पथदर्शी निकाल

0

अंधश्रद्धा, जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत दाखल झालेला गुन्हा राज्यात पहिल्यांदाच यशस्वीरीत्या ‘निकाली’ काढण्याचा मान नाशिक जिल्ह्याने मिळवला आहे.

या कायद्यांतर्गत आरोपींना शिक्षा होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे. इगतपुरी तालुक्यातील टाके हर्ष येथील नरबळीप्रकरणी मांत्रिक महिलेसह अकरा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली.

स्वागतार्ह व दिशादर्शक ठरेल असाच हा निर्णय आहे. मांत्रिकाच्या सांगण्यावरून या गावातील दोन महिलांना नातेवाईकांनीच अमानुष मारहाण केली व पायदळी तुडवून ठार मारले होते.

दीड महिन्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. या निकालाचे श्रेय तक्रारकर्ती महिला, पोलीस व शासकीय यंत्रणा यांच्यातील परस्पर संवाद आणि समन्वयाला द्यावे लागेल.

अशा प्रकरणांची तड लागण्यासाठी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे धाडस दाखवणे, पुरावे गोळा करून विशिष्ट मुदतीत खटला दाखल होणे व न्यायसंस्थेसमोर भक्कम पुरावे सादर करत आरोपींना शिक्षा होईपर्यंत प्रामाणिक प्रयत्नांची आवश्यकता असते.

त्या कसोटीस उतरलेली शासकीय यंत्रणा अभिनंदनास पात्र आहे. 1989 मध्ये पुण्यात झालेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जाहीरनामा परिषदेत अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा मुद्दा पुढे आला होता.

जाहीरनाम्यावर पहिली स्वाक्षरी पु. ल. देशपांडे यांनी केली होती. कायद्याचा मसुदा 1995 साली तयार झाला. तो मंजूर होण्यासाठी मात्र जनतेला तब्बल अठरा वर्षे प्रतीक्षा करावी लागली.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्वर्यू नरेंद्र दाभोळकर यांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. या निकालाने जादूटोणा कायद्याची आवश्यकता यथार्थ ठरवली आहे.

करणी-मरणी, जादूटोणा व तंत्रमंत्र यांचा समाजावरचा प्रभाव दुर्दैवाने अद्याप बराच टिकून आहे. अनेकदा प्रेमाने समजावून सांगूनही विद्यार्थ्यांनी ऐकले नाही तर प्रसंगी छडी उगारली जाते.

या कायद्यापुरते ते खरे ठरले आहे. संतांनी, विचारवंतांनी व समाजसुधारकांनी समाज जागृतीसाठी खस्ता खाल्ल्या, अंधश्रद्धेवर तिखट शब्दांत कोरडे ओढले; पण समाज जागा व्हायला तयार नाही, हे लक्षात आले आणि कायदा करण्याचा आग्रह सरकारला मान्य करावा लागला.

तरीही करणी, भूतबाधा, जादूटोण्याच्या संशयावरून आजही जीव घेतले जातात. कोणतेही कालहरण न होता हा कायदा संमत झाला असता तर बळी गेलेले कित्येक दुर्दैवी जीव वाचले असते.

हा सल कार्यकर्त्यांच्या मनात आजही कायम आहे. एक खटला निकाली निघाला असला तरी लढाई अजून बाकी आहे, हे जनतेने व कार्यकर्त्यांनी विसरू नये.

LEAVE A REPLY

*