लढाईचा परीघ विस्तारावा !

0
अन्याय करणार्‍यापेक्षा अन्याय सहन करणाराच जास्त दोषी असतो अशा अर्थाची एक म्हण आहे. याची जाणीव सर्वधर्मीय महिलांना होऊ लागली आहे हे बदलाचे सुचिन्ह मानायला हवे.
महिलांसाठी अन्यायकारक ठरतील अशा प्रथा आणि परंपरा फक्त एकाच धर्मामध्ये आहेत असे मानायचे अजिबात कारण नाही.
कमी-अधिक फरकाने त्या अनेक धर्मांमध्ये, समाजांमध्ये आहेच. त्या प्रथांविरुद्ध उभे राहण्याचे धाडस दाखवल्याबद्दल शायरा बानो, आतिया साबरी, आफरीन रहमान, गुलशन परवीन, इशरत जहाँ या निश्चितपणे अभिनंदनास पात्र आहेत.

उत्तराखंडमधील काशीपूरमधील राहणार्‍या शायरा बानो यांचा विवाह 2001 मध्ये झाला होता. ऑक्टोबर 2015 मध्ये त्यांना पतीने तलाक दिला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. पालकांच्या मदतीने त्या दिल्लीत आल्या आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

महिलांना दुय्यम स्थान देण्यात सगळेच समाज आघाडीवर आहेत. त्या कितीही शिकलेल्या असल्या तरी त्यांना समान दर्जा देणे आजही समाजमान्य नाही.

अपवाद वगळता महिलांना आजही निर्णयस्वातंत्र्य नाही. पुरुषसत्ताक समाजात अन्यायकारक धार्मिक रुढींविरुद्ध आवाज उठवण्याचे, कायदेशीर लढा पुकारण्याचे धाडस करणे वाटते तितके सोपे नाही.

अनेकदा विवाहविच्छेदाची कारणे अत्यंत किरकोळ असतात. पतीच्या पुढे चालत गेली, स्वयंपाक करता येत नाही, पत्नीस चष्मा लागला म्हणून विवाहविच्छेदाचा निर्णय सर्वच समाजांमध्ये घेतला जातो.

घटस्फोट परस्पर सामंजस्याने झाला असेल तर परिस्थिती थोडीशी वेगळी असते. पण कोणत्याही कारणामुळे दिला जाणारा तलाक असो किंवा घटस्फोट महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा असतो.

अनेक महिलांची अवस्था त्यामुळे ‘ना घर का ना घाट का’ अशी होत असते. घटस्फोटित महिलांकडेच कलुषित नजरेने पाहिले जाते. अशा महिला कमावत्या आणि शिकलेल्या नसतील तर त्यांचे आयुष्य अजूनच दुष्कर बनते.

बहुतांश प्रकरणांमध्ये मुलांची जबाबदारी झटकण्याकडेच पुरुषांचा कल असतो. त्यामुळे संततीची जबाबदारीही महिलेलाच उचलावी लागते. याचे संततीवरही विपरित मानसिक परिणाम होत असतात.

अन्यायकारक विवाहविच्छेदनाचे समर्थन कोणत्याही दृष्टिकोनातून होऊ शकत नाही. अस्तित्वाच्या लढ्यासाठी प्रचंड आत्मबळ लागते.

त्यामुळे अन्यायकारक रुढींना नाकारणार्‍या महिलांच्या मागे समाजातील महिलांनी आपले पाठबळ, आत्मबळ उभे करायला हवे.

या निर्णयाच्या निमित्ताने सर्वच धर्मांमधील महिलांसाठी अन्यायकारक रुढींचा उहापोह घेतला जाऊ शकेल का?

 

 

LEAVE A REPLY

*