माणुसकीचे दिव्य दर्शन !

0

स्वार्थासाठी संधिसाधू राजकारणी नियमांचा आधार घेत समाजातील जातीपातीचा विळखा घट्ट करण्याच्या नसत्या उद्योगात मग्न असताना सर्वसामान्य माणसाने माणुसकीचे विलक्षण दर्शन मुंबापुरीतील परवाच्या जलप्रलयात घडवले आहे.

एक अज्ञात कवी म्हणतो,

जपू धागा माणुसकीचा । नको रे हा रक्तपात
विसरून चाल तू सख्या । समाजातील जातपात
काय माझे ? काय तुझे ? रंग उधळू माणुसकीचे

ही कविता करोडो मुंबईकर शब्दश: जगले आहेत आणि जगत आहेत. दोन-तीन दिवस मुंबापुरीत पावसाने यथेच्छ धुमाकूळ घातला. लाखो मुंबईकर जणू जिथल्या तिथे स्थानबद्ध झाले.

कोणी स्टेशनवर, लोकलमध्ये, बसमध्ये, आगगाडीत, कारमध्ये, ठिकठिकाणी रस्त्यावर अडकले. किमान पंचवीस ते पन्नास तास लाखो माणसे घरी जाऊ शकली नाहीत.

त्यांच्या मदतीसाठी समाजातीलच सामान्य माणसे उभी राहिली. भरपावसात गरजूंसाठी आहार व निवारा देण्याचा प्रयत्न झाला. बोलघेवड्या राजकारण्यांची श्रेयाची लढाई आता जोरात सुरू आहे.

तथापि लाखोंना आधार देणारा माणुसकीचा हा पाझर मात्र निनावी होता. मदत करणार्‍यांनी मदतीचे श्रेय मागितले नाही. किंबहुना अगदी सहजपणे व्यक्त झालेला तो माणुसकीचा झरा खळखळत होता.

अशा अनेक माणूसचित्रांवर माध्यमेही प्रकाशझोत टाकत आहेत. विषय आपत्ती व्यवस्थापनाचा असो वा योजनांच्या अंमलबजावणीचा; सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी यंत्रणा कुचकामी ठरतात हे आता जनतेच्या लक्षात आले आहे.

नंतरच्या चर्चासत्रांत हिरीरीने श्रेय ओरबाडू पाहणारे नेतेसुद्धा आपत्तीच्या काळात अदृश्यच असतात. तरीही राजकारणात प्रवेश केल्यानंतर बहुतेकांच्या आर्थिक स्थितीचा आलेख चढताच असतो.

सात पिढ्यांचे कोटकल्याण साधण्यासाठीच राजकारण करावे हा समज राजकारण्यांनी आपल्या स्वार्थीसाधूपणाने दृढ केला आहे. सामान्य जनतेला योजनांचे लाभ देताना शंभर अटी लादल्या जातात.

अनेकांना नैवेद्य पोहोचवावा लागतो. यंत्रणेचे पालकत्व ज्यांच्याकडे आहे असे मानले जाते ते सरकारही कारभारी यंत्रणेबद्दल आपली हतबलता ‘प्रामाणिकपणे’ व्यक्त करते.

सरकारी अधिकारी आपले ऐकत नाहीत, असे उद्गार काढून स्वत:चे व जनतेचे समाधान करू पाहतात. त्या अनुभवांनी त्रस्त झालेली जनता मात्र जागरुक होत आहे.

आपल्या समस्या आपणच सोडवायला हव्यात हे जनतेला उमगले आहे. बहुधा त्यामुळेच कोसळधार पावसात सापडलेल्या मुंबईकरांना स्वत:हून मदतीसाठी लाखो हात पुढे सरसावतात हे देशाच्या उज्ज्वल भविष्याचे प्रसादचिन्ह मानावेसे वाटते. माणुसकीचे लाखो हात पुढे करणार्‍या अज्ञात मुंबईकरांचे मन:पूर्वक अभिनंदन !

LEAVE A REPLY

*