शेकटकर खरे तेच बोलले ; पण ?

0

‘शत्रू त्याची ताकद वाढवत आहे. ते तो कशा पद्धतीने करत आहे, त्याला उत्तर कसे दिले जावे याचा बारकाईने अभ्यास करण्याची नितांत आवश्यकता आहे; पण दुर्दैवाने आपले राज्यकर्ते देशाऐवजी खुर्ची सांभाळण्याकडेच अधिक लक्ष देत आहेत’ अशी खंत निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर यांनी व्यक्त केली आहे.

शेकटकर निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. वरिष्ठ दर्जाचे अधिकारी म्हणून राज्याच्या कारभार पद्धतीचा व सैन्यदल कारभाराचा दीर्घकालीन अनुभव त्यांना आहे.

लष्कराच्या फेररचनेबाबत विचार करण्यासाठी सरकारने नेमलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते. त्या समितीने सुचवलेल्या 99 पैकी 65 शिफारसी संरक्षण मंत्रालयाने स्वीकारल्या आहेत.

त्यांनी व्यक्त केलेली खंत दखलपात्र तर नक्कीच आहे; पण ते कोणी ऐकणार आहे का? राज्यकर्त्यांकडे तेवढा वेळ तरी आहे का? भारतासारख्या खंडप्राय देशात सतत कोणत्या ना कोणत्या भागात निवडणुका असतात.

पक्षोपपक्षांच्या नेत्यांमध्ये त्यानिमित्ताने कायमच कलगीतुरा रंगत असतो. सध्या गुजरात राज्यात निवडणुकीचे अखेरचे पर्व सुरू आहे. आजच मतदान आहे. दंभ हा फार मोठा दुर्गुण असल्याचे समर्थ रामदास स्वामींनी म्हटले आहे.

या दंभाची लागण मोठमोठ्या नेत्यांनासुद्धा झाल्याचे गुजरात निवडणुकीमुळे पुन्हा जनतेच्या प्रत्ययास आले आहे. ज्या माणसांनी समाजासमोर आचार-विचारांचा आदर्श उभा करावा अशी जनतेची अपेक्षा असते त्याच माणसांची सत्तेच्या मोहापायी अवनती झाल्याचे जनतेला चुपचाप पाहावे लागत आहे.

गुजरात निवडणुकीत राजकारण्यांनी नेहमीप्रमाणे धर्म-जातीभेदांचा आधार घेतलाच; पण आता मान्यवर नेत्यांना शत्रू राष्ट्रांचा हस्तक ठरवण्याचा अश्लाघ्य प्रयत्नही तेथे झाला आहे.

एका कट्ट्यावर रंगलेल्या तरुणांच्या अनौपचारिक गप्पांमध्ये यावरून कमालीचा रोष व्यक्त केला गेला. जनतेचा भ्रमनिरास होत आहे याचे ते निदर्शक मानावे का? निवडणूक प्रचारात इतकी हीन पातळी पहिल्यांदाच गाठली गेली आहे.

विकासाचा मुद्दा बासनात गुंडाळून वैयक्तिक उखाळ्या-पाखाळ्यांवर प्रचाराचा भर आहे. शाब्दिक खेळ रंगवत विरोधकांच्या वर्मी घाव घातल्याचा आसुरी आनंद पुढारी मंडळी उपभोगत आहेत.

हे सर्व लक्षात घेता शेकटकर जे बोलले त्याचा अधिक गांभीर्याने सर्वांनी विचार करण्याची गरज आहे. जगाच्या राजकारणाचे भान राज्यकर्त्यांना आणून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे; पण कुरघोडीचे राजकारण, एकमेकांचे पाय ओढण्याचा खेळ, सत्तालालसा यातच मश्गूल असलेले राजकारणी नेते शेकटकरांच्या सूचनांची दखल घेण्याइतकी संवेदनशीलता दाखवतील ही अपेक्षा जनतेने करावी का? की सध्याच्या काळात तेही अरण्यरुदनच ठरेल?

LEAVE A REPLY

*