तापी थडीची घोडदौड

0

आशिया खंडातील पहिल्या अश्व संग्रहालयाचे भूमिपूजन आज नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे.

येथे भरणार्‍या दत्तप्रभूंच्या यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा आहे. यानिमित्त दरवर्षी अश्वमेळा भरतो. त्यात घोड्यांच्या खरेदी-विक्रीतून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते.

देशभरातील अश्वप्रेमी येथे घोड्यांच्या वेगवेगळ्या जाती प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद लुटतात. यावर्षीचा ‘चेतक महोत्सव’ आगळ्या-वेगळया स्वरुपाचा आहे.

त्यामुळे विदेशी पर्यटकांचीही संख्या मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. यात भर टाकणारे व सारंगखेड्याचे नाव जागतिक स्तरावर नेण्याचे पाऊल आता पर्यटन विभागाने उचलले आहे.

त्यातूनच भव्य-दिव्य अश्व संग्रहालय उभारण्याचा श्रीगणेशा आज होत आहे. या संग्रहालयात जगातील घोड्यांचे विविध ‘मॉडेल’ अश्वप्रेमींना पाहायला मिळतील. आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रयोगशाळादेखील येथे उभी राहणार आहे.

ज्या-ज्या शूरवीरांनी युद्धात घोड्यांचा वापर करून विजयपताका फडकवली त्यांची माहिती येथे उपलब्ध होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांसारखे शूरवीर घोड्यावर स्वार होऊन युद्ध खेळले व जिंकले त्यांचे पुतळेही उभारले जाणार आहेत.

घोड्यांसाठीच्या सर्व साहित्याची माहिती या संग्रहालयात अश्वप्रेमींना सचित्र पाहायला मिळेल. जगातील विविध जातींचे घोडेही येथे आणले जातील. घोड्यांची लक्षणे, त्यांचा आहार-विहार, उपयुक्तता व मानवी जीवनात घोड्याचे महत्त्व याचीही माहिती त्यात असेल.

पर्यटकांसाठी ‘व्हिडीओ गॅलरी’ही उभारली जाणार आहे. तापीकाठावर निसर्गरम्यस्थळी सुमारे तीन एकर जागेवर हे भव्यदिव्य अश्व संग्रहालय येत्या दोन वर्षांत उभे राहणार आहे.

पशुधन ही आवश्यक बाब आहे. त्यात घोड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अश्व संग्रहालयामुळे जगभरातील अश्वप्रेमींचे लक्ष सारंगखेड्याकडे वेधले जाणार आहे.

विकासाचा नवा अध्याय आदिवासी जिल्ह्यात सुरू होत आहे. पर्यटन विभागाचा यामागचा उद्देश नक्कीच चांगला आहे. मात्र बर्‍याचदा सुरुवात होते; पण काम पुढे जात नाही, असा अनुभव येतो. या संग्रहालयाबाबत तसे होऊ नये.

सारंगखेड्याचा चेतक महोत्सव भारतभर प्रसिद्ध झाला आहे, तशी या अश्व संग्रहालयाची महती जगभर पोहोचावी. याबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तापी थडीची ही अश्वयात्रा पुढे जाण्यासाठी शासनाने सातत्याने बळ द्यावे.

पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि सारंगखेड्याच्या चेतक महोत्सव समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरावे हीच अपेक्षा !

LEAVE A REPLY

*