देव तेथेचि जाणावा !

0

जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले ॥1॥
तोचि साधू ओळखावा । देव तेथेंचि जाणावा ॥2॥

असे बजावत संत तुकोबारायांनी जनतेला खर्‍या देवाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. त्या उपदेशाप्रमाणे आदर्श उभा करण्यासाठी अनेक व्यक्तीसमूह व संस्था आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत.

घरट्यातील चिमणी पाखरे उडून गेल्यानंतर एकटे राहण्याची वेळ येणार्‍या ज्येष्ठांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विपरित परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची वेळ येते तेव्हा विविध कारणांमुुळे एकटेपण लादल्या गेलेल्या ज्येष्ठांना कोणाचा तरी आधार हवासा असतो.

छत्तीसगडच्या रायपूरमधील सात-आठशे तरुण अनेक ज्येष्ठांचा स्वखुशीने आधार बनले आहेत. या उपक्रमांतर्गत ज्येष्ठांची सगळी काळजी त्यांच्याकडून घेतली जाते.

रोज फोन करून हाकहवाल विचारला जातो. जरूर तर प्रत्यक्ष भेट घेतात. ज्येष्ठांच्या सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. हा धडा ज्येष्ठांचीसुद्धा उमेद वाढवणारा ठरत आहे.

ज्येष्ठ नागरिकांची अनेक मंडळे सर्वत्र आढळतात. अनेक मंडळे अभिनव उपक्रम राबवतात; पण अशा अनेक ठिकाणी कार्यक्रम केवळ उपचारांसारखे पार पडतात.

अशा मंडळांनी रायपूरच्या तरुणांचा धडा का गिरवू नये ? तसे झाले तर तरुणांची सक्रियतासुद्धा अधिक वाढेल. आजही अनेक गरीब विद्यार्थी अनवाणी पायानेच शाळेत जातात. जुनी पादत्राणे गोळा करून त्यांना ठाकठीक केले जाते.

अनवाणी जाणार्‍या विद्यार्थ्यांना ती पादत्राणे दिली जातात. असा उपक्रम उत्तराखंडमधील गढवाल व उदयपूरच्या दोन तरुणांनी वैयक्तिकरीत्या सुरू केला आहे.

आतापर्यंत आसपासच्या तीन-चार राज्यांतील हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रयत्नांचा प्रसाद पादत्राणांच्या रूपाने मिळाला आहे. नाशिक पोलिसांनी असाच एक उपक्रम गेली काही वर्षे राबवला आहे.

कर्त्या व्यक्तीच्या निधनाने कुटुंबे उघड्यावर पडतात. अशा दुर्दैवी प्रसंग ओढवलेल्या कुटुंबांना आधार देण्यासाठी नाशिक पोलिसांनी ‘अनमोल पोलीस मित्र परिवार’ स्थापन केला आहे.

ज्या सहकार्‍यांचे दुर्दैवी निधन होते त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य या परिवाराकडून केले जाते. माणुसकीचे असे अनेक झरे समाजात ठिकठिकाणी निवांतपणे पाझरत असतात.

म्हणून कदाचित त्यांच्या कार्याची पुरेशी माहिती जनतेपर्यंत पोहोचत नसावी. तथापि संवेदनशीलता व माणुसकीच्या अशा दर्शनाने आजही चांगुलपणावर समाजाचा विश्वास आहे.

तो कायम असावा. राजकारणाने समाजजीवन तर्‍हेतर्‍हेने ढवळून निघत असताना अशा माणुसकीच्या झर्‍यांचे व संवेदनशीलतेचे अस्तित्व आणि महत्त्व अधिकच अधोरेखित होते.

 

LEAVE A REPLY

*