खरा धडा !

0
किक बॉक्सिंग, कराटे व बॉक्सिंग या तीन खेळांत आशियाई आणि राष्ट्रीय पदक विजेत्या बबिताने सर्व भारतीय महिलांना स्वसंरक्षणाचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक आपल्या खेळातून घालून दिले आहे.
चार वर्षांपूर्वी बबिताच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कामासाठी बाहेर पडलेल्या बबिताला छेडछाड व दबावाचा वारंवार सामना करावा लागला; पण तिने हार मानली नाही.
‘मी स्वसंरक्षणासाठी मार्शल आर्ट शिकले. कोणत्याही प्रकारच्या संकटाशी दोन हात करण्याचा आत्मविश्वास त्यामुळेच दुणावला आहे’ ही बबिताची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आणि मुली व त्यांच्या पालकांसाठी दिशादर्शक आहे.

प्रसंगोपात आत्मसंरक्षणासाठी स्वत:च सिद्ध झाले पाहिजे, ही वैचारिक क्रांती बबिताने प्रत्यक्ष घडवली आहे. मुलींना सामाजिक आयुष्यात अनेकदा अप्रिय प्रसंगांना सामोरे जावे लागते.

मुलींवर अतिप्रसंगाच्या घटनांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत 40 टक्के वाढ झाल्याचे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालाने स्पष्ट केले आहे.

अतिप्रसंग करणारे अनेकदा आप्तस्वकीयच असतात. चंदीगडमध्ये स्वातंत्र्यदिनाची परेड संपवून घरी जाणारी अल्पवयीन मुलगी नुकतीच अत्याचाराला बळी पडली.

अशा कितीतरी घटनांनी मुलींचे सामाजिक आयुष्य सुरक्षित नाही हे अधोरेखित केले. शासनाने याबाबत अनेक कायदे केले आहेत; पण अंमलबजावणीअभावी व समाजाच्या विकृत मानसिकतेमुळे ते फारसे उपयोगी ठरत नाहीत.

मुलींना संकटांचा सामना करण्यासाठी समर्थ बनवण्याऐवजी मुलींवरच बंधने लादण्याकडे कल वाढला आहे. ‘सातच्या आत घरात’ तसेच ’मुलगी नको’ हेही चुकीचे विचार बळावत आहेत.

मध्यंतरी मुलीला जन्म द्यायची भीती वाटते, अशी भावना थेट पंतप्रधानांजवळ व्यक्त केली गेली. त्यावर बरेच मंथनही झडले होते.

मुली जन्माला न घालणे, मुलींवर बंधने लादणे व पुरुषी संरक्षणाशिवाय स्त्रीची वाटचाल अशक्य आहे, असे मुलींच्या मनावर बिंबवणे हे या समस्येवरचे उपाय नव्या समस्यांना जन्म घालत आहेत.

समाजातील मुलांच्या तुलनेत मुलींच्या संख्येत तफावत आहे. विवाहासाठी मुली मिळणे कठीण होत आहे. कुटुंबव्यवस्था धोक्यात येण्याची साधार भीती व्यक्त होऊ लागली आहे.

‘मुलगी नको’ हा विचार प्रबळ ठरला तर समाजाला भविष्यात भीषण असमतोलाचा सामना करावा लागेल. असल्या पळपुट्या मार्गांनी ही समस्या सुटणार नाही.

संकटांचा सामना करण्याचा स्वसंरक्षण हाच समर्थ पर्याय आहे, हा खरा धडा बबिताने घालून दिला आहे; पण समाज त्याचे अनुकरण करील का?

 

LEAVE A REPLY

*