‘संधीसाधूं’नाच बौद्धिक गरजेचे !

0
सामान्य माणसे समाजासाठी झटत असामान्यत्वाचा आदर्श उभा करत आहेत. तथापि तथाकथित संधीसाधू, बुवा, बापू व नेतेमंडळी यांनी समाजाला वेठीला धरण्याचा उच्छाद मांडला आहे.
काळाबरोबर धार्मिक संकल्पना व रुढी-परंपरांना योग्य वळण देण्याची जबाबदारी धर्मधुरिणांच्या खांद्यावर होती असाही एक काळ होता;
पण अलीकडच्या काळात धर्माच्या नावावर अनेक बुवा, बापू, स्वामी, महाराज आदींच्या उदयाने सामाजिक शांतताच धोक्यात येत आहे.

लोकशाहीचे आधारस्तंभ मानल्या जाणार्‍या न्यायसंस्थेसह सर्व व्यवस्थांना बिनदिक्कत चूड लावण्याचा उद्योग या तथाकथित महात्म्यांच्या झुंडी करत आहेत.

मतांचे राजकारण करणार्‍या स्वार्थी राजकारण्यांनी हातावर हात ठेवत साक्षीभाव जपावा, जनतेला वार्‍यावर सोडावे यापरते समाजाचे दुसरे दुर्दैव कोणते?

तथाकथित भोंदूबाबा व राजकारणी एकत्र आले की समाज कसा वेठीला धरला जातो हे अलीकडे देशात ठिकठिकाणी वारंवार घडणार्‍या दुर्दैवी घटनांनी जनतेला अनुभवावे लागत आहे.

गैरकृत्यांसाठी या तथाकथित बुवा-बापूंना अटक झाली की त्यांचे भक्तगण धिंगाणा घालू लागतात. त्यामुळे अनावस्था प्रसंग ओढवतो. त्या धर्मनिष्ठांच्या मांदियाळीत गेल्या दोन-तीन वर्षांत गोरक्षकांच्या नव्या जमातीची भर पडली आहे.

मात्र अशा सर्व झुंडींच्या उपद्रवामुळे नेत्यांचे राजकीय स्वार्थ साधण्यासाठी उपयोग होत असावा. ‘डेरा सच्चा सौदा’च्या ताज्या धुमाकुळाने असे अनेक ‘सच्चे’ प्रश्न ठळकपणे अधोरेखित झाले आहेत.

या गुरुमित नावाच्या सोद्याने राजकारण्यांची ही गरज ओळखून आपले बस्तान भाजप नेत्यांमध्ये चांगलेच पक्के केले होते.

काही वर्षांपूर्वी दाखल झालेल्या बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातून आता भाजप नेतेच ‘देशाचा’ म्हणजेच गुरुमित व गुरमीतच्या राज्याचा बचाव करू शकतील हे त्याने नक्की हेरले असावे.

भाजपचे अनेक नेते व मुख्यमंत्र्यांनी बाबाकडून आदर सत्कार स्वीकारला होता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह अशा अनेकांचे बाबासोबतचे हस्तीदंती फोटो आता समाजमाध्यमांवर फिरत आहेत.

‘मन की बात’मधून जनतेशी थेट संवाद साधण्याचा प्रभावी उपक्रम पंतप्रधानांनी गेली तीन वर्षे सतत चालू ठेवला आहे. सामान्य माणसाकडून होणार्‍या काही चांगल्या उपक्रमांचासुद्धा त्या ‘बात’मधून उल्लेख केला जातो;

पण अशा चांगल्या उपक्रमांवर भोंदूबाबांचे मोठाल्या खर्चाचे फालतू उपक्रम प्रसिद्धीच्या दृष्टीने मात करतात. अलीकडच्या काही संवादांतून संदिग्धपणे केल्या गेलेल्या उल्लेखामधून पंतप्रधानांनाही या समाजविघातक हालचालींची जाणीव झाली असावी का?

तथापि सामान्य जनतेपेक्षा अशा समाजविघातक साधू-संतांनाच पंतप्रधानांच्या उपदेशाच्या बौद्धिकाची जास्त गरज आहे हे पंतप्रधान लक्षात घेतील अशी अपेक्षा करावी का?

LEAVE A REPLY

*