जातो. या बलस्थानांना नख लावण्याचा नसता उद्योग देशभर सध्या का वाढत आहे? तथापि तीर्थक्षेत्र पंढरपूरने मात्र धार्मिक सहिष्णुतेचा आदर्श वस्तुपाठ गिरवला आहे.
मुस्लिम धर्मियांचा बकरी ईद सण देशभर नुकताच साजरा झाला. मात्र पंढरपूरमध्ये वेगळ्या पद्धतीने ईद साजरी झाली. बकरी ईद व एकादशी हे दोन धर्मियांचे दोन सण एकाच दिवशी होते.
बकरी ईदला मुस्लिम समुदायात व एकादशीला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. एकादशीचा मान ठेवण्यासाठी पंढरपुरातील मुस्लिम बांधवांनी ईदची कुर्बानी शनिवारऐवजी रविवारी देण्याचा निर्णय घेतला व तो काटेकोरपणे अंमलातही आणला.

ईदच्या दिवशी फक्त नमाज पठण केले गेले. धर्माच्या नावाखाली दहशतीचा धुमाकूळ जगभर चालू आहे. अर्थात धार्मिक उन्माद, धर्म संकल्पनेचा अयोग्य अर्थ फक्त कोणा एका धर्मातच लावला जातो, असे समजण्याचे अजिबात कारण नाही.

सर्वधर्मिय त्यात आघाडीवर आहेत. हिंदू धर्मात गायीला देवाचे स्थान दिले गेले आहे. गायींना वाचवण्यासाठी माणसे खुशाल मारली जात आहेत. गोमांस बाळगल्याच्या संशयावरून, गायींची अवैध वाहतूक केली म्हणून किंवा गोमांस सेवन केले अशा सबबीखाली माणसांचा जीव घेतला जात आहे.

लोकशाहीत यंत्रणेला बलाढ्य मानले जाते; पण तथाकथित गोरक्षकांना वेसण घालण्यात मात्र यंत्रणा कुचकामी का ठरत असावी? यंत्रणेच्या या भूमिकेने जनतेच्या मनात संशयाला मात्र वाव मिळत आहे.

मालेगावमधील एका गणेश मंडळाने मुस्लिम कार्यकर्त्यांच्या हस्ते गणेशाची आरती करून एक नमुनेदार प्रथा सुरू केली; पण जातीयवाद्यांनी त्यातून वेगळीच संधी घेतली. लगेच धर्म बुडवल्याची हाकाटी पिटली गेली. आरती केलेल्या तरुणांना धर्मबहिष्कृत करण्यात आले.त्यांचे विवाह बेकायदा ठरवले.

त्यांना आपल्याच पत्नीशी पुन्हा विवाह करण्याचा फतवा बजावला. या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या मुस्लिम बांधवांनी हिंदू धर्माबद्दल दाखवलेला आदर सर्वधर्मियांना अनुकरणीय वाटला पाहिजे; पण त्याबद्दलही काही कट्टर धर्ममार्तंड नक्कीच रान उठवण्याचा प्रयत्न करतील.

कारण कोणत्याही समाजातील पुरोहितवर्गाचे अस्तित्व व खोटे महत्त्व त्यांच्या धार्मिकतेच्या अवडंबरावर टिकून असते. राजकीय स्वार्थासाठी नेतेमंडळींकडून तथाकथित बाबा, बुवा, महाराज, बापू, इमाम, काजी, मुल्ला आदींचा आश्रय घेतला जातो.

त्यातून राम रहीम आणि आसारामसारखे ‘चारित्र्यवान’ अवतारी पुरुष निर्माण होतात. अवैध उद्योगांना खतपाणी घालतात. अशांच्या नादी न लागता जनतेने आपापल्या परीने भारतीय संस्कृतीतील सहिष्णुतेची अनुभूती जगाला द्यायला हवी.

 

LEAVE A REPLY

*